बारामती पोटनिवडणुकीची रंगत वाढली:उपमख्यमंत्री सुनेत्रा पवारांना आतापर्यंत तब्बल 19 उमेदवारांचे आव्हान; काँग्रेस आज उमेदवार देणार
![]()
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीची रंगत दिवसागणिक वाढत आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार स्वतः या निवडणुकीसाठी मैदानात उतरणार आहेत. त्यांच्याविरोधात आतापर्यंत 19 उमेदवारांनी आपले शड्डू ठोकलेत. काँग्रेसही आज किंवा उद्या आपला उमेदवार देण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही लढत अधिकच रंगतदार होण्याची शक्यता आहे. बारामती विधानसभेची जागा अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूमुळे रिक्त झाली आहे. या ठिकाणी 23 एप्रिल रोजी पोटनिवडणूक होणार आहे. त्यानंतर 4 मे रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार उद्या सोमवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज भरतील. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक बडे नेते हजर राहण्याची शक्यता आहे. पण त्यापूर्वीच या निवडणुकीसाठी तब्बल 19 उमेदवारांनी आपले अर्ज भरलेत. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके सुद्धा ही निवडणूक लढवणार आहेत. पण ते एखाद्या पक्षाच्या निशाणीवर लढणार की अपक्ष म्हणून मैदानात उतरणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही. काँग्रेस आज उमेदवार देणार? दुसरीकडे, काँग्रेसनेही या निवडणुकीत आपला उमेदवार देण्याची घोषणा केली आहे. पण त्याचवेळी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने आपला उमेदवार दिला तर त्याला पाठिंबा देण्याचाही निर्णय घेतला आहे. पण शरद पवार गटाने यापूर्वीच सुनेत्रा पवारांविरोधात उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. सुनेत्रा पवारांनी उद्धव ठाकरेंना फोन केल्यामुळे शिवसेनेचा ठाकरे गटही या निवडणुकीपासून दूर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसची भूमिका पाहता देशातील हा सर्वात जुना पक्ष आपल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा आजच करण्याची जास्त शक्यता आहे. अजित पवारांच्या निधनामुळे बारामतीची पोटनिवडणूक ही एकतर्फी होण्याची जास्त शक्यता आहे. पण या निवडणुकीत 20 किंवा त्याहून अधिक उमेदवार मैदानात उतरणार असल्यामुळे त्यात काहीशी चुरस वाढण्याची शक्यता आहे. खाली वाचा कोण-कोण आहे मैदानात? बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविरोधात उमेदवारांची एक मोठी फळी उभी राहिल्याचे चित्र दिसत आहे. यात हिंदुस्तान जनता पार्टीचे सतिश कदम, न्यू राष्ट्रीय समाज पार्टीचे राघू घटुकडे, राष्ट्रीय किसान बहूजन पार्टीचे अरूण निटुरे यांच्यासह सागर भिसे, गजानन गवळी, त्रिशाला कांबळे, दिलीप अळोणी, दत्तात्रेय बेदरे, मिथून आटोळे, रजाक मुलाणी, संदीप खरात, विलास होळकर, अभिजीत बिचुकले, अनिल तुपे, संकेत गावडे, दादा थोरात आणि अभिजीत कांबळे असे अनेक अपक्ष उमेदवारही रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे बारामतीतील ही लढत बहुरंगी होत असून मतदारांसमोर अनेक पर्याय उभे राहिल्याने निवडणूक अधिक चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत.
