नांदेडच्या विमानतळ पोलिसांचे डोके फिरवणारा ड्युटी फॉर्म्युला!

[ads1]

नांदेड (प्रतीनिधी) –अहो, २४ तासांच्या दिवसात सामान्य माणसाने नेमकी किती तास नोकरी करावी? ८ तास? फार तर फार १२ तास? पण नांदेडच्या विमानतळ पोलीस ठाण्यात मात्र कायदे, मानवाधिकार आणि विज्ञानाचे सर्व नियम धाब्यावर बसवणारा एक नवीन आणि अजब ड्युटीचा पॅटर्न शोधून काढण्यात आला आहे. विमानतळ पोलीस ठाण्यातील पोलीस आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांना थेट रोबोट समजून २४ तासांत तब्बल १८ तास ड्युटीवर राबवण्याचा भीमपराक्रम येथे लीलया पार पाडला जात आहे. या अनोख्या चक्रव्यूहामुळे आता पोलिसांचे डोके पार फिरण्याची वेळ आली आहे.

असा आहे हजेरी मेजरचा मास्टरस्ट्रोक फॉर्म्युला! या पोलीस ठाण्यात ड्युटीची अशी काही अजब गणिते मांडली गेली आहेत, जी आयन्स्टाईनलाही समजली नसती. सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत पहिली ड्युटी, त्यानंतर अवघ्या ६ तासांच्या विश्रांतीनंतर रात्री ९ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजेपर्यंत दुसरी ड्युटी, आणि पुन्हा त्याच दिवशी दुपारी ३ ते रात्री ९ वाजेपर्यंत तिसरी ड्युटी ! म्हणजेच काय, तर २४ तासांच्या चक्रात घरच्यांपेक्षा पोलीस ठाण्याचा आणि हजेरी मेजरचा चेहराच १८ तास पाहावा लागत आहे. या अमानुष ड्युटीच्या खेळाविरोधात दाद कोणाकडे मागायची, हाच आता मोठा प्रश्न आहे.

एच एस जे चे गुढ आणि हजेरी मेजरचा विशेष थाट! बाहेर पडणाऱ्या चर्चेनुसार, या विमानतळ पोलीस ठाण्यात सध्या HSJ नावाचे एक रहस्यमयी चक्र चालते आणि संपूर्ण पोलीस स्टेशन याच चक्रामध्ये अडकले आहे. या चक्राचे मुख्य सूत्रधार म्हणजेच हजेरी मेजर महोदय ! महिला पोलीस कर्मचाऱ्यांशी नोकरीबाबतचा व्यवहार करताना हे मेजर साहेब अत्यंत ‘विचारपूर्वक’ पावले टाकत असतात, अशी जोरदार चर्चा आहे. मात्र, हजेरी मेजरच्या या अति-विचारपूर्वक वागणुकीला कंटाळून अखेर काही धाडसी महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी थेट नांदेडच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आणि आमच्या पोलीस ठाण्यातील हजेरी मेजर बदलून टाकण्याची कळकळीची विनंती केली.

तक्रार झाली, पण मेजर साहेबांची खुर्ची अमर! महिला पोलिसांनी थेट पोलीस अधीक्षकांकडे जाऊन हजेरी मेजरविरोधात गाऱ्हाणे मांडणे ही अत्यंत गंभीर आणि नक्कीच काहीतरी मोठा अर्थ असणारी बाब आहे. पण नवल म्हणजे, महिला पोलिसांच्या या आर्त हाकेनंतरही या लाडक्या हजेरी मेजरचा बालही बाका झालेला नाही. वृत्तपत्रात वृत्त आले, वरिष्ठ दरबारी उंबरठे झिजवले गेले, तरीही हजेरी मेजर आपल्या खुर्चीला फेविकॉल लावून बसले आहेत. हजेरी मेजर अद्यापही बदलले न गेल्याने, आखिर मेजर साहेबांच्या मागे नक्की कोणाचा वरदहस्त आहे? असा खोचक सवाल आता विचारला जात आहे.

आता विमानतळ पोलीस ठाण्यातील पोलिसांना २४ तासांत १८ तास पिळवटून काढणारे हे जादुई चक्र कोण मोडणार ? पोलीस अधीक्षकांना भेटूनही जर हजेरी मेजर बदलला जात नसेल, तर या व्यवस्थेचे डोकं फिरलंय की हजेरी मेजरचे पाय खूप खोलवर रुजले आहेत, याचे उत्तर नांदेडकरांना लवकरच मिळण्याची अपेक्षा आहे!

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *