आईच्या नावावरील जमीन विकली म्हणून संताप:वृद्ध आई-वडिलांना मुलांची मारहाण, VIDEO व्हायरल

[ads1]


पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात वृद्ध आई-वडिलांना त्यांच्या दोन मुलांनी लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आईच्या नावावरील जमीन विकल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून दोन्ही मुलांनी आई-वडिलांना रस्त्यावरच बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी इंदापूर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी, 30 ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी येथे घडली. संजय तुकाराम राऊत आणि राजेंद्र तुकाराम राऊत अशी गुन्हा दाखल झालेल्या दोन्ही मुलांची नावे आहेत. तर तुकाराम किसन राऊत (वय 65) यांनी आपल्या मुलांविरोधात पोलिसांकडे तक्रार दिली आहे. पत्नीसोबत फिरायला गेले असताना घडली घटना तुकाराम राऊत हे पत्नी अंजना यांच्यासोबत सरस्वतीनगर परिसरात राहतात. त्यांची दोन्ही मुले स्वतंत्रपणे आपल्या कुटुंबासह राहतात. रविवारी सायंकाळी तुकाराम राऊत हे आपली आजारी पत्नी अंजना यांच्यासोबत तरंगवाडी गावच्या हद्दीत फिरण्यासाठी गेले होते. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास दोन्ही मुले टाटा नेक्सॉन कारमधून त्या ठिकाणी आली. आई अंजना यांच्या नावावरील जमीन का विकली, असा जाब दोघांनी आई-वडिलांना विचारला. याच मुद्द्यावरून त्यांच्यात वाद झाला आणि त्यानंतर परिस्थिती चिघळल्याचा आरोप फिर्यादीमध्ये करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, दोन्ही मुलांनी वृद्ध आई-वडिलांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच विकलेली जमीन परत घ्या, अन्यथा परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिल्याचाही आरोप आहे. या मारहाणीत तुकाराम राऊत यांच्या पाठीत, तोंडावर, दोन्ही मांडीवर आणि डाव्या खांद्याला दुखापत झाली. तर त्यांची पत्नी अंजना यांच्या उजव्या हाताच्या मनगटाजवळ आणि कमरेला मार लागल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. व्हिडीओमध्ये काय दिसते? या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये वृद्ध दाम्पत्य रस्त्यावर दिसत असून जवळ एक पांढऱ्या रंगाची कार उभी आहे. दोन व्यक्ती त्यांच्यासमोर उभ्या असल्याचे दिसते. त्यापैकी एका व्यक्तीच्या हातात काठी असून वृद्ध व्यक्तीला मारहाण होत असल्याचे दृश्य व्हिडीओमध्ये दिसत आहे. या वेळी वृद्ध महिला आपल्या पतीला मारू नका, अशी विनंती करत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, भांडणाचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी जमा झाले. त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. तुकाराम राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संजय राऊत आणि राजेंद्र राऊत यांच्याविरोधात इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत. हेही वाचा.. पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणी पद्मसिंह पाटील यांच्या निर्दोष सुटकेला हायकोर्टात आव्हान:आरोपींना नोटीस, दोन दशकांनंतरच्या लढ्याला नवे वळण काँग्रेसचे तत्कालीन नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या हत्येप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने दिलेल्या निर्दोष सुटकेच्या निर्णयाविरोधात निंबाळकर कुटुंबीयांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून आरोप असलेले राज्याचे माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह इतर आरोपींना निर्दोष ठरवण्यात आले होते. आता या निर्णयाला आव्हान देणाऱ्या अपिलाची उच्च न्यायालयाने दखल घेत सर्व संबंधित प्रतिवादींना नोटीस बजावून त्यांची बाजू स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.सविस्तर वाचा..

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *