[ads1]
नांदेड (प्रतिनिधी):- श्री गणेश विसर्जनासाठी गोदावरी नदीकाठी गेलेल्या अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या दोन तरुणांचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी दुपारी विष्णूपुरी येथील काळेश्वर घाट परिसरात घडली. गणेश विसर्जनानंतर पोहण्यासाठी नदीत उतरलेल्या दोघांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.
मृतांमध्ये बजरंग बिरू येडूरे (वय १८, रा. किनी, ता. देगलूर) आणि दीपक मारुती सोळुंके (वय २०, रा. बाऱ्हाळी, ता. मुखेड) यांचा समावेश आहे. दोघेही वाडी पाटीजवळील मातोश्री प्रतिष्ठान अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होते.
रविवारी गणेश विसर्जनाच्या निमित्ताने दोन्ही तरुण काळेश्वर मंदिर परिसरातील गोदावरी नदीकाठी आले होते. गणेशमूर्तीचे विसर्जन केल्यानंतर त्यांनी पोहण्यासाठी नदीपात्रात प्रवेश केला. मात्र, नदीतील पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले.
घटनेची माहिती मिळताच जीवरक्षक दलाला पाचारण करण्यात आले. जीवरक्षकांनी शोधमोहीम राबवत बजरंग येडूरे याचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. दरम्यान, दीपक सोळुंके याचा शोध घेण्याचे काम सुरू होते. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी तसेच विष्णूपुरीचे पोलीस पाटील घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेची नोंद घेत पुढील कार्यवाही सुरू केली असून, दोन्ही तरुणांच्या नातेवाईकांना घटनेची माहिती देण्यात आली आहे.
गणेश विसर्जनाच्या उत्साहात नदीपात्रात पोहण्याचा मोह दोन कुटुंबांसाठी काळाचा घाला ठरला. नदीपात्रात उतरताना पाण्याची खोली, प्रवाह आणि सुरक्षिततेच्या उपायांचा विचार करणे आवश्यक असल्याचे या दुर्घटनेने पुन्हा अधोरेखित केले आहे.

Post Views: 124
[ads2]
















Leave a Reply