उर्धूळला श्रीराम कथा सोहळा:श्रीराम मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम
![]()
प्रतिनिधी| चांदवड तालुक्यातील उर्धूळ येथील श्रीराम मंदिराच्या अकराव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित रामजन्मोत्सव व श्रीराम कथा कार्यक्रम अत्यंत उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला. रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक यांच्या सुश्राव्य श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यात प्रथमच ढोक महाराजांच्या कथेचे निरुपण होत असल्याने जिल्हाभरातून भाविकांनी मोठी गर्दी केली होती. रामनवमीच्या दिवशी नाशिक येथील साईराम मित्रमंडळ व तरुण मित्रमंडळ यांनी आणलेल्या गंगाजल व मशालीची सकाळी ८ वाजता मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर रामजन्माचे भजन व प्रसादरूपी फराळाचे वाटप झाले. दुपारी महाराष्ट्रातील ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांचे कीर्तन झाले. कथेच्या निमित्ताने शांतिगिरी महाराज यांच्या उपस्थितीत पालखी मिरवणूक व सत्संग सोहळा पार पडला. कार्यक्रमास खासदार भास्कर भगरे, आमदार डॉ. राहुल आहेर, भूषण कासलीवाल, नितीन आहेर, डॉ. आत्माराम कुंभार्डे आदींची उपस्थिती होती.कथाव्यास रामरावजी महाराज ढोक यांनी उर्धूळकरांच्या शिस्तीचे आणि नियोजनाचे कौतुक केले. सर्व ग्रामस्थांनी एका कुटुंबाप्रमाणे एकत्र येऊन वारकरी संप्रदायाचा आदर्श निर्माण केला आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. कार्यक्रमासाठी गावातील तरुण, ज्येष्ठांनी परिश्रम घेतले.
