पाठलाग करणाऱ्याला रस्त्यात अडवून प्राध्यापिकेने खडसावले:टवाळखोर आरोपीवर जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

0
orig_730-x-548-new-2026-05-03t072637397_1777773439.jpg




सिडको परिसरातील नामवंत शैक्षणिक संस्थेत लेक्चरर म्हणून काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणाऱ्या एका २६ वर्षांच्या तरुणीचा सलग ८ दिवस पाठलाग करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पीडित तरुणीने स्वतः धाडस दाखवत या रोडरोमिओला भररस्त्यात थांबवून जाब विचारल्याने हा प्रकार उघडकीस आला. तैबान कलीम खान (२५, रा. कैलासनगर, गल्ली क्रमांक ४) असे या आरोपीचे नाव आहे. पीडित महिला ही जुन्या शहरात राहते. संस्थेत ती दुचाकीवर दररोज ये-जा करते. मागील ८ दिवसांपासून आरोपी तैबान हा दुचाकीवरून तिच्या मागावर होता आणि सतत तिचा पाठलाग करत होता. शनिवारी (२ मे) सकाळी ०९:२५ वाजेच्या सुमारास महिला संस्थेत जात होती. त्यावेळी आरोपी पाठलाग करत असल्याचे तिच्या निदर्शनास आले. यावेळी तिने संस्थेजवळ पाठलाग करणाऱ्याची दुचाकी अडवली आणि ‘मागील ८ दिवसांपासून माझा पाठलाग का करतोस?’ असे थेट विचारले. जाब विचारल्यानंतर घातला वाद : जाब विचारल्यानंतर आरोपीने आपली चूक मान्य करण्याऐवजी पीडित महिलेसोबत अरेरावीच्या भाषेत बोलून भररस्त्यात वाद घालण्यास सुरुवात केली. नेमक्या याच वेळी पीडित महिलेच्या भावाचा मित्र तेथून दुचाकीवरून जात होता. त्याने हा वाद पाहिला आणि काय झाले, याची चौकशी केली. महिलेने त्याला घडलेला सर्व प्रकार सांगितला. यानंतर तरुणाने सतर्कता दाखवत आरोपीला त्याचे नाव-गाव विचारले आणि त्याला पकडून थेट सिडको ठाण्यात नेले. मात्र, ज्या मार्गावर आणि ठिकाणी हा पाठलागाचा प्रकार घडला, तो भाग जिन्सी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येतो. त्यामुळे पुढील कारवाईसाठी हे प्रकरण जिन्सी पोलिसांकडे सोपवण्यात आले. यानंतर पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून जिन्सी ठाण्यात आरोपी तैबान कलीम खान याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दिव्य मराठी अॅनालिसिस – पोलिसांच्या गस्तीची गरज पाठलागाच्या प्रकारामुळे नोकरदार महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सिडकोतील शिक्षण संस्थांच्या परिसरात टवाळखोरांचा कायम वावर असतो. विशेष: सकाळी आणि सायंकाळी परिसरात गर्दी असते. त्यामुळे या परिसरात पोलिस, दामिनी पथकाच्या गस्तीची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed