“मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत ऐकवलेली ऑडिओ क्लिप ही पूर्णपणे बनावट, डुप्लिकेट आणि भंकस आहे. स्वतःच्या सहकाऱ्यांनी मिळवलेले करोडो रुपयांचे टेंडर्स, हडपलेल्या जमिनी आणि वाळूचे काळे धंदे झाकण्यासाठीच जरांगेंनी हा बनाव रचला आहे. आगामी काळात को

.

मनोज जरांगे पाटील यांनी 32 मिनिटांची गुप्त ऑडिओ क्लिप जाहीर केल्यानंतर, अजय बारस्कर यांनी पत्रकार परिषद घेऊन जरांगेंच्या हेतूवर, त्यांच्या आर्थिक व्यवहारांवर आणि भाषेवर सडकून टीका केली.

स्वतःचे घोटाळे लपवण्यासाठी बनावट क्लिप; वाशीत ॲम्ब्युलन्समधून खोके नेले!

जरांगेंच्या पत्रकार परिषदेवर आणि क्लिपवर तोफ डागताना अजय बारस्कर म्हणाले, “जरांगे पाटील आणि त्यांच्या टोळीने मराठा आरक्षणाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचे टेंडर्स लाटले, जमिनी घेतल्या आणि वाळूचे व्यवहार केले. हे सर्व कांड लपवण्यासाठीच ही डुप्लिकेट क्लिप बाहेर काढण्यात आली आहे. काल दसरा मेळाव्यात जरांगे म्हणाले की ‘500 कोटी आले तर ते लपवायला 4 ते 5 एकरांचा खड्डा खणावा लागेल.’ चोरी केलेले धन खड्डा खणून लपवण्याची ही भाषा चोराचीच असू शकते. जरांगे हा लबाड लांडगा असून त्याने मराठा समाजाला केवळ खड्ड्यात घालण्याचे काम केले आहे.”

वाशीतील खोक्यांचा आरोप

“22 फेब्रुवारी 2024 रोजी जरांगेंनी माझ्यावर कुठलाही पुरावा नसताना बलात्काराचा खोटा आरोप केला. मी कीर्तनकार माणूस असून चारित्र्यावर जगणारा आहे. तू माझ्यावर आरोप का केलास? कारण वाशीच्या आंदोलनादरम्यान तू ॲम्ब्युलन्समध्ये भरून खोके नेले होतेस, ती तुझी चोरी मी उघडी पाडली होती. याप्रकरणी अहिल्यानगरच्या न्यायालयात मी जरांगेंविरुद्ध क्रिमिनल केस दाखल केली आहे.”

एकनाथ शिंदेंची सुपारी घेतली

जरांगेंच्या बदलत्या राजकीय भूमिकेचा समाचार घेताना बारस्कर यांनी सवाल उपस्थित केले. “महाराष्ट्रात पडद्यामागे मुख्यमंत्रिपदासाठी एक मोठी शर्यत सुरू आहे. ‘या मुख्यमंत्र्याला काढा आणि आम्हाला बसवा’ असा कट शिजत असून, त्यातूनच एका गटाने जरांगेंना सुपारी दिली आहे. गेल्या 2 महिन्यांपासून जरांगे फक्त एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्याचे काम करत आहेत.”

भाषेतील लाचारी उघडी पडली

“कालपर्यंत एकनाथ शिंदेंच्या तोंडात चाकू घालण्याची भाषा करणारा आणि त्यांना एकेरी उल्लेख करणारा जरांगे, आज पत्रकार परिषदेत अचानक ‘एकनाथजी शिंदे साहेब’, ‘देवेंद्रजी फडणवीस साहेब’, ‘मोदी साहेब’ आणि अगदी ‘मंगेश चिवटे साहेब’ अशी लाचार भाषा का बोलत होता? सुषमा अंधारे आणि संजय राऊतांना साहेब-ताई म्हणणाऱ्या जरांग्यांनी नेमकी कोणाची सुपारी वाजवली, हे मराठा समाजाने ओळखावे.”

बदनामी झाली तर पोलीस ठाण्यात का जात नाही?

जरांगेंच्या कायदेशीर भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत बारस्कर म्हणाले, “त्या क्लिपमध्ये 500 कोटी श्रीकांत शिंदेंकडून जरांगेंना पोहोचल्याचे म्हटले आहे. जर यात जरांगेंची बदनामी झाली असेल, तर जरांगे पोलीस ठाण्यात जाऊन FIR का नोंदवत नाहीत? ‘ते लोक मला मारणार आहेत’ असा कांगावा करण्यापेक्षा त्यांनी पोलिसांत अधिकृत तक्रार का केली नाही? जोपर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत दूध का दूध आणि पाणी का पाणी कसे होणार?”

माझ्या मोबाईलमध्येही व्यक्तिगत क्लिप

“जरांगे म्हणतात तशी एका क्लिपची चर्चा माझ्या मोबाईलमध्येही आहे. पिंपरी-चिंचवडमधील एका व्यक्तीबाबत जरांगेंच्या दोन जवळच्या मित्रांचे संभाषण त्यात आहे. एका माऊलीचा उल्लेख असल्याने मी ती सार्वजनिक करणार नाही; मात्र जरांगेंनी पोलीस ठाण्यात जावे, मी ती क्लिप पोलिसांच्या स्वाधीन करीन. हैदराबाद गॅझेट आणि सगेसोयरेवरून 2 वर्षांत एकाही मराठ्याला आरक्षण मिळाले नाही, हे अपयश झाकण्यासाठीच जरांगे हा सगळा तमाशा करत आहेत.”

मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ; हिंमत असेल तर बंदूक घेऊन स्वतः ये!

आपल्या संपत्तीच्या आरोपांवर उत्तर देत बारस्कर यांनी जरांगेंना थेट आव्हान दिले. “माझ्यावर आरोप करणाऱ्यांना सांगतो की, 2019-20 पासून मी इन्कम टॅक्स रिटर्न भरत नाही, कारण माझे उत्पन्न केवळ शेतीचे आहे. जरांगेंच्या नादाला लागून माझा संभाजीनगर-अहिल्यानगर महामार्गावरील 10 गुंठ्यांचा प्लॉट मला 2 महिन्यांपूर्वी विकावा लागला. माझ्या आई-पत्नीचे दागिने बँकेत गहाण आहेत. जरांगेंच्या नादी लागून अमोल खुणे आणि बाबुराव वाळेकर यांच्यासारख्या सहकाऱ्यांचीही हीच दुरवस्था झाली आहे.”

बंदूक घेऊन आमनेसामने येण्याचे आव्हान

“माझा आवाज दाबण्यासाठी खोटे गुन्हे दाखल करू नकोस. मी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ आहे. 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा 1 दिवस वाघ होऊन जगेन. माझा आवाज दाबायचा असेल, तर तू स्वतः बंदूक घेऊन आमनेसामने ये,” असा इशाराही अजय बारस्कर यांनी दिला.

——————————————————

हेही वाचा…

माझ्याविरोधात बोलणाऱ्यांना भाजपने पार्टी फंड पुरवला!:मनोज जरांगेंकडून 500 कोटींच्या दाव्याची स्फोटक ऑडिओ क्लिप जाहीर; शिंदे-फडणवीसांना षड्यंत्र थांबवण्याचा इशारा

“मराठा आरक्षण आंदोलन चिरडण्यासाठी, मला बदनाम करण्यासाठी आणि आंदोलनात फूट पाडण्यासाठी गेल्या 3 वर्षांपासून सत्ताधारी वर्तुळात एक अतिशय भयानक आणि नियोजनबद्ध कट शिजत आहे. माझ्या विरोधात बोलणाऱ्या मराठा तरुणांनाच हाताशी धरून, त्यांना पक्षाचा किंवा वैयक्तिक फंड पुरवून, गाड्या आणि मोर्चांचा खर्च देऊन मला राजकीयदृष्ट्या उद्ध्वस्त करण्याची रणनीती आखली गेली. ‘बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला’ म्हणणाऱ्यांनी आता हे पुरावे ऐकावेत. जर हे षड्यंत्र थांबवले नाही, तर माझ्याकडे असा महास्फोट आहे की या राज्यात सत्ताधाऱ्यांना पाय ठेवायलाही जागा उरणार नाही,” असा खळबळजनक इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

By admin