राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ ची राज्यभरात अंमलबजावणी सुरू आहे. या योजनेची चौथी यादी जाहीर करण्यात आली असून, यामध्ये एकापेक्षा अधिक बँकांमध्ये कर्ज खाती असलेल्या आणि २ लाख रुपयांपेक्षा कमी थकबाकी असलेल्या १ लाख १५ हजार ६९७ पात्र शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. ही यादी आता आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली असल्याची माहिती बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे. आतापर्यंत १३ हजार २७५ कोटी रुपये जमा या योजनेच्या प्रगतीबाबत माहिती देताना बाबासाहेब पाटील यांनी सांगितले की, बँकांनी महाआयटीने तयार केलेल्या पोर्टलवर एकूण ३१.१७ लाख थकीत कर्जखात्यांची माहिती अपलोड केली होती. संगणकीय प्रक्रिया आणि आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांपैकी १५.८५ लाख पात्र लाभार्थ्यांच्या कर्जखात्यांवर आतापर्यंत १३ हजार २७५ कोटी रुपयांची कर्जमुक्तीची रक्कम शासनाकडून जमा करण्यात आली आहे. चौथ्या यादीची वैशिष्ट्ये आणि महत्त्वाचे मुद्दे २४ लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध: शासनाने यापूर्वी पहिल्या यादीत १६.९६ लाख, दुसऱ्या यादीत ४.१९ लाख आणि तिसऱ्या यादीत ३.५१ लाख अशा एकूण २४ लाख ६७ हजार १३० पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. आता चौथ्या यादीत एकापेक्षा जास्त बँकांकडून पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचा समावेश आहे. ३१ मार्च २०२६ पर्यंतची थकबाकी ग्राह्य: या यादीतील कर्जबाकीची रक्कम ३१ मार्च २०२६ रोजीची ग्राह्य धरली जाणार आहे. १ एप्रिल २०२६ नंतरचे व्याज आणि इतर खर्च माफ करण्यात येणार असल्याचे बाबासाहेब पाटील यांनी स्पष्ट केले. २ लाखांवरील कर्जासाठी ‘हेअर कट’ धोरण: राष्ट्रीयकृत आणि व्यापारी बँकांच्या बाबतीत, काही शेतकऱ्यांची ३१ मार्च २०२६ रोजीची कर्ज थकबाकी रक्कम २ लाखांपेक्षा जास्त असली तरी, शासनाच्या ‘हेअर कट’ (Haircut) धोरणानुसार ही सर्व कर्जे निरंक (शून्य) करण्यात येणार आहेत. मृत आणि वयस्कर शेतकऱ्यांसाठी विशेष सुविधा: जे लाभार्थी मृत झाले आहेत किंवा ज्यांचे वय जास्त असल्याने बोटांच्या ठशांची नोंद होत नाही, त्यांनाही कर्जमुक्तीचा लाभ मिळावा यासाठी १९ ऑगस्ट २०२६ रोजी नवीन मानक कार्यप्रणाली (SOP) जारी करण्यात आली आहे. आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन पात्र शेतकऱ्यांनी ३१ मार्च २०२६ रोजीच्या कर्ज थकबाकीची खातरजमा करून जवळच्या ‘आपले सेवा केंद्रावर’ जाऊन लवकरात लवकर आपले आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे. प्रमाणीकरण झाल्यानंतर लगेचच कर्जमुक्तीची रक्कम त्यांच्या कर्ज खात्यावर जमा केली जाईल, असे आवाहन बाबासाहेब पाटील यांनी केले आहे. ही यादी संबंधित बँक शाखा, विकास संस्था आणि ग्रामपंचायतींमध्ये पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यातील २,५२९ शेतकऱ्यांची कर्जमुक्ती योजनेची चौथी यादी प्रसिद्ध राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत लातूर जिल्ह्यातील २ हजार ५२९ पात्र शेतकऱ्यांची चौथी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत एकापेक्षा अधिक बँकांमध्ये कर्जखाती असलेल्या आणि दोन लाख रुपयांपेक्षा कमी थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांचा समावेश आहे. यादी संबंधित बँक शाखा, विविध कार्यकारी विकास संस्था आणि ग्रामपंचायतींमध्ये उपलब्ध होणार असून, पात्र शेतकऱ्यांनी जवळच्या ‘आपले सरकार’ सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक व्ही. एल. पोतंगले यांनी केले आहे. यापूर्वीच्या तीन याद्यांमध्ये जिल्ह्यातील ६९ हजार ७९४ शेतकऱ्यांची नावे प्रसिद्ध झाली होती. त्यापैकी आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या ४८ हजार ८१९ लाभार्थ्यांच्या कर्जखात्यांत आतापर्यंत ३६५.१३ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. चौथ्या यादीतील कर्जथकबाकी ३१ मार्च २०२६ पर्यंतची असून, त्यानंतरचे व्याज व इतर खर्च माफ करण्याबाबत शासनाच्या सूचनांनुसार कार्यवाही केली जाणार आहे. पात्र शेतकऱ्यांनी प्रमाणीकरण लवकर पूर्ण करून योजनेचा लाभ घ्यावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ————————– हेही वाचा… विधान परिषदेच्या 5 मतदारसंघात आज मतदान: 182 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार, कोण मारणार बाजी? 27 ऑक्टोबरला मतमोजणी राज्यातील विधान परिषदेच्या बहुचर्चित शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी आज (शुक्रवार, २३ ऑक्टोबर) मतदान पार पडत आहे. पुणे, नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर (मराठवाडा) या विभागांमधील एकूण ५ मतदारसंघांमध्ये ही निवडणूक होत असून, तब्बल १८२ उमेदवारांचे राजकीय भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. अनेक मतदारसंघांमध्ये प्रस्थापित विरुद्ध बंडखोर अशी चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. २७ ऑक्टोबर रोजी या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. सविस्तर वाचा

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

By admin

Home
Account
Cart
Search