नांदेड – येथील एन.ई.एस. सायन्स कॉलेजमधील भूशास्त्र विभागाच्या वतीने ‘जागतिक जल दिन’ निमित्त विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव आणि जलसाक्षरता निर्माण करण्यासाठी एका विशेष प्रश्नमंजुषा स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. “सामाजिक कार्यासाठी पाणी” (Water for Social Cause) या संकल्पनेवर आधारित या उपक्रमात महाविद्यालयातील विविध शाखांच्या सुमारे २०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. भूशास्त्र विभागाचे अधिव्याख्याते तथा स्पर्धेचे समन्वयक प्रा. आकाश करंडे यांनी या कार्यक्रमाचे तांत्रिक व रचनात्मक नियोजन केले, तर विभाग प्रमुख डॉ. गायकवाड आणि प्रा एकनाथ खिल्लारे यांनी या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी विशेष मार्गदर्शन व नेतृत्व प्रदान केले.
या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. पी. शिंदे अध्यक्षस्थानी तर नांदेड एज्युकेशन सोसायटीचे सदस्य कॉम्रेड प्रदीप नागापूरकर हे प्रमुख उपस्थिती म्हणून हजर होते यासोबतच उपप्राचार्य एकनाथ खिल्लारे, भूशास्त्र विभाग प्रमुख डॉ. गायकवाड, प्रा. डॉ. मराठे, प्रा. डॉ. जाधव, प्रा. करंडे आणि प्रा. चोंडे यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना प्रमाणपत्र व बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये सादिया नुसरत हिने प्रथम क्रमांक पटकावला, तर द्वितीय क्रमांक सतीश मोखेडे व पूर्वा सुरोशे यांनी विभागून मिळवला. तृतीय क्रमांकाचे मानकरी वैभव वाघमारे व सईदा अतयाब हे ठरले.
याप्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. एल. पी. शिंदे यांनी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले. “केवळ पारितोषिक मिळवणे हा या स्पर्धेचा उद्देश नसून, विजयी विद्यार्थ्यांनी भविष्यात समाजासाठी खऱ्या अर्थाने ‘जलदूत’ म्हणून काम करावे आणि जलसंधारणाचा संदेश घराघरात पोहोचवावा,” अशी आग्रही भावना त्यांनी यावेळी अधोरेखित केली. सहभागी सर्व २०० विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर डिजिटल ई-प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. प्रा. आकाश करंडे आणि डॉ. किशोर गायकवाड यांच्यामुळे हा कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात पार पडला, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये जलजागृतीचा एक नवीन संदेश पोहोचला आहे.
Post Views: 35
