आमदार खोतकर यांची मराठी भाषा विद्यापीठाला भेट:प्रगतीची पाहणी करत यशस्वी वाटचालीस शुभेच्छा

0
caade731-c829-4e15-96fc-c7af0dfa01d0_1777565388738.jpg




विधीमंडळाच्या अंदाज समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांनी रिद्धपूर येथील मराठी भाषा विद्यापीठाला भेट दिली. या भेटीदरम्यान, विद्यापीठाच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष मोहन महाराज यांनी त्यांच्याशी संवाद साधला. आमदार खोतकर यांनी विद्यापीठाची सविस्तर माहिती जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी मोहन महाराज यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला. त्यांनी रिद्धपूर येथील मराठी भाषा विद्यापीठाच्या यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि अल्पावधीत झालेल्या प्रगतीबद्दल संबंधितांचे कौतुक केले. यावेळी त्यांच्यासोबत नांदेडचे आमदार बालाजी कल्याणकर, उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील आणि महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे अवर सचिव दामोदर गायकर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. या सर्व मान्यवरांनी रिद्धपूर येथील मराठी भाषा विद्यापीठाची पाहणी केली. भेटीप्रसंगी परिसरात उपस्थित सर्व आमदार महोदयांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. त्यानंतर त्यांनी परिसराची पाहणी करून आढावा बैठक घेतली. या बैठकीत आमदार महोदयांनी एक महत्त्वाचे आश्वासन दिले. मराठी भाषा विद्यापीठातील अमराठी भाषिकांसाठी चालणारे प्रमाणपत्र अभ्यासक्रम महाराष्ट्रातील सर्व प्रशासकीय अमराठी कर्मचाऱ्यांसाठी अनिवार्य करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. भेटीच्या सुरुवातीला मराठी भाषा विद्यापीठाचे कला व साहित्य प्रशालाचे अधिष्ठाता डॉ. कोमल ठाकरे यांनी सर्व मान्यवरांचा शाल व पुस्तक भेट देऊन विद्यापीठाच्या वतीने सन्मान केला. याप्रसंगी स्थानिक प्रशासकीय यंत्रणा, मराठी भाषा विद्यापीठाचे प्राध्यापकवृंद, सर्व कर्मचारी आणि विद्यापीठातील विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed