सोलापुरातील घटना, महिलेच्या दिरावर संशय, शोधासाठी पोलिस पथके रवाना:75 लाखांच्या दीड एकर जमिनीसाठीआई, मुलगी अन् मुलाचा तलवारीने खून
![]()
सोलापूर ते हैदराबाद रोडवरील बोरामणीच्या पुढे असणाऱ्या मस्के वस्तीवर शुक्रवारी रात्री तिघांचा निर्घृण खून करण्यात आला. एक महिला आणि तिच्या दोन मुलांना तलवारीचे वार करून ठार करण्यात आले. उन्हाळा असल्याने हे तिघेही शेतातील घरात गच्चीवर झोपले होते. वस्तीवर दुसरे कुणी नसल्याचा फायदा घेत तिघांवर हल्ला करण्यात आला. त्यात महिला आणि मुलगी दोघी जागीच ठार झाल्या, तर मुलगा जीव वाचवण्यासाठी खाली पळून जाताना पाठलाग करून त्याच्यावर वार करण्यात आले. बाजारभावानुसार सुमारे ७५ लाख रुपये मूल्य असलेल्या दीड एकर जमिनीच्या वादातून हा खून झाल्याचा पोलिसांना संशय आहे. मस्के कुटुंबाची हायवेलगत ही दीड एकर जमीन आहे. या जमिनीवरूनच काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होते. त्याचेच पर्यवसान शुक्रवारी रात्री खुनात झाल्याचा पोलिसांना संशय आहे. गायत्री सुधाकर मस्के (३६), प्रियंका सुधाकर मस्के (२०) आणि शिवराज सुधाकर मस्के ( १७, तिघे रा. बोरामणी, ता. दक्षिण सोलापूर) असे खून झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी संशयित आरोपी असणारा महिलेचा दीर पप्पू मस्के याच्या शोधासाठी सहा पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत. शनिवारी रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. १५ वर्षाच्या शिवराजला पाठलाग करुन संपवले आई व बहिणीला वाचवण्यासाठी १५ वर्षाच्या शिवराज मध्ये पडला. मात्र त्याच्या हातावर वार होताच जीव वाचवण्यासाठी भिंतीचा आधार घेत तो पळाला. तो खाली खोलीत आल्यानंतर पाठलाग करून तलवारीने वार करून त्यालाही संपवण्यात आले. मृत प्रियंका मस्के हिला बारावीत ७९ टक्के गुण खून झालेल्या १७ वर्षीय प्रियंकाने बारावीची परीक्षा दिली होती. शनिवारी निकालात ती ७९ टक्के गुणांनी उत्तीर्ण झाली. मात्र निकाल पाहण्यासाठी ती राहिली नाही. बोरामणी येथील ग्लोबल स्कूलमध्ये दोन्ही भावंडे शिकत होती. तिला इंजिनिअर व्हायचे होते. तिचा भाऊ शिवराजने दहावीची परीक्षा दिली होती.
