गायीला राष्ट्रमातेचा दर्जा द्या, गोहत्येवर बंदी करा:महाकाली माता शक्तिपीठ प्रतिष्ठानची केंद्राकडे मागणी

0
9702de18-5cb3-4ce1-9843-c7e6b1296aa5_1777565665916.jpg




अमरावती येथील श्री महाकाली माता शक्तिपीठ प्रतिष्ठानने गायीला राष्ट्रमातेचा दर्जा देण्याची आणि गोहत्येवर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. राष्ट्र आणि भारतीय संस्कृतीच्या हितासाठी गायीला राष्ट्रीय सन्मान मिळावा, यासाठी केंद्र व राज्य सरकारांनी पुढाकार घ्यावा, असे प्रतिष्ठानचे पीठाधीश्वर शक्तीजी महाराज यांनी म्हटले आहे. या मागणीसाठी प्रतिष्ठानने ‘गौमाता सन्मान यात्रा’ काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. या निवेदनात अनेक प्रमुख मागण्यांचा समावेश आहे. यात भारतात गोहत्येवर पूर्ण बंदी घालून गायीचे संरक्षण करावे, गायीला राष्ट्रमाता, राष्ट्रीय देवी, राष्ट्रीय पूजा, राष्ट्रीय वारसा किंवा राष्ट्रीय पाया असा सन्माननीय दर्जा देण्यात यावा, या प्रमुख मागण्या आहेत. तसेच, गोसेवेसाठी केंद्रीय कायदा बनवून स्वतंत्र केंद्रीय मंत्रालय स्थापन करावे, जेणेकरून संपूर्ण भारतात गोसेवा समान रीतीने करता येईल. गौ बोर्ड स्थापन करून चारा सुरक्षा धोरण तयार करावे, गो-आधारित शेती सुनिश्चित करावी आणि पंचगव्य उत्पादनांचे उत्पादन व वितरण वाढवावे, अशा मागण्याही करण्यात आल्या आहेत. प्रतिष्ठानच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या यात्रेत क्रांती दल, हिंदू सुरक्षा सेवा संघ, नरेंद्र मोदी विचार मंच आणि आंतरराष्ट्रीय संत बौद्धिक मंचचे पदाधिकारी सहभागी झाले होते. संविधानाच्या कक्षेत राहून अहिंसक पद्धतीने गायीला राष्ट्रीय सन्मान मिळवून देणे ही काळाची गरज बनली असून त्यासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे, असे त्यांचे मत आहे. याच मागणीसाठी अमरावतीत नुकतीच गौमातेची रक्ततुलाही करण्यात आली. माहेश्वरी समाज आणि अमरावती रक्तदान समितीच्या पुढाकारातून भगवान परशुराम यांच्या जयंतीदिनी हा सोहळा पार पडला. यासाठी जिल्ह्याच्या विविध भागांत आठवडाभर रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली होती, त्यातून गोळा झालेल्या रक्ताच्या आधारे गौमातेची रक्ततुला करण्यात आली. या निवेदनावर हरीश गांधी, श्याम तिवारी, रामनारायण सोनी, महावीर कटारिया, सतीश भोंडवे, सचिन शर्मा, कृष्णा शर्मा, प्रकाश कोनलाडे, ज्ञानेश्वर राऊत, मानसी पवित्रकार, सुनीता शर्मा, सुरभी गुप्ता, मीना मालानी, नीता भाटी, कांता तोष्णीवाल, सचिन तीरमारे, आशुतोष सावरकर, सुधीर माहोरे, भार्गवी माहोरे, चित्रा पेटकर, सचिन पेटकर, दीपांशू केसरवाणी आदींच्या स्वाक्षरी आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed