बॉलिवूडवर राज्य करणारा नवा राष्ट्रवादी डॉन की सरकारी पाठीराखा? – VastavNEWSLive.com

नांदेड


जय हिंदचा नारा अन् तुरुंगातून गँगस्टरगिरी! लॉरेंस बिश्नोईचा देशभक्तीचा बुरखा आणि खलिस्तानी-ड्रग्सचा छुपा खेळ!

राष्ट्रवादी डॉनचा आव, सिस्टीमचे संरक्षण अन् मुंबईतील अंडरवर्ल्डचा नवा भयानक चेहरा

मुंबईच्या रस्त्यांवर पुन्हा अंडरवर्ल्डची सावली

मुंबईच्या जुहू परिसरातील पुष्पा पार्क येथे रविवारी झालेला गोळीबार हा केवळ एका बॉलिवूड अभिनेत्यावर झालेला हल्ला नाही, तर तो मुंबईच्या सुरक्षेवर आणि व्यवस्थेवर झाडलेला थेट आव्हानात्मक टोला आहे. बीएमडब्ल्यू कारमधून फुटबॉल खेळून परतणाऱ्या टायगर श्रॉफ आणि अपारशक्ती खुराना यांच्या कारच्या विंडस्क्रीनवर चार गोळ्या झाडल्या जातात, ड्रायव्हर जखमी होतो आणि हल्लेखोर मोटरसायकलवरून पसार होतात. या घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः अभिनेत्याच्या घरी पोहोचून पाठिंबा दर्शवतात. परंतु, मूळ प्रश्न तसाच राहतो मुंबईत ९० च्या दशकातील अंडरवर्ल्डची भयानक सावली पुन्हा कशी काय पसरत आहे? यापूर्वी दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या ९ मजली इमारतीवर झाडलेल्या गोळ्या असोत, किंवा थेट देशद्रोही आणि गँगस्टरच्या धमक्यांनंतर मुकेश अंबानी यांच्या अंटीलिया बंगल्याबाहेर सापडलेली जिलेटिनच्या काड्यांची गाडी असो ज्यात एन्काउंटर स्पेशलिस्ट सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा यांचे नाव समोर आले होते अन् अलिकडेच घडलेली बाबा सिद्दीकी यांची नृशंस हत्या असो; या सर्वांच्या केंद्रस्थानी एकच नाव वारंवार समोर येत आहे लॉरेंस बिश्नोई.

दाऊदचा इतिहास, जग्गू दादाची दहशत अन् टायगर श्रॉफवरील हल्ला

या संपूर्ण प्रकरणामागे एक अत्यंत रंजक परंतु तितकाच धक्कादायक इतिहास लपलेला आहे. ८० च्या दशकात जॅकी श्रॉफ हे बॉलिवूडचे आघाडीचे अभिनेते होते. अनेकदा कामाच्या व्यस्ततेमुळे ते चित्रपट निर्मात्यांना शूटिंगच्या तारखा देऊ शकत नसत. यामुळे हैराण झालेल्या काही निर्मात्यांनी थेट अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमकडे धाव घेतली आणि जग्गू दादाला धमकावण्याची विनंती केली. परंतु, त्यावेळी दाऊद इब्राहिमने त्या निर्मात्यांना स्पष्ट शब्दांत सांगून परतावले होते की, जग्गू दादा हे माझे गुरू आहेत, मी त्यांना धमकावू शकत नाही! दाऊद इब्राहिमसारखा कुख्यात गँगस्टर ज्या जग्गू दादाच्या नावापुढे झुकत होता, त्याच जग्गू दादाचा मुलगा टायगर श्रॉफ आज लॉरेंस बिश्नोई गँगच्या निशाण्यावर आला आहे. या हल्ल्यामागील कारण काय? तर टायगर श्रॉफने सलमान खानसोबत काम करू नये, अशी वारंवार दिलेली धमकी त्याने फेटाळून लावली.

दाऊदचा कुत्ता अन् ऑडिओ मेसेजची उघड धमकी

टायगर श्रॉफवरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणारा एक ऑडिओ मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लॉरेंस बिश्नोईचा भाऊ अनिल पंडित आणि अरमान संधू यांनी या गोळीबाराची जबाबदारी घेत थेट बॉलिवूडला इशारा दिला आहे. त्यांनी या मेसेजमध्ये अत्यंत आक्रमक भाषेत म्हटले आहे की, सलमान खान हा दाऊदचा कुत्ता झाला आहे आणि दाऊद नावाचा कुत्ता आम्ही आमच्या घरात पाळला आहे.सलमान खानने काळवीट शिकार प्रकरणात बिश्नोई समाजाची माफी मागितली नाही, तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाचा सर्वनाश केला जाईल, आणि जो कोणी सलमान खानसोबत काम करेल त्याला सोडले जाणार नाही, अशी उघड धमकी या गँगस्टरने दिली आहे. कडक पोलीस सुरक्षा व्यवस्था असतानाही थेट अभिनेत्याच्या कारवर गोळ्या झाडण्याचे आणि उघडपणे आव्हान देण्याचे धाडस बिश्नोई गँगकडे येते कुठून?

हिंदू डॉनचा फर्जी देशभक्तीचा बुरखा अन् बेरोजगारीचा वापर

लॉरेंस बिश्नोईचा हा नवा अवतार दाऊद इब्राहिम किंवा छोटा राजनच्या पारंपरिक गँगस्टर मॉडेलपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. दाऊदचे संघटित शूटर आणि मुंबईत साम्राज्य असायचे; परंतु बिश्नोईचे साम्राज्य हे पूर्णपणे व्हर्च्युअल आहे. बिश्नोई स्वतःला एक राष्ट्रवादी किंवा हिंदू डॉन म्हणून सादर करतो. २०२३ मध्ये एनआयएच्या विशेष न्यायालयात हजर असताना जय हिंद आणि वंदे मातरमच्या घोषणा देणे, भगत सिंग यांचे छायाचित्र असलेली टी-शर्ट परिधान करणे, आणि सिद्धू मूसेवाला किंवा कॅनडातील सुखा दुनेके यांसारख्या व्यक्तींची हत्या करून स्वतःला खलिस्तानविरोधी आणि देशप्रेमी सिद्ध करण्याचा प्रयत्न करणे—हा सर्व त्याच्या मार्केटिंगचा एक भाग आहे. परंतु, या देशभक्तीच्या आव आणण्यामागे एक भयानक वास्तव आहे. पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील लाखो तरुण आज बेरोजगारी, पेपर लीक आणि सरकारी भरतीच्या अपयशामुळे वैफल्यग्रस्त आहेत. या बेरोजगार तरुणांना सोशल मीडियाद्वारे धर्माच्या आणि देशभक्तीच्या नावाखाली भडकवून, सुपाऱ्या देऊन शूटर म्हणून वापरले जात आहे. सर्वात मोठा दुटप्पीपणा म्हणजे, ज्या खलिस्तानी आणि ड्रग्ज माफियांविरोधात लढण्याचा दावा लॉरेंस करतो, त्याच खलिस्तानी आणि देशविरोधी संघटनांसोबत २०२०-२०२१ च्या दरम्यान शस्त्रास्त्रांची आणि ड्रग्जची तस्करी वाढवण्यासाठी या बिश्नोई गँगने छुपा करार केला होता, हे तपास यंत्रणांच्या अहवालातून उघड झाले आहे.

तुरुंगातील व्हीआयपी सुरक्षा आणि गृह मंत्रालयाचे मौन

या संपूर्ण प्रकरणात सर्वात संशयास्पद आणि गंभीर बाब म्हणजे लॉरेंस बिश्नोईला कायद्यापासून आणि इतर पोलिसांपासून मिळालेले सुरक्षा कवच.मार्च २०२३ मध्ये कडक सुरक्षा असलेल्या तुरुंगातून लॉरेंस बिश्नोई थेट टीव्ही चॅनेलला मुलाखत देतो आणि स्वतःचे स्पष्टीकरण देतो. जॅमर आणि सुरक्षा व्यवस्था असतानाही तो मोबाईल फोनवरून कॅनडातील गोल्डी ब्रार आणि आपल्या शूटरशी सतत संपर्कात राहतो.

गृह मंत्रालयाने आणि केंद्र सरकारने त्याला दिलेले कायदेशीर संरक्षण थक्क करणारे आहे:

  • ऑगस्ट २०२३: गृह मंत्रालयाने सीआरपीसी कलम २६८ अंतर्गत विशेष आदेश जारी करून लॉरेंस बिश्नोईला तुरुंगातून बाहेर नेण्यावर बंदी घातली.
  • ऑगस्ट २०२४ ते २०२६: भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम ३०३ अन्वये हा आदेश अधिक वाढवण्यात आला.

या विशेष कलमांमुळे मुंबई पोलीस, पंजाब पोलीस किंवा इतर कोणत्याही राज्यातील पोलीस लॉरेंस बिश्नोईचा ताबा चौकशीसाठी घेऊ शकत नाहीत. रोहित शेट्टी गोळीबार असो वा बाबा सिद्दीकी यांची हत्या, मुंबई पोलिसांना दिल्लीतील मंडोली किंवा गुजरातच्या साबरमती तुरुंगात जाऊन एका बंद खोलीत बसूनच त्याची जुजबी चौकशी करावी लागते. ऑक्टोबर २०२४ मध्ये कॅनडाच्या रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलीसने देखील भारतीय एजंट्स आणि बिश्नोई गँगच्या आंतरराष्ट्रीय हिंसक कारवायांवर गंभीर आरोप केले होते.

कडक सवाल: सिस्टीम गँगस्टरची की जनतेची?

आज प्रश्न हा उपस्थित होतो की, एक गुन्हेगार तुरुंगात बसून संपूर्ण देशातील उद्योगपती, अभिनेते आणि राजकारण्यांना धमकावतो, हत्यांचे सत्र चालवतो आणि सिस्टीम मात्र त्याला तुरुंगात सुरक्षित ठेवण्यासाठी नवनवीन कायदे आणि नियम लागू करते? जर देशातील नामांकित अभिनेते आणि उद्योगपतीच स्वतःच्या घरात सुरक्षित नसतील, तर सर्वसामान्य नागरिकाच्या सुरक्षेची शाश्वती कोणी द्यायची? राष्ट्रवादाचा आणि हिंदू डॉनचा बुरखा पांघरून देशातील सुशिक्षित बेरोजगारांचे बळी देणाऱ्या या व्हर्च्युअल गँगस्टरवर कडक कारवाई करण्याची वेळ आली आहे. अब सरकारने आणि गृह मंत्रालयाने मौन सोडून या गँगस्टरला कायद्याच्या चौकटीत आणून जनतेसमोर उघडे केले पाहिजे, अन्यथा मुंबई पुन्हा एकदा रक्ताने माखलेल्या ९० च्या दशकातील अंधारकोठडीत लोटली जाईल!

 


Post Views: 10










What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry