Diwali Lantern

विद्यार्थिनीच्या व्यथेवर नागपूर जिल्हाधिकाऱ्यांची तत्परता:थेट गावात पोहोचून एसटी बस सेवा केली सुरू




नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील दुर्गम खेतापूर येथील एका विद्यार्थिनीने एसटी बसच्या समस्येबाबत सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओची दखल घेत नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी तातडीने खेतापूर गावाला भेट दिली. त्यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधून तात्काळ खेतापूर ते नागपूर अशी एसटी बस सेवा सुरू केली. खेतापूर येथील विद्यार्थिनींना माध्यमिक शिक्षणासाठी ७ किलोमीटर दूर असलेल्या डोंगरगाव येथे जावे लागते. वाहतूक सुविधा नसल्यामुळे नववीत शिकणाऱ्या टीना वैकुंठे या विद्यार्थिनीने आपली समस्या व्हिडिओद्वारे मांडली होती. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी टीना आणि तिच्या मैत्रिणींशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. या भेटीदरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य परिवहन महामंडळाला तात्काळ सूचना दिल्या. त्यानंतर, खेतापूर ते नागपूर या नवीन एसटी बस सेवेचा टीना आणि तिच्या मैत्रिणींच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी गावकऱ्यांच्या इतर नागरी समस्यांचाही आढावा घेतला. खेतापूर ते डोंगरगाव रस्त्याच्या दुरुस्ती कामाची पाहणी करून, हे काम अमृतकाल योजनेंतर्गत समाविष्ट करण्याचे निर्देश दिले. सार्वजनिक बांधकाम विभागाला सप्टेंबर महिन्यापासून हे काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एसटी बस सुविधेसोबतच नागपूर महानगरपालिकेच्या ‘आपली बस’ सेवेचा विस्तार खेतापूरपर्यंत करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न केले जातील, असे आश्वासनही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. याव्यतिरिक्त, गावातील गोपाळ समाजाचे झुडपी जंगल जमिनीवरील अतिक्रमण न्यायालयाच्या निर्णयानुसार नियमानुकूल करणे आणि पाळीव जनावरांवरील वाघांचे हल्ले रोखण्यासाठी वनविभागामार्फत ठोस नियोजन करण्याबाबतही त्यांनी ग्रामस्थांना आश्वस्त केले. यावेळी स्थानिक आमदार डॉ. संजय मेश्राम, तहसीलदार अमित घाडगे, सरपंच प्रदीप खोब्रागडे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

🇮🇳 Happy Independence Day 🇮🇳