![]()
सायंकाळचे जेवण उरकून पायी घराच्या दिशेने निघाल्यावर काही क्षणांत असा भयंकर प्रसंग बेतेल याची कल्पनाही कोणी केली नव्हती. अकोला बाजार ते यवतमाळ मार्गावरील जुन्या जिनिंगजवळील वळणावर भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत ३९ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. ही भीषण घटना गुरुवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली असून, आशिष गोविंद कन्नाके (वय ३९, रा. हातगाव) असे मृत युवकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हातगाव येथील रहिवासी आशिष कन्नाके हे दररोज अकोला बाजार येथील खानावळीत जेवणासाठी येत असत. गुरुवारी रात्रीही त्यांनी खानावळीत जेवण उरकले आणि ते पायी गावाकडे जाण्यासाठी निघाले. मात्र, रात्री साडेआठच्या सुमारास जुन्या जिनिंगजवळील धोकादायक वळणावर पोहोचताच, मागून आलेल्या एका वाहनाने त्यांना धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, आशिष यांच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर मार लागून त्यांचा घटनास्थळीच प्राण गेला. अपघाताची माहिती कळताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. माहिती मिळताच वडगाव जंगलचे ठाणेदार विकास दांडे यांनी ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत घटनेचा पंचनामा करत मृतदेह पुढील उत्तरीय तपासणीसाठी येथील शासकीय रुग्णालयात रवाना केला. मायेचं छत्र हरपलं! तीन चिमुकल्या मुली अन् आई-वडील उघड्यावर काही दिवसांपूर्वीच घरगुती कारणावरून आशिष यांची पत्नी माहेरी गेल्याची माहिती समोर आली आहे. अशातच या अचानक घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे कन्नाके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आशिष यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि तीन लहान मुली असा मोठा परिवार आहे. ऐन उभ्या आयुष्यात घरातील कर्ता पुरुष गमावल्याने आणि तीन चिमुकल्या मुलींचे छत्र हरपल्याने हातगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघात घडल्यानंतर चालक वाहनासह अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाला. या अज्ञात वाहनाचा आणि निष्काळजी चालकाचा शोध घेण्यासाठी वडगाव जंगल पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून, या प्रकरणाचा पुढील सखोल तपास सुरू आहे.
अज्ञात वाहनाची धडक; एकाचा जागीच मृत्यू:अकोला बाजार ते यवतमाळ मार्गावर घटना

