किशोरवयीन मुलींसाठी विशेष जनजागृती कार्यक्रम:साई हेरिटेजमध्ये 'तुमचं भविष्य, तुमचे निर्णय' विषयावर व्याख्यान
![]()
अमरावती येथे बालरंगभूमी परिषद आणि सोमेश्वर गणेशोत्सव मंडळाच्या वतीने साई हेरिटेजमध्ये किशोरवयीन मुलींसाठी विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘तुमचं भविष्य, तुमचे निर्णय’ या विषयावर प्रसिद्ध समुपदेशक संजय उताणे यांनी मार्गदर्शन केले. या व्याख्यानात संजय उताणे यांनी किशोरवयातील शारीरिक व मानसिक बदल, वैयक्तिक स्वच्छता, आरोग्याची काळजी, सर्व्हायकल कॅन्सर म्हणजे काय, एच.पी.व्ही. लसीकरणाचे महत्त्व आणि योग्य निर्णय घेऊन सुरक्षित भविष्य कसे घडवावे, यावर सविस्तर माहिती दिली. त्यांनी स्थिर चित्रांच्या माध्यमातून उपस्थित मुली व त्यांच्या पालकांना अतिशय प्रभावीपणे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचा विशेष लाभ किशोरवयीन मुलींना झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संजय उताणे यांचा सत्कार करण्यात आला. विशाल तराळ यांनी कार्यक्रमाचे संचालन केले, तर प्रा. महेंद्रसिग पवार यांनी आभार मानले. साई हेरिटेज सोसायटीच्या उद्यानात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी अद्वैत बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष संजिवनी पुरोहित, सोमेश्वर गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष विशाल तराळ, विश्वस्त मनिष शिवणकर, बालरंगभूमी परिषदेच्या कोषाध्यक्ष स्वाती तराळ आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. उमेश पाथरकर, सचिन कराळे, मनिष प्रजापती, वैभव ठाकरे, अभिजीत वैद्य, विपुल लळे, अमोल धुमाळे, दिनेश खापर्डे, सुदेश कचवे, प्रकाश इटनकर, अनुराग वानखडे, मंगेश बक्षी, विवेक राऊत, धोटे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
