[ads1]
![]()
“राज्यात पावसाने 30 ते 35 दिवसांचा खंड दिल्याने खरीप पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट उभे राहिले आहे. केंद्र सरकारच्या निकषांची किंवा 5 ऑक्टोबरच्या नियमांची वाट न पाहता राज्य शासनाने आजपासूनच सर्कलनिहाय प्रत्यक्ष शेतावर जाऊन पंचनामे सुरू केले आहेत. कोणाचे किती नुकसान झाले हे तपासून बळीराजाला तत्काळ थेट आर्थिक मदत दिली जाईल. दुष्काळाच्या सावटाखाली शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ दिली जाणार नाही,” अशी ग्वाही पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. नाशिक जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचलेल्या गिरीश महाजन यांनी पिकांची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी दुष्काळी उपाययोजना, टेंडर प्रक्रियेतील पारदर्शकता आणि संसदेबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या खासदार संजय राऊत यांच्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका केली. सोयाबीनला शेंगाच नाहीत, उत्पादन शून्य; नाशिकमध्ये भीषण दुष्काळी स्थिती शेतातील उभ्या पिकांची विदारक अवस्था मांडताना गिरीश महाजन म्हणाले, “अल निनोच्या प्रभावामुळे सुरुवातीला महिनाभर पाऊस लांबला. त्यानंतर कशीबशी पेरणी झाली, पण पुन्हा 30 ते 35 दिवसांचा मोठा खंड पडला. हायब्रिड ज्वारी अडीच-तीन फुटांवर खुंटली असून त्याला कणसेच लागलेली नाहीत. सोयाबीन काही ठिकाणी हिरवे दिसत असले तरी त्याला एकही शेंग आलेली नाही. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांच्या हाती येणारे उत्पादन अक्षरशः शून्य आहे.” “काही धरणांमध्ये पाणीसाठा असला, तरी अनेक भागांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गुरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ नये म्हणून कालच मंत्रिमंडळात (कॅबिनेट) मुख्यमंत्री महोदयांनी विस्तृत चर्चा करून निर्देश दिले आहेत. ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे, तिथे कृषी विभागामार्फत तत्काळ चारा लागवड करण्याचे आदेश दिले आहेत.” केंद्राच्या तारखांची वाट पाहणार नाही; आजपासूनच सर्कलनिहाय पंचनामे सुरू शेतकऱ्यांना शासकीय मदतीबाबत बोलताना मंत्र्यांनी स्पष्ट केले, “केंद्राचे निकष 5 ऑक्टोबरनंतरचे असले तरी राज्य सरकारने तत्परतेने पावले उचलली आहेत. तालुकास्तरावर न थांबता प्रत्येक सर्कलमध्ये महसूल आणि कृषी विभागाचे अधिकारी आजपासून प्रत्यक्ष स्पॉटवर जाऊन पंचनामे करत आहेत.” “यापूर्वीही आम्ही एनडीआरएफच्या निकषांपेक्षा जास्त मदत शेतकऱ्यांना दिली आहे. मोफत वीज आणि कर्जमाफीचा निर्णय सरकारने आधीच घेतला आहे. आता हे पंचनामे पूर्ण करून त्वरित नुकसान भरपाई दिली जाईल, जेणेकरून शेतकऱ्यांचा सण आणि दिवाळी अंधारात जाणार नाही.” 36 ते 42 टक्के बिलो टेंडर्स; भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्यांची कीव येते शासकीय विकासकामांच्या टेंडर प्रक्रियेवर विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांना त्यांनी आकडेवारीनिशी उत्तर दिले. “घोटीनजीक त्र्यंबकेश्वर रस्त्याचे 300 कोटी रुपयांचे टेंडर तब्बल 36 टक्के बिलो गेले आहे. नगर महापालिकेतील रस्त्यांची कामे 20 ते 26 टक्के बिलो झाली आहेत, तर फायबर केबलचे काम 42 टक्के बिलो गेले आहे. इतकी खुली स्पर्धा आणि पारदर्शकता पूर्वी कधीच नव्हती. एकही काम मॅनेज केलेले नसून पूर्ण पारदर्शकतेने सुरू आहे. विरोधकांनी आणि प्रसारमाध्यमांनी खुशाल एक-एक काम तपासून पाहावे. असे असतानाही बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांच्या बुद्धीची कीव येते.” संसदेचा अपमान करणारे संजय राऊत डोक्यावर पडल्यासारखे वाटतात खासदार संजय राऊत यांनी संसदेबाबत केलेल्या कथित अपशब्दांवरून महाजन यांनी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया दिली. “संसद हे देशातील लोकशाहीचे आणि कायद्याचे सर्वोच्च मंदिर आहे. अशा पवित्र जागेबद्दल घाणेरडी भाषा वापरणारा माणूस डोक्यावर पडल्यासारखाच वाटतो. त्यांच्या बुद्धीची मला दया येते.” “संजय राऊत रोज उठून निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्र्यांबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन विधाने करतात. त्यांचे डोकं पूर्णपणे फिरले असून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या अशा व्यक्तीवर कायद्यानुसार अत्यंत कठोर कारवाई झाली पाहिजे,” अशी आक्रमक मागणी गिरीश महाजन यांनी केली. —————– हेही वाचा… फडणवीस दुष्काळी दौऱ्यावर: कोरड्या दुष्काळाचा जीआर काढणार अन् 2016-17 मधील वंचित शेतकऱ्यांनाही कर्जमाफी देणार- मुख्यमंत्र्यांची घोषणा राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थिती आणि पावसाच्या प्रदीर्घ खंडाने उभी पिके करपून गेल्याच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा थेट बांधावर उतरले आहेत. काल मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर, मुख्यमंत्री आज विदर्भातील अमरावती आणि वाशिम जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते प्रत्यक्ष बांधावर जाऊन पिकांची पाहणी करणार असून, संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. येथे वाचा संपूर्ण बातमी
[ads2]
शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ देणार नाही!:आजपासूनच सर्कलनिहाय पंचनामे; संजय राऊत डोक्यावर पडल्यासारखे वागतात- गिरीश महाजनांचा पलटवार
















Leave a Reply