[ads1]
![]()
महाराष्ट्राची समृद्ध लोककला, गणेशोत्सवाची परंपरा आणि सांस्कृतिक वारसा देश-विदेशात पोहोचवण्यासाठी नागरिकांनी टपाल विभागाने तयार केलेल्या ‘लोककलेतील श्रीगणेश’ या विशेष टपाल तिकिटाचा मोठ्या प्रमाणावर वापर करावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विकास मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले. दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात आयोजित ‘लोककलेतील श्रीगणेश’ या विशेष कार्यक्रमात ॲड. शेलार यांच्या हस्ते या विशेष टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र सर्कलचे मुख्य पोस्टमास्टर जनरल रामचंद्र किसन जायभाये, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांच्यासह गणेशभक्त आणि नागरिक उपस्थित होते. गणेशोत्सवाला जागतिक स्तरावर नेण्यासाठी प्रयत्न महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाला युनेस्कोच्या जागतिक अमूर्त वारसा यादीत स्थान मिळवून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे ॲड. आशिष शेलार यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार यासाठी आवश्यक प्रक्रिया आणि माहिती संकलनाचे काम सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आला असून, त्याअनुषंगाने राज्यभर विविध सांस्कृतिक उपक्रम राबविले जात आहेत. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. या उत्सवातून महाराष्ट्राची कला, परंपरा, सामाजिक एकोपा आणि लोकसहभागाचे दर्शन घडते, असे शेलार यांनी सांगितले. लोकसहभाग, कलात्मकता आणि सामाजिक भानाचा संगम ॲड. शेलार म्हणाले की, धार्मिक अधिष्ठान लाभलेल्या गणेशोत्सवामध्ये व्यापक लोकसहभाग, कल्पकता, नावीन्य, कलात्मकता आणि सामाजिक भान यांचा संगम पाहायला मिळतो. महाराष्ट्रातील गणेशोत्सवाच्या प्रथा-परंपरा आता देशाच्या विविध भागांसह परदेशातही पोहोचल्या आहेत. या उत्सवाचे वैश्विक आणि अद्वितीय सांस्कृतिक मूल्य जगासमोर मांडण्यासाठी आवश्यक व्यासपीठ निर्माण करण्याची गरज आहे. याच उद्देशाने राज्य सरकारने मागील वर्षी गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून मान्यता दिली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यभर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन राज्य महोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. रवींद्र नाट्य मंदिरात तीन दिवसांचा शास्त्रीय संगीत महोत्सव आयोजित करण्यात आला. त्याचबरोबर ओडिशा, अंदमान-निकोबार आणि दुबई येथेही राज्य महोत्सवाच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आल्याची माहिती शेलार यांनी दिली. सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून राज्यभर दरवर्षी एक हजारांहून अधिक कार्यक्रम आयोजित केले जातात. महाराष्ट्राचा समृद्ध सांस्कृतिक वारसा सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणे, त्याचे जतन आणि संवर्धन करणे तसेच हा वारसा जागतिक स्तरावर पोहोचवणे हा या उपक्रमांचा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. ‘लोककलेतील श्रीगणेश’ टपाल तिकिटाचे महत्त्व महाराष्ट्र सर्कलचे मुख्य पोस्टमास्टर जनरल रामचंद्र किसन जायभाये यांनी या विशेष टपाल तिकिटामागील संकल्पनेची माहिती दिली. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी १८९३ मध्ये सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाने समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याचे काम केले. सांस्कृतिक कार्यक्रम, जनजागृती तसेच स्वातंत्र्यलढ्यातही सार्वजनिक गणेशोत्सवाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. आज गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. त्यामुळे या परंपरेचे दस्तऐवजीकरण आणि जतन करण्यासाठी ‘लोककलेतील श्रीगणेश’ या संकल्पनेवरील ‘कस्टमाइज्ड माय स्टॅम्प’ महत्त्वाचे फिलाटेलिक स्मृतिचिन्ह ठरेल, असे जायभाये यांनी सांगितले. टपाल तिकिटांच्या माध्यमातून देशातील कला, संस्कृती, परंपरा आणि इतिहासाचे जतन व प्रसारण करण्याचे काम टपाल विभागाकडून केले जाते. या उपक्रमामुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे कायमस्वरूपी जतन होण्यास मदत होईल. तसेच नव्या पिढीमध्ये टपाल तिकिटे आणि फिलाटेलीविषयी आवड निर्माण करण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल, असेही त्यांनी नमूद केले. युनेस्कोसाठी माहिती संकलन सुरू गणेशोत्सवाला युनेस्कोच्या जागतिक अमूर्त वारसा यादीत स्थान मिळवून देण्यासाठी आवश्यक माहिती संकलनाचे काम सुरू असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी दिली. कार्यक्रमाचे स्वागतपर प्रास्ताविकही त्यांनी केले. ‘लोककलेतील श्रीगणेश’ या विशेष टपाल तिकिटाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या लोककला आणि गणेशोत्सवाच्या सांस्कृतिक परंपरेला व्यापक व्यासपीठ मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या विशेष टपाल तिकिटाचा वापर करून महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा देश-विदेशात पोहोचवण्यास हातभार लावावा, असे आवाहन करण्यात आले. हेही वाचा…. साताऱ्यात दुचाकी चोरी करून मिरजेत लपला:दोन दिवसांच्या पाळतीनंतर सराईत चोरटा जेरबंद, 6 दुचाकी जप्त सातारा शहरात दुचाकी चोरी करून मिरजेत लपून बसलेल्या सराईत चोरट्याचा सातारा शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने शोध घेत त्याला अटक केली. अभिजीत भरत पवार (वय 32, रा. शेरेवाडी, ता. माण) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून चोरीच्या सहा दुचाकी, असा एकूण २ लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. सविस्तर वाचा….
[ads2]
‘लोककलेतील श्रीगणेश’ विशेष टपाल तिकिटाचे अनावरण:महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जगभर पोहोचवण्यासाठी आशिष शेलारांचे नागरिकांना आवाहन
















Leave a Reply