गोकुळच्या निवडणुकीत महायुतीची मोर्चेबांधणी:चंद्रकांत पाटलांनी सांगितला प्लॅन, 8 ऑक्टोबरला चित्र स्पष्ट होणार

[ads1]


कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीला आता चांगलाच वेग आला आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय हालचाली वाढल्या आहेत. या निवडणुकीत काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वातील आघाडीविरोधात महायुती एकत्रितपणे मैदानात उतरण्याची तयारी करत आहे. याच पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महायुतीची भूमिका स्पष्ट केली. महायुतीतील सर्व पक्ष एकत्र असून गोकुळची निवडणूक लढवण्याचा निर्णय झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ही निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले. ‘राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडी’च्या नावाने लढणार गोकुळची निवडणूक ‘राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडी’ या नावाने लढवण्याचा निर्णय महायुतीने घेतला आहे. जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चा बैठकीत झाली. कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार, यावर पुढील काळात निर्णय होणार आहे. चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, महायुतीमध्ये मोठा भाऊ किंवा छोटा भाऊ असा प्रकार राहिलेला नाही. सर्व पक्ष एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. त्यामुळे गोकुळच्या निवडणुकीत महायुतीची एकजूट दिसणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अंबाबाईच्या दर्शनानंतर प्रचाराला सुरुवात महायुतीच्या प्रचाराचा औपचारिक नारळ कोल्हापूरच्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या दर्शनानंतर फुटणार आहे. महायुतीतील सर्व पक्षांचे नेते एकत्रितपणे अंबाबाईचे दर्शन घेणार असून त्यानंतर निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली जाणार आहे. गोकुळच्या निवडणुकीसाठी 8 ऑक्टोबर हा महत्त्वाचा दिवस ठरणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख त्याच दिवशी आहे. त्यामुळे त्यानंतर निवडणुकीतील अंतिम चित्र स्पष्ट होईल, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. ‘जत्रेत भाऊ हरवला असेल तर त्याने इच्छा सांगावी’ महायुतीतील सर्व पक्ष एकत्र असल्याचे सांगताना चंद्रकांत पाटील यांनी सूचक वक्तव्यही केले. “आम्ही सगळे भाऊ एकत्र आहोत. मात्र जत्रेत एखादा भाऊ हरवला असेल, तर त्यानेही आपली इच्छा बोलून दाखवावी,” असे ते म्हणाले. महायुतीमध्ये जागावाटपावरून काही नाराजी किंवा मतभेद आहेत का, याबाबत विचारले असता त्यांनी सर्व पक्ष एकत्र असल्याचे स्पष्ट केले. तसेच गोकुळसाठीचे निर्णय कोल्हापुरातच घेतले जातील, असेही त्यांनी सांगितले. गेल्या निवडणुकीत सतेज पाटलांचा वरचष्मा गोकुळच्या मागील निवडणुकीत काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी जिल्ह्यातील विविध विरोधकांना एकत्र आणत महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखालील गटाला आव्हान दिले होते. त्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या आघाडीने अनेक वर्षांपासून असलेले महाडिक यांचे वर्चस्व संपुष्टात आणले होते. मात्र, त्यानंतरच्या पाच वर्षांत राज्यातील आणि कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल झाले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर निर्माण झालेल्या नव्या राजकीय समीकरणांचा परिणाम गोकुळच्या निवडणुकीवरही होताना दिसत आहे. आता महायुतीतील घटक पक्ष एकत्र येऊन ‘राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडी’च्या माध्यमातून सतेज पाटील यांच्या गटाला आव्हान देणार आहेत. त्यामुळे गोकुळची आगामी निवडणूक कोल्हापूरच्या राजकारणातील महत्त्वाची लढत ठरण्याची शक्यता आहे. गोकुळ निवडणुकीचे वेळापत्रक उमेदवारी अर्ज विक्री व स्वीकृती: 15 ते 22 सप्टेंबर 2026 अर्जांची छाननी: 23 सप्टेंबर वैध अर्जांची यादी: 24 सप्टेंबर अर्ज माघारी: 25 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर अंतिम उमेदवारांची यादी व चिन्ह वाटप: 8 ऑक्टोबर मतदान: 18 ऑक्टोबर मतमोजणी व निकाल: 19 ऑक्टोबर 2026 हेही वाचा… ‘लोककलेतील श्रीगणेश’ विशेष टपाल तिकिटाचे अनावरण:महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जगभर पोहोचवण्यासाठी आशिष शेलारांचे नागरिकांना आवाहन महाराष्ट्राची समृद्ध लोककला, गणेशोत्सवाची परंपरा आणि सांस्कृतिक वारसा देश-विदेशात पोहोचवण्यासाठी नागरिकांनी टपाल विभागाने तयार केलेल्या ‘लोककलेतील श्रीगणेश’ या विशेष टपाल तिकिटाचा मोठ्या प्रमाणावर वापर करावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विकास मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले. सविस्तर वाचा…

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *