२४ वर्षांनंतर शहाजी उमाप यांनी पाहिली स्वतः सुरू केलेली गुलालमुक्त परंपरा

[ads1]

लोकसहभागातून सामाजिक क्रांती; औशातील गुलालमुक्त गणेश विसर्जनाची २४ वर्षांची अखंड परंपरा

औसा (विशेष बातमीदार) –  इच्छा तेथे मार्ग असतो. समाजाने एखादा चांगला बदल मनापासून स्वीकारण्याचे ठरवले, तर पोलिसांच्या दबावाशिवायही सामाजिक परिवर्तन घडू शकते. औशातील गेल्या २४ वर्षांची गुलालमुक्त गणेश विसर्जन मिरवणूक ही त्याची जिवंत साक्ष आहे,अशा शब्दांत नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी औशातील नागरिक, गणेश मंडळे, पोलीस प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे कौतुक केले. विशेष म्हणजे, २४ वर्षांपूर्वी ज्या परंपरेची पायाभरणी शहाजी उमाप यांनी स्वतः केली होती, तीच परंपरा तब्बल २४ वर्षांनंतर त्यांना प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला. त्यामुळे यंदाचा औशातील गुलालमुक्त गणेश विसर्जन सोहळा हा केवळ धार्मिक उत्सव न राहता एका सामाजिक संकल्पाच्या यशाची साक्ष ठरला.

२००३ मध्ये रोवले बीज, आज झाला वटवृक्ष

सन २००३ मध्ये शहाजी उमाप हे लातूर शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी होते. त्यावेळी औसा विभागाचा प्रभारही त्यांच्याकडे होता. औसा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून कालिदास सूर्यवंशी कार्यरत होते.

त्या काळात गणेश विसर्जन मिरवणुकीत गुलाल उधळण्याच्या प्रथेमुळे अनेकदा तणावाचे वातावरण निर्माण होत असे. गुलालामुळे होणारी गर्दी, वादविवाद आणि सुरक्षेची वाढणारी चिंता यामुळे पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान असायचे. याच पार्श्वभूमीवर २००३ मध्ये गुलालमुक्त गणेश विसर्जन मिरवणुकीचा विचार पुढे आला. वर्षानुवर्षांची प्रथा एका दिवसात बदलणे सोपे नव्हते. मात्र, दबाव नव्हे तर संवाद, विश्वास आणि जनजागृती या त्रिसूत्रीचा आधार घेत हा प्रयोग सुरू करण्यात आला.

एका हाताने टाळी वाजत नाही !

शहाजी उमाप यांनी स्पष्ट केले की, कोणताही सामाजिक बदल केवळ पोलिसांच्या आदेशाने किंवा कारवाईच्या भीतीने टिकत नाही. त्यासाठी समाजाची साथ आवश्यक असते. याच विचारातून पोलीस प्रशासनासोबत गणेश मंडळांचे पदाधिकारी, नागरिक, लोकप्रतिनिधी आणि पत्रकार यांच्यात सातत्याने संवाद साधण्यात आला. विशेषतः पत्रकार राजू पाटील व त्यांच्या टीमसह अनेकांनी या उपक्रमासाठी जनजागृती केली. सुमारे दोन महिने सातत्याने संवाद साधून मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना गुलालमुक्त विसर्जनाचे महत्त्व पटवून देण्यात आले. अखेर मंडळांनी स्वतःहून या संकल्पाला स्वीकारले आणि एका नव्या परंपरेचा जन्म झाला.

सुंठेवाचून खोकला गेला !

या परिवर्तनाचे वैशिष्ट्य म्हणजे कुठलीही सक्ती, दबाव किंवा कडक कारवाई न करता हा बदल घडवून आणण्यात आला.सुंठेवाचून खोकला गेला या म्हणीप्रमाणे, प्रबोधन आणि विश्वासाच्या बळावर निर्माण झालेली ही परंपरा आजही तितक्याच उत्साहाने सुरू आहे. त्यामुळे गणेश विसर्जनाच्या दिवशी पोलिसांवरील तणावही मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे.

२४ वर्षे… एकही मंडळ नियमाच्या बाहेर नाही!

एखादा नियम एक-दोन वर्षे पाळला जाणे वेगळे आणि सलग २४ वर्षे कोणत्याही मंडळाने परंपरा न मोडणे वेगळे. औशातील गणेश मंडळांनी ही बाब प्रत्यक्षात सिद्ध करून दाखवली आहे.गुलालमुक्त विसर्जनामुळे मिरवणूक अधिक स्वच्छ, शांत आणि सुरक्षित झाली आहे. नागरिकांनाही आपल्या कुटुंबीयांसह मिरवणुकीचा आनंद घेता येतो. कपडे खराब होण्याची चिंता नाही, धुळीचा त्रास कमी आणि वातावरणातही तणावाऐवजी उत्साह दिसून येतो.

प्रयत्नांती परमेश्वर : उमाप यांचा गौरवोद्गार

२४ वर्षांपूर्वी केलेल्या एका प्रयत्नाचे आज मोठ्या सामाजिक परंपरेत रूपांतर झालेले पाहून शहाजी उमाप यांनी समाधान व्यक्त केले. प्रयत्नांती परमेश्वर या उक्तीचा प्रत्यय औशाने दिला असून, हा उपक्रम केवळ औशापुरता मर्यादित न राहता इतर शहरांसाठीही आदर्श ठरू शकतो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. पोलीस प्रशासनाची सुरुवात, नागरिकांचा सहभाग आणि गणेश मंडळांचा स्वेच्छेने स्वीकार या तीन गोष्टींनी २४ वर्षांपूर्वी पेरलेले गुलालमुक्तीचे बीज आज वटवृक्ष झाले आहे. या वेळी लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, २००३ मध्ये औसा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राहिलेले तथा सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक कालिदास सूर्यवंशी, औसा उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक कुमार चौधरी, औसा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शिंदे, विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शहाजी उमाप यांचे औसा येथील भाषण ..

 


Post Views: 62










[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *