नांदेड़ प्रकरण | २४ तासात चौथा खून
Oplus_131072
नांदेड | प्रतिनिधी
ई-स्क्वेअर परिसरात सुरू असलेल्या टोळी संघर्षाने पुन्हा एकदा भीषण रूप धारण केले असून, अवघ्या 24 तासांत चौथ्या खुनाची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी रात्री उशिरा अंदाजे 35 वर्षीय रणजीत सिंह तबेलेवाले उर्फ ‘रज्या मुंबई’ यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला.
प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने त्यांच्या चेहऱ्यावर व शरीरावर सपासप वार केले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत.
विशेष म्हणजे, या घटनेच्या अवघ्या 24 तासांपूर्वीच याच परिसरात दोन आणि रुग्णालयात एक अशा तीन खुनांच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे सलग घडणाऱ्या या हिंसक प्रकारांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
टोळ्यांमधील जुने वाद, वर्चस्वाची लढाई किंवा सूडभावना या कारणांमुळे हे हल्ले होत असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, या प्रकरणातील काही संशयितांनी स्वतःहून पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याची माहिती विश्वासार्ह सूत्रांकडून मिळाली आहे.
सध्या पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, संशयितांची चौकशी आणि परिसरातील गुन्हेगारी हालचालींवर लक्ष ठेवण्याचे काम सुरू आहे. अवघ्या 24 तासांत चौथा खून झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी होत आहे.
