पोदार स्कूलच्या शरण्या मोरेला रौप्य पदक:डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत पटकावले यश
![]()
अमरावती, बडनेरा रोड येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या सातवीतील विद्यार्थिनी शरण्या एस. मोरे हिने प्रतिष्ठित डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत रौप्य पदक पटकावले आहे. तिच्या या यशाने शाळेचे आणि पालकांचे नाव उज्वल झाले आहे. मुंबई सायन्स टीचर्स असोसिएशनतर्फे (MSTA) आयोजित या स्पर्धेत विद्यार्थ्यांना तीन टप्प्यांतून जावे लागते. यात सैद्धांतिक लेखी परीक्षा, प्रायोगिक कौशल्य चाचणी आणि प्रकल्प सादरीकरणासह वैयक्तिक मुलाखत यांचा समावेश असतो. शरण्याने आपल्या जिज्ञासू वृत्ती, परिश्रम आणि विश्लेषणात्मक विचारसरणीच्या जोरावर हे सर्व टप्पे यशस्वीरीत्या पार करत अंतिम फेरीत रौप्य पदक मिळवले. या यशाबद्दल शाळेचे प्राचार्य नितीन कोळी यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, “शरण्याची ही कामगिरी तिच्या मेहनतीचे आणि विज्ञानावरील निष्ठेचे फलित आहे. तिचे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.” शाळेच्या सर्व शिक्षकवृंद व कर्मचाऱ्यांनी शरण्याचे अभिनंदन करत तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ती भविष्यात देशाची नामांकित वैज्ञानिक बनावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
