दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मोदी मैदानावर फटाका बाजार भरविण्याची तयारी दोन स्वतंत्र बाजारांऐवजी एकाच ठिकाणी आयोजन केल्यास खर्चात मोठी बचत; बचतीतून दुष्काळग्रस्तांना मदत करण्याची व्यापाऱ्यांची मागणी नांदेड : प्रतिनिधी जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकरी आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत. या पार्श्वभूमीवर दिवाळीचा फटाका बाजार हिंगोली गेट मैदान आणि इंदिरा गांधी मैदान येथे स्वतंत्रपणे भरविण्याऐवजी मोदी मैदानावर एकाच ठिकाणी भरविण्याच्या प्रस्तावाचा प्रशासनाने सकारात्मक विचार करावा, अशी मागणी पुढे येत आहे. दोन स्वतंत्र ठिकाणी फटाका बाजार उभारण्यासाठी व्यापाऱ्यांना विविध व्यवस्थांवर मिळून जवळपास एक कोटी रुपयांपर्यंत खर्च करावा लागत असल्याचे सांगण्यात येते. याउलट, मोदी मैदानावर एकाच ठिकाणी बाजार भरविल्यास हा खर्च सुमारे दहा लाख रुपयांपर्यंत कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांची मोठी बचत होऊन ग्राहकांनाही दिलासा मिळू शकतो. दरम्यान, हिंगोली येथील फटाक्यांच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर बाजाराच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे. अग्निसुरक्षा व्यवस्था, आपत्कालीन मार्ग, मोकळी जागा, गर्दीचे नियोजन आणि आवश्यक परवानग्या यांची पूर्तता करूनच प्रशासनाने बाजाराच्या आयोजनाबाबत निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. फटाका बाजाराच्या एकत्रित आयोजनामुळे होणारी आर्थिक बचत केवळ व्यावसायिक फायद्यापुरती मर्यादित न ठेवता तिचा सामाजिक कार्यासाठीही उपयोग करता येऊ शकतो. दुष्काळग्रस्त परिस्थितीत व्यापाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत पुढाकार घ्यावा, अशी भूमिका काही व्यापाऱ्यांकडून मांडली जात आहे. बचतीचा पैसा दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी द्या! फटाका बाजारासाठी होणारा अनावश्यक खर्च टाळून वाचलेली रक्कम शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी आणि गोरगरीब कुटुंबांच्या मदतीसाठी वापरावी. दुष्काळामुळे जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर होत असताना पशुपक्ष्यांसाठीही चारा आणि पाण्याची व्यवस्था करण्यासाठी व्यापाऱ्यांनी पुढाकार घ्यावा. दोन स्वतंत्र बाजारांऐवजी एकाच ठिकाणी बाजार भरवून होणाऱ्या संभाव्य बचतीतून गरजूंपर्यंत मदत पोहोचविल्यास दिवाळीच्या आनंदाला सामाजिक बांधिलकीची जोड मिळेल, अशी मागणी काही व्यापाऱ्यांकडून होत आहे. What do you feel about this post? 0% Like 0% Love 0% Happy 0% Haha 0% Sad 0% Angry Views: 2,569 Facebook WhatsApp Twitter/X LinkedIn Post navigation श्रीराम रेफ्रिजरेशनचा यशस्वी प्रवास; दुग्धव्यवसाय क्षेत्रात विश्वासार्ह ब्रँड!