मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांचे नाव आल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. यावरून आता राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. “श्रीकांत शिंदे यांचे नाव घेऊन थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गोत्यात आणण्याचा आणि शिवसेना-भाजपमध्ये वाद लावण्याचा हा डाव आहे,” असा खळबळजनक आरोप गुलाबराव पाटील यांनी केला आहे. तसेच, या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी कसून चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. ‘एकनाथ शिंदेंना गोत्यात आणण्याचे षड्यंत्र’: ऑडिओ क्लिपमधील उल्लेखावर तीव्र संताप व्यक्त करताना गुलाबराव पाटील म्हणाले, “श्रीकांत शिंदे यांचे नाव घ्यायचे, जेणेकरून एकनाथ शिंदे या प्रकरणात ओढले जातील आणि पर्यायाने शिवसेनाही यात अडकेल. आपल्या नेत्याला बदनाम करण्याचा आणि त्यांना गोत्यात आणण्याचा हा जाणीवपूर्वक रचलेला डाव आहे.” ‘शिवसेना-भाजपमध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न’: या प्रकरणामागे राजकीय हेतू असल्याचा संशय व्यक्त करत ते म्हणाले, “या निमित्ताने शिवसेना आणि भाजपमध्ये भांडणे लावण्याचा हा प्रकार आहे का, असा मला प्रश्न पडतो. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचे ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’ झालेच पाहिजे.” ‘५०० कोटींचा आरोप पूर्णपणे खोटा’ मनोज जरांगे पाटील यांना ५०० कोटी रुपये दिल्याच्या आरोपावर स्पष्टीकरण देताना गुलाबराव पाटील यांनी ठणकावून सांगितले की, “हे तर आता स्पष्टच झाले आहे की एकनाथ शिंदे यांनी ५०० कोटी रुपये दिलेले नाहीत आणि जरांगे पाटील यांनी ते घेतलेले नाहीत. त्यामुळे या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही.” सखोल चौकशीची मागणी या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जाण्याची गरज व्यक्त करत त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना थेट मागणी केली आहे. “माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, या प्रकरणाची कसून चौकशी करा. तपास होऊ द्या, तपासात जे समोर येईल ते येईल, पण आमच्या नेत्याला बदनाम करण्याचा जो प्रयोग चालला आहे, त्याचा पर्दाफाश झालाच पाहिजे,” अशी आक्रमक भूमिका गुलाबराव पाटील यांनी मांडली आहे. ———————– हेही वाचा.. माझ्याविरोधात बोलणाऱ्यांना भाजपने पार्टी फंड पुरवला!:मनोज जरांगेंकडून 500 कोटींच्या दाव्याची स्फोटक ऑडिओ क्लिप जाहीर; शिंदे-फडणवीसांना षड्यंत्र थांबवण्याचा इशारा “गेल्या 3 वर्षांपासून मराठा आरक्षण आंदोलन मोडून काढण्यासाठी आणि गरीब मराठ्यांच्या लेकरांचे हक्क संपवण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून अत्यंत भयंकर व गलिच्छ षड्यंत्र रचले जात आहे. माझ्याच समाजातील काही पोरांना हाताशी धरून, त्यांना भाजपचा पार्टी फंड, उद्योगपतींचा पैसा, मोर्चे आणि गाड्यांचा खर्च पुरवून माझ्याविरोधात रान उठवले गेले. ‘बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला’ म्हणणाऱ्या सत्ताधाऱ्यांचे वस्त्रहरण करणारा 32 मिनिटांचा पुरावा आज मी अखंड महाराष्ट्रासमोर ठेवला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी हे षड्यंत्र तत्काळ थांबवले नाही, तर 1 ते 2 महिन्यांत असा बॉम्ब टाकेन की या राज्यात 2029 ला एकालाही तोंड दाखवायला किंवा पाय ठेवायला जागा उरणार नाही,” असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. सविस्तर वाचा

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

By admin

Home
Account
Cart
Search