.

जायखेडा शिवारात बुधवारी (दि. २१) रात्री साडेनऊच्या सुमारास एका शेतात राखणदारावर तरसाने हल्ल्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. परिसरातील शेतकऱ्यांनी तातडीने धाव घेऊन आरडाओरडा करत शेकोटी पेटवल्याने हा हल्ला टळला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, वनविभागाने तत्काळ पिंजरा लावून तरसाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

विनोद ब्राह्मणकर यांच्या शेतात राखणदार म्हणून काम करणारे पंडित माळी हे रात्री शेतात फेरफटका मारत होते. त्यावेळी पाळीव कुत्री अचानक भुंकू लागल्याने त्यांनी बॅटरीच्या प्रकाशात पाहिले असता, समोरून तरस वेगाने त्यांच्या दिशेने चालून येत असल्याचे दिसले. माळी यांनी आरडाओरडा केला. आवाज ऐकून शेजारील शेतातील गिरीधर सोनवणे, पंकज शेवाळे, दादाजी अहिरे, दीपक शेवाळे आणि पप्पू शेवाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. सर्वांनी मिळून मोठा आवाज केला व जाळ केला त्यामुळे तरस शेजारील मका पिकात पसार झाले.

तरसाला पळवून लावण्यासाठी जाळ करत असतानाच पंडित माळी यांच्या पायाजवळ अचानक अतिविषारी घोणस साप दिसून आला. वेळीच लक्ष गेल्याने माळी मागे सरकले आणि पुढील धोका टळला. त्यानंतर रात्री अकरा वाजता सर्पमित्र अजय सोळुंके यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचून घोणस सापाला सुरक्षित पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाने परिसराची पाहणी केली आहे. मका पिकात लपलेल्या तरसाचा बंदोबस्त करण्यासाठी पथक तैनात करण्यात आले असून, लवकरच पिंजरा लावला जाईल. शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी शेतात जाताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी. – नीलेश कोळी, वनरक्षक

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

By admin

You missed

Home
Account
Cart
Search