[ads1]
![]()
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा अमृत महोत्सवी सोहळा मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावात मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात एकनाथ खडसे यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी राजकीय प्रवासातील जुन्या आठवणींना उजळा दिला. दरम्यान या सोहळ्यात बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, पूर्वीच्या काळात विरोधी पक्षात राजकीय मतभेद असत, परंतु वैयक्तिक द्वेष किंवा मतभेद नसत. मी अनेक वर्षे भारतीय जनता पक्षाचे प्रामाणिकपणे काम केले. मात्र, राजकीय प्रवासात काही चढ-उतार आले. अशा कठीण काळात आदरणीय शरद पवार यांनी मला आसरा दिला. काही काळ मला ब्रेक मिळाला होता, परंतु शरद पवारांनी मला पुन्हा राजकीय उजेडात आणले. …तेव्हा आम्ही संघटन मजबूत केले एकनाथ खडसे म्हणाले की, स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि माझी मैत्री संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. 2000 ते 2014 या काळात राज्यात भाजपचे सरकार नव्हते, तरीही आम्ही संघटन मजबूत केले आणि त्या भक्कम पायावरच भाजपला आजचे चांगले दिवस आले आहेत. स्वर्गीय प्रमोद महाजन यांनी मला नेहमी बळकटी दिली. मात्र, हल्लीचे बदललेले राजकारण पाहून मला तीव्र वेदना होतात. प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्या काळातील राजकारण आणि आजचे राजकारण यात खूप मोठा फरक पडला आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. सक्षम विरोधी पक्षनेता कसा असावा, हे नाथाभाऊंनी दाखवून दिले- जयंत पाटील जयंत पाटील म्हणाले की, उत्तर महाराष्ट्रात भाजप पक्षाचा विस्तार करण्यासाठी नाथाभाऊंनी अविरत मेहनत घेतली, हे आम्ही जवळून पाहिले आहे. ते विधानसभेत असताना दिलीप वळसे पाटील आणि इतर अध्यक्षांकडे आम्ही तक्रार करायचो की, तुम्ही नाथाभाऊंना जास्त वेळ बोलू देता, त्यांना थांबवत नाही. पण खडसे साहेबांचे अभ्यासपूर्ण भाषण थांबवणे कोणालाही शक्य नव्हते. सक्षम विरोधी पक्षनेता म्हणून कसे काम करायचे, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. अनेक सिंचन योजना पूर्णत्वास नेल्या जयंत पाटील पुढे म्हणाले की, उत्तर महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी अशक्य वाटणाऱ्या अनेक सिंचन योजना पूर्णत्वास नेल्या, ज्यामुळे दूरवरच्या शेतकऱ्यांना पाणी मिळाले. नाथाभाऊंनी संपूर्ण महाराष्ट्रात माणसे जोडली आणि ज्या पक्षात राहिले, तिथे निष्ठेने सेवा केली. दुर्दैवाने तिथे मतभेद झाल्याने त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. नाथाभाऊंसारखा लोकनेता होणे पुन्हा शक्य नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले. सरकारवर तुटून पडणारा आक्रमक आणि संघर्षमय नेता- दिलीप वळसे पाटील दिलीप वळसे पाटील म्हणाले की, सरकारवर तुटून पडणारा आणि अन्यायाविरुद्ध लढणारा नेता म्हणजे नाथाभाऊ! 1990 मध्ये आम्ही एकत्रच विधानसभेत निवडून आलो होतो. मी अध्यक्ष असताना ते विरोधी पक्षनेते होते आणि अत्यंत आक्रमकपणे जनतेचे प्रश्न मांडायचे. आज रक्षा खडसे आणि रोहिणी खडसे समाजकार्यात सक्रिय आहेत, ही आनंदाची बाब आहे. नाथाभाऊंनी शरद पवारांचा राजकीय आदर्श डोळ्यांसमोर ठेवावा आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
[ads2]
मुक्ताईनगरात खडसेंचा अमृत महोत्सव:शरद पवारांनी मला अंधारातून उजेडात आणले- एकनाथ खडसे, नाथाभाऊंनी भाजप वाढवण्यासाठी मेहनत घेतली- जयंत पाटील
















Leave a Reply