नांदेड परिक्षेत्रात गुटखा विरोधी मोहिमेला वेग; ९ जणांवर कारवाई, ८ लाखांचा मुद्देमाल जप्त


नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड परिक्षेत्रात गुटखा व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांविरोधात पोलिसांनी जोरदार मोहीम हाती घेतली असून, पाच स्वतंत्र कारवायांमध्ये एकूण ९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवायांमध्ये सुमारे ८.४२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दि. १६ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे. नागरिकांना कॅन्सरसारख्या गंभीर आजारांपासून संरक्षण मिळावे, या उद्देशाने ही कारवाई करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोहिमेच्या पाचव्या दिवशी गुटखा विक्री, साठवणूक व वाहतूक करणाऱ्यांविरोधात आणखी ५ गुन्हे नोंदवण्यात आले. यामध्ये एकूण ९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यातील भाग्यनगर, मुखेड, तसेच परभणी जिल्ह्यातील बोरी, लातूर जिल्ह्यातील उदगीर ग्रामीण आणि हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ या ठिकाणी संबंधित पोलिस ठाण्यांनी कारवाया केल्या. या सर्व प्रकरणांमध्ये भारतीय न्याय संहिता कलम १२३ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कारवाईदरम्यान सुगंधित तंबाखू, गुटखा, पान मसाला, खर्रा, मावा यांसारख्या प्रतिबंधित पदार्थांचा मोठा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणांमध्ये दोषींना दहा वर्षांपर्यंत कारावास व दंडाची शिक्षा होऊ शकते, असे पोलिसांनी स्पष्ट केले.

दरम्यान, अवैध व्यवसायांची माहिती देण्यासाठी ‘खबर’ हेल्पलाईन सुरू करण्यात आली असून ९१ ५० १०० १०० या क्रमांकावर नागरिकांनी माहिती द्यावी, असे आवाहन पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.

Post Views: 23






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *