[ads1]
![]()
पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या आदेशानुसार, शहरातील पेइंग गेस्ट (पीजी) सुविधा, हॉस्टेल आणि भंगार दुकानांविरोधात अग्निशमन दलाने विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. मुख्य अग्निशमन अधिकारी गणेश सोनवणे, अग्निशमन अधिकारी प्रभाकर उमाटकर आणि बांधकाम विभागाचे अभियंता विश्वजीत वाघमोडे यांच्या पथकांनी विविध भागांत पाहणी केली. या तपासणीत काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भंगार साठवणारी दुकाने आढळली. या युनिटमध्ये अग्निसुरक्षेची साधने, अग्निशमन यंत्रणा, बांधकाम परवानगी आणि योग्य वीज वितरण व्यवस्था नव्हती. प्लास्टिक, कागद, स्टील, लोखंड, लाकूड, पत्रे आणि इतर ज्वलनशील वस्तूंचा मोठा साठा तिथे होता. अनेक ठिकाणी पत्र्याचे शेड उभारून निवासी भागात व्यवसाय सुरू असल्याचेही समोर आले. वडगाव बुद्रुक, नऱ्हे आणि धायरी परिसरातील १३ पीजी आणि सात भंगार दुकानांची पथकाने पाहणी केली. बीडीपी क्षेत्र, अरुंद रस्ते, अनधिकृत वीज पुरवठा, ड्रेनेज, कर आकारणी आणि अग्निशमन सुविधांचा अभाव अशा अनेक त्रुटी पथकाला आढळल्या. काही आस्थापना भाडेतत्त्वावरील जागेत सुरू असल्याने त्यांच्यावर कोणतेही नियंत्रण नसल्याचेही दिसून आले. तपासणीदरम्यान, परवान्यांची कागदपत्रे सादर न करणाऱ्या मालकांना तत्काळ खुलासा देण्यास सांगितले. आग लागल्यास प्रवेशमार्ग उपलब्ध असावेत, आपत्कालीन बाहेर पडण्याची व्यवस्था असावी आणि अग्निशामक उपकरणे सुरू ठेवावीत, अशा सूचनाही देण्यात आल्या. क्षेत्रीय कार्यालयांना पुढील कारवाईसाठी निर्देश दिले आहेत. महापालिकेने संबंधितांना त्रुटी दूर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नियमांचे पालन न करणाऱ्या आस्थापनांवर गुन्हे दाखल करून त्या सील करण्याचा इशाराही दिला आहे. ही मोहीम पुढेही नियमितपणे सुरू राहणार असून, नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले.
[ads2]
पुण्यात पीजी-हॉस्टेल, भंगार दुकानांची तपासणी सुरू:नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा, नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य
















Leave a Reply