पुण्यात 28 लाखांची लाच स्वीकारताना महिला पोलिस अधिकारी जाळ्यात:30 लाखांची मागणी, 28 वर तडजाेड; 2 लाख ॲडव्हान्स
![]()
शहर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत महिला सहायक पोलिस निरीक्षक (एपीआय) वैशाली मुरलीधर तोटेवार (४९) आणि तिच्या खासगी हस्तकाला तब्बल २८ लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. शनिवारी (२ मे २०२६) दुपारी मंगलदास रोडवरील पंचतारांकित हॉटेल कॉनराडच्या प्रवेशद्वारासमोर ही धडक कारवाई करण्यात आली. आर्थिक गुन्हे शाखेसारख्या महत्त्वाच्या विभागातील अधिकारीच एवढ्या मोठ्या लाचप्रकरणी जाळ्यात अडकल्याने पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. यातील तक्रारदाराने आर्थिक गुन्हे शाखा, पुणे शहर येथे एक तक्रार अर्ज दिला होता. या अर्जाची चौकशी एपीआय तोटेवार करत होत्या. तक्रारदाराने दिलेल्या अर्जाची चौकशी त्याच्या बाजूने करून, गैरअर्जदाराविरुद्ध कारवाई करून तक्रारदाराची जमीन त्याला परत मिळवून देण्याचे आमिष तोटेवार यांनी दाखवले होते. या कामासाठी त्यांनी यापूर्वीच २ लाख रुपये स्वीकारले होते. तरीही समाधान न झाल्याने त्यांनी आणखी ३० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती २८ लाख रु. देण्याचे निश्चित झाले. याबाबत तक्रारदाराने ३० एप्रिल २०२६ रोजी एसीबीकडे तक्रार नोंदवली होती. त्याच दिवशी पंचांसमक्ष लाच मागणीची पडताळणी झाली होती. पंचतारांकित हॉटेल बाहेर खासगी व्यक्तीसह अटक २ मे २०२६ रोजी लाच स्वीकारण्याची वेळ ठरली. एपीआय वैशाली तोटेवार यांनी लाचेची रक्कम संभाजी चव्हाण याच्याकडे देण्यास सांगितले होते. त्यानुसार, दुपारी १.०९ वाजता एसीबीच्या पथकाने मंगलदास रोडवरील हॉटेल कॉनराडच्या एंट्री गेटसमोर सापळा लावला. चव्हाण याने तक्रारदाराकडून पंचांसमक्ष २८ लाख रुपये स्वीकारताच त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर तत्काळ एपीआय वैशाली तोटेवार यांनाही ताब्यात घेण्यात आले.
