नांदेड (प्रतिनिधी)- डिजिटल अरेस्ट च्या नावाखाली भीती निर्माण करून आर्थिक फसवणूक करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून मुंबईतील एका तरुणीची तब्बल ३२ लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात नांदेडमधील चार तरुणांचा सहभाग असल्याचे मुंबई पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
कसा रचला कट?
प्राप्त माहितीनुसार, मुंबईतील तरुणीला अज्ञात व्यक्तींकडून फोन करण्यात आला. फोन करणाऱ्यांनी स्वतःची ओळख “चेन्नई पोलीस” अशी करून दिली.
फोनवरून तरुणीला सांगण्यात आले की, गुजरातमध्ये पकडलेल्या एका अतिरेक्याजवळ तिच्या आजीचे एटीएम कार्ड सापडले असून त्यामुळे तिच्या कुटुंबाचा देशद्रोही कारवायांशी संबंध असल्याचा संशय आहे. या धमकीमुळे घाबरलेल्या तरुणीला आरोपींनी डिजिटल अरेस्ट मध्ये असल्याचे सांगत तिच्यावर मानसिक दबाव आणला.
मोबाईल ॲप डाउनलोड करून घेत फसवणूक
आरोपींनी तरुणीला RTE नावाचे ॲप मोबाईलमध्ये डाउनलोड करण्यास भाग पाडले. त्यानंतर व्हिडिओ कॉल व ऑनलाइन नियंत्रणाद्वारे तिच्या बँक व्यवहारांवर लक्ष ठेवून टप्प्याटप्प्याने ३२ लाख रुपये हस्तांतरित करून घेतले.घाबरलेल्या तरुणीने परदेशात राहणाऱ्या आपल्या वडिलांना बोलावून घेतले. त्यांनी संपूर्ण प्रकार समजून घेतल्यानंतर प्रकरण मुंबई पोलिसांकडे पोहोचले.
नांदेडच्या चौघांची नावे समोर
मुंबई सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात खालील आरोपींचा सहभाग उघड झाला —
- निलेश प्रभाकर वासमवार (वय २५, साईनगर सिडको, नांदेड)
- शुभम संजय जोगदंड (वय २५, शक्तिनगर इतवारा, नांदेड)
- अजय देविदास भोसले (वय २५, लोहार गल्ली, नांदेड)
- सिद्धार्थ दिलीप जोंधळे (वय १९, शक्तिनगर इतवारा, नांदेड)
मुंबई पोलिसांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल खेत्रे, पोलीस अंमलदार किरण गवळी, नितेश सूर्यवंशी व मजाज खान यांच्या पथकाने नांदेडमध्ये येऊन चौघांना ताब्यात घेतले.
गुन्हा दाखल
मुंबईच्या उत्तर विभाग सायबर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील विविध कलमे तसेच माहिती तंत्रज्ञान (IT) कायद्याच्या कलम 66 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डिजिटल अरेस्ट म्हणजे फसवणुकीचा नवा प्रकार
मुंबई पोलिसांनी नागरिकांना स्पष्ट इशारा दिला आहे की
डिजिटल अरेस्ट असा कोणताही कायदेशीर प्रकार अस्तित्वात नाही.गुन्हेगार पोलीस, CBI किंवा सरकारी अधिकारी असल्याचे भासवून लोकांना घाबरवतात आणि पैसे उकळतात.
नागरिकांना आवाहन
वास्तव न्यूज लाईव्हच्या वाचकांना आवाहन —
- अज्ञात कॉलवर विश्वास ठेवू नका
- कोणतेही ॲप डाउनलोड करू नका
- OTP, बँक माहिती किंवा पैसे ट्रान्सफर करू नका
- संशयास्पद कॉल आल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधा
डिजिटल फसवणुकीमुळे आर्थिक नुकसानासोबत मानसिक ताणही निर्माण होऊ शकतो. सतर्क राहणे हाच सर्वोत्तम बचाव आहे.
Post Views: 107
