माजी खासदार आणि शिक्षणतज्ञ डॉ. जनार्दन वाघमारे यांची शुक्रवारी श्रद्धांजली सभा

0
1001588914.jpg


नांदेड – लातूर पॅटर्नचे शिल्पकार, माजी खासदार, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे संस्थापक व पहिले कुलगुरू, लातूरचे माजी नगराध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत, ख्यातनाम साहित्यिक, डॉ. जनार्दन वाघमारे यांचे २ मार्च रोजी सकाळी ८.३० वाजता निधन झाले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही श्रद्धांजली सभा शुक्रवारी (दि २०) सायंकाळी ४.३० वाजता दयानंद सभागृह, लातूर येथे होणार आहे.

साहित्य, शिक्षण, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात डॉ.जनार्दन वाघमारे यांनी आपला ठसा उमटवला आहे. डॉ. वाघमारे यांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत ७५ पेक्षा अधिक पुस्तकांचे लेखन केले आहे. फक्त ज्ञानाच्या बळावर सर्वोच्च पदावर पोहोचलेले अखंडपणे ज्ञानयज्ञ चालवणारे ज्ञानर्षी म्हणजे डॉ. जनार्दन वाघमारे. त्यांनी आयुष्यभर शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाच्या कार्यासाठी स्वतःला वाहून घेतले होते. लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या उभारणीमध्ये डॉ. वाघमारे सरांचा सिंहाचा वाटा आहे. इंग्रजी साहित्याचे प्राध्यापक म्हणून त्यांनी दीर्घकाळ अध्यापन केले. निग्रो साहित्य, दलित साहित्य आणि पुरोगामी साहित्य चळवळीवर त्यांनी सखोल लेखन व संशोधन केले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडचे कुलगुरू झाले. विद्यापीठाच्या स्थापनेपासून शैक्षणिक पायाभूत रचना उभारणीपर्यंत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे त्यांची राज्यसभेवर खासदार म्हणून निवड झाली होती. मराठवाड्याच्या विकासासह अनेक सामाजिक प्रश्नांना त्यांनी राज्यसभेत वाचा फोडली. डॉक्टर वाघमारे यांची लातूर नगरीचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून कारकीर्द कौतुकास्पद राहिली आहे. डॉ.जनार्दन वाघमारे यांचे निधनामुळे शिक्षण, राजकारण आणि समाजकारण यांना जोडणारा मार्गदर्शक दुवा निखळला आहे.

त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी ४.३० वाजता दयानंद सभागृह, लातूर येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन समस्त लातूरकरांच्यावतीने करण्यात आले आहे. या श्रद्धांजली सभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची विनंती  माजी प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार, डॉ. दिगंबर नेटके, डॉ. विनायक कलमे, प्राचार्य संजय वाघमारे, प्रा. सुधीर साळुंखे, प्रा.डॉ. विनोद चव्हाण, प्राचार्य डॉ. हरिदास फेरे, विवेक सौताडेकर आदींनी केली आहे.


Post Views: 114






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed