[ads1]
राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर;शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजना लागू
मुंबई – खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये ट्रिगर-१ (प्रथम कळ) लागू झाल्याने या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून विविध उपाययोजना व सवलती लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मदत व पुनर्वसन विभागाच्या वतीने यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिली.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार पुढे म्हणतात की, राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना शासन वाऱ्यावर सोडणार नाही. अडचणीच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे आहे. खरीप हंगामातील परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी उपाययोजना लागू करण्याचा निर्णय शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला दिलासा देणारा आहे. दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ नुसार करण्यात आलेल्या मूल्यांकनाच्या आधारे राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये ट्रिगर-१ (प्रथम कळ) लागू झाल्याचे कृषी आयुक्तांच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यानुसार संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना पंचनाम्याची कार्यवाही तातडीने सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्वेक्षण केलेल्या क्षेत्रातील पिकांची स्थिती दर्शविणारे छायाचित्र आणि जीपीएस कोऑर्डिनेट्स संकलित करून पिकांच्या परिस्थितीचा अहवाल कृषी आयुक्तांमार्फत शासनाला सादर करण्यात येणार आहे.
दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये जमीन महसुलात सूट, पिक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू वीजबिलात सूट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी अशा विविध सवलती लागू करण्यात आल्या आहेत. तसेच रोजगार हमी योजनेअंतर्गत कामांचे निकष शिथिल करून जास्तीत जास्त कामे सुरू करणे, आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, टंचाई जाहीर केलेल्या गावांमध्ये शेतीपंपांची वीज जोडणी खंडित न करणे, शेतकरी व शेतमजुरांना अन्नधान्याची उपलब्धता सुनिश्चित करणे आणि जनावरांसाठी आवश्यक चारा उपलब्ध करून देणे यांसारख्या उपाययोजनाही करण्यात येणार आहेत. याशिवाय जलसंधारणाची कामे सुरू करणे तसेच पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या पाण्याचे नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतपिकांच्या नुकसानीबाबतची मदत विहित कार्यपद्धती पूर्ण केल्यानंतर स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे जाहीर करण्यात येणार आहे.
या निर्णयाचा लाभ बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांतील एकूण २६५ तालुक्यांना होणार आहे. दुष्काळाच्या परिस्थितीत शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातील कुटुंबांना आवश्यक ती मदत वेळेत मिळावी, हा शासनाचा प्रयत्न आहे. पंचनामे, पिकांची वस्तुनिष्ठ पाहणी आणि पुढील मदतीची कार्यवाहीही गतीने करण्यात येईल. शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत वाऱ्यावर सोडले जाणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी या निर्णयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मदत व पुनर्वसन विभागाचे आभार मानले असून, दुष्काळग्रस्त भागातील परिस्थितीवर शासन सातत्याने लक्ष ठेवून असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या २५ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार खरीप हंगाम २०२६ मध्ये राज्यातील २६५ दुष्काळग्रस्त तालुक्यांची जिल्हानिहाय यादी खालीलप्रमाणे आहे:
| अ.क्र. | जिल्हा | दुष्काळग्रस्त तालुक्यांची नावे | एकूण संख्या |
|---|---|---|---|
| १ | ठाणे | निरंक | ० |
| २ | पालघर | निरंक | ० |
| ३ | रायगड | श्रीवर्धन | १ |
| ४ | रत्नागिरी | रत्नागिरी, संगमेश्वर, राजापूर | ३ |
| ५ | सिंधुदुर्ग | सावंतवाडी, दोडामार्ग, कणकवली, कुडाळ, वैभववाडी, मालवण, देवगड, वेंगुर्ला | ८ |
| ६ | नाशिक | मालेगाव, बागलाण, कळवण, नांदगाव, सुरगणा, इगतपुरी, पेठ, सिन्नर, येवला, देवळा | १० |
| ७ | धुळे | धुळे, साक्री, शिंदखेडा, शिरपूर | ४ |
| ८ | जळगाव | एरंडोल, पारोळा, धरणगाव, चोपडा, पाचोरा, जामनेर, जळगाव, भडगाव, अमळनेर, रावेर, चाळीसगाव, भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर, यावल | १५ |
| ९ | नंदुरबार | अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार, नवापूर, तळोदा, अक्राणी | ६ |
| १० | अहिल्यानगर | नगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, नेवासा, राहुरी, संगमनेर, अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर, रहाता | १४ |
| ११ | पुणे | भोर, वेल्हे, खेड, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर | ८ |
| १२ | सोलापूर | उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, मोहोळ, माढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मंगळवेढा | ११ |
| १३ | सांगली | मिरज, आटपाडी, जत, कवठेमहांकाळ | ४ |
| १४ | सातारा | सातारा, खटाव, माण, फलटण, खंडाळा, महाबळेश्वर | ६ |
| १५ | कोल्हापूर | पन्हाळा, राधानगरी, गगनबावडा, भुदरगड, आजरा, चंदगड | ६ |
| १६ | छत्रपती संभाजीनगर | छत्रपती संभाजीनगर, कन्नड, सोयगाव, पैठण, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड, फुलंब्री | ९ |
| १७ | जालना | बदनापूर, घनसावंगी, अंबड, जालना, परतूर, मंठा, भोकरदन, जाफ्राबाद | ८ |
| १८ | बीड | बीड, गेवराई, माजलगाव, केज, आंबेजोगाई, परळी, आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, धारूर, वडवणी | ११ |
| १९ | लातूर | लातूर, औसा, अहमदपूर, निलंगा, उदगीर, चाकूर, रेणापूर, शिरूर अनंतपाळ, देवणी, जळकोट | १० |
| २० | धाराशिव | धाराशिव, कळंब, भूम, वाशी, तुळजापूर, लोहारा, परांडा, उमरगा | ८ |
| २१ | नांदेड | नांदेड, बिलोली, कंधार, लोहा, हदगाव, भोकर, देगलूर, किनवट, हिमायतनगर, माहूर, धर्माबाद, उमरी, अर्धापूर, नायगाव | १४ |
| २२ | परभणी | पूर्णा, पालम, परभणी, सोनपेठ, जिंतूर, गंगाखेड, सेलू, मानवत, पाथरी | ९ |
| २३ | हिंगोली | हिंगोली, औंढा नागनाथ, कळमनुरी, सेनगाव, वसमत | ५ |
| २४ | बुलढाणा | जळगाव जामोद, संग्रामपूर, चिखली, देऊळगाव राजा, मेहकर, बुलढाणा, सिंदखेड राजा, लोणार, खामगाव, शेगाव, मलकापूर, मोताळा, नांदुरा | १३ |
| २५ | अमरावती | अमरावती, भातुकली, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, धामणगाव रेल्वे, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, तिवसा, धारणी, चिखलदरा, वरुड, मोर्शी, चांदूर बाजार, दर्यापूर | १४ |
| २६ | अकोला | अकोट, अकोला, पातूर, तेल्हारा, मूर्तिजापूर, बाळापूर, बार्शीटाकळी | ७ |
| २७ | वाशीम | वाशीम, रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर, कारंजा, मानोरा | ६ |
| २८ | यवतमाळ | यवतमाळ, बाभुळगाव, कळंब, दारव्हा, दिग्रस, आर्णी, नेर, पुसद, उमरखेड, महागाव, वणी, मारेगाव, झरी-जामणी, केळापूर, घाटंजी, राळेगाव | १६ |
| २९ | वर्धा | वर्धा, सेलू, देवळी, आर्वी, समुद्रपूर, हिंगणघाट, आष्टी | ७ |
| ३० | नागपूर | नागपूर, कामठी, सावनेर, पारशिवनी, मौदा, भिवापूर, कळमेश्वर, काटोल, रामटेक, हिंगणा, उमरेड, कुही, नरखेड, नागपूर शहर | १४ |
| ३१ | भंडारा | भंडारा, पवनी, लाखंदूर | ३ |
| ३२ | गोंदिया | तिरोडा | १ |
| ३३ | चंद्रपूर | चंद्रपूर, भद्रावती, गोंडपिपरी, राजुरा, कोरपना, मूल, वरोरा, सावली, चिमूर, नागभीड, सिंदेवाही, पोंभुर्णा | १२ |
| ३४ | गडचिरोली | गडचिरोली, चामोर्शी | २ |
एकूण बाधित तालुके: २६५
[ads2]
















Leave a Reply