सोशल मीडिया मैत्रीतून विनयभंग!:शेवगावच्या तरुणाचा हिंगोलीतील सेनगावमध्ये येऊन तरुणीला त्रास; पोलिसांकडून गुन्हा नोंद
![]()
इस्टाग्रामवर ओळख झालेल्या तरुणाने सेनगाव तालुक्यात येऊन तरुणीचा पाठलाग करून विनयभंग केल्याच्या आरोपावरून खडकामडका (जि. अहिल्यानगर) येथील एका तरुणावर सेनगाव पोलिस ठाण्यात रविवारी ता. 4 रात्री गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी त्या तरुणाला ताब्यात घेण्याची तयारी चालवली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील एका तरुणीची इन्स्टाग्रामवर खडकामडका येथील विष्णू करांडे या तरुणाशी ओळख झाली. त्यानंतर ते सतत बोलत होते. त्यानंतर त्याने तरुणीसोबत गोड बोलून तिच्या नावाचे नवीन इन्स्टाग्राम अकाऊंट सुरु करून तिचे छाचाचित्र डाऊनलोड करून घेतले. मात्र सदर तरुणीने आक्षेप घेतला नसल्याने तरुणी प्रेमात पडल्याचे गृहीत धरून विष्णू थेट सेनगाव तालुक्यात पोहोचला. यावेळी त्याने तरुणीला सेनगाव तालुक्यात आल्याचे सांगितले. सदर तरुणी घराबाहेर असतांना विष्णू तिचा शोध घेऊन तिच्याजवळ आला. त्याने तरुणीसोबत गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. दरम्यान, अचानक झालेल्या या प्रकारामुळे तरुणीने आरडाओरड केली. यामुळे तरुणीचा भाऊ घटनास्थळी आला. त्याने विष्णू याला जाब विचारला असता विष्णूने त्याला शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली अन तेथून निघून गेला. या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने सदर प्रकार तिच्या कुटुंबियांना सांगितला. दरम्यान, तिच्या कुटुंबियांनी तरुणीला सोबत घेऊन थेट सेनगाव पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी विष्णू करांडे (रा. खडकामडका, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर) याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक मस्के, उपनिरीक्षक नागनाथ पाटील, जमादार सुभाष चव्हाण यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर पोलिसांनी विष्णू यास ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.
