अमेरिकेला इराणचा खुला इशारा! ट्रम्पच्या धमक्यांना थेट उत्तर
इराणने पुन्हा एकदा जगाला स्पष्ट दाखवून दिले आहे की तो कोणाच्याही दबावाखाली झुकणारा देश नाही. विशेषतः अमेरिकेच्या धमक्या आणि दबावाला उत्तर देताना इराणने ज्या पद्धतीने निर्णय घेतला आहे, तो थेट अमेरिकेच्या राजकारणाला दिलेला जोरदार प्रत्युत्तर मानला जात आहे.

इराणच्या असेम्ब्ली ऑफ एक्सपर्टस या सर्वोच्च धार्मिक परिषदेनं घेतलेला निर्णय हा थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांना दिलेला राजकीय चपराक असल्यासारखा आहे. तुमचा सर्वोच्च नेता माझ्या मर्जीने असला पाहिजे, नाहीतर जो कोणी नेता बनेल त्याला संपवू अशा गर्विष्ठ भाषेला इराणने स्पष्ट शब्दांत फाटा दिला आहे. इराण म्हणजे काही एखादे बाहुलं राज्य नाही की जे वॉशिंग्टनच्या इशाऱ्यावर नाचेल. इराण हा स्वतःच्या निर्णयांवर उभा असलेला राष्ट्र आहे आणि ते पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
इराणच्या असेम्ब्ली ऑफ एक्सपर्ट्स या संस्थेत एकूण ८८ सदस्य असतात. हे सर्व उच्च दर्जाचे धार्मिक विद्वान असतात आणि इराणचा सर्वोच्च नेता निवडण्याचा अधिकार फक्त या परिषदेकडे असतो. या परिषदेनं आधीच नवीन सर्वोच्च नेता निवडला होता, मात्र त्याचे नाव काही काळ गुप्त ठेवण्यात आले होते. अखेर ते नाव जाहीर झाले आहे. नवीन सर्वोच्च नेता म्हणून मोजतबा खामेनाई यांची निवड करण्यात आली आहे. ते सध्याचे सर्वोच्च नेता सय्यद अली हुसेनी खामेनाई यांचे पुत्र आहेत आणि त्यांचे वय सुमारे ५६ वर्षे आहे.
मोज्तबा खामेनेई हे केवळ वारस म्हणून पुढे आलेले नाहीत; त्यांची प्रतिमा अत्यंत कठोर, आक्रमक आणि संघर्षाला थेट उत्तर देणाऱ्या नेत्याची आहे. अमेरिका काय म्हणेल,इज्राएल काय म्हणेल याची पर्वा न करता इराणने आपला नेता स्वतः निवडला आहे. इराणच्या सत्ताकेंद्रात इस्लामिक रेव्होल्यूशनरी गार्ड कॉप्स (IRGC) या शक्तिशाली लष्करी संस्थेचा प्रचंड प्रभाव आहे. मोज्तबा खामेनेई यांचा त्या संस्थेत मोठा प्रभाव असल्याचे मानले जाते. जरी त्यांनी कोणतेही औपचारिक सरकारी पद घेतले नसले, तरी ते अनेक वर्षे त्यांच्या वडिलांच्या विश्वासू कोर टीममध्ये होते आणि महत्त्वाच्या रणनीतिक निर्णयांवर त्यांचा प्रभाव असल्याचे सांगितले जाते. इराणमध्ये राष्ट्रपतीपेक्षाही जास्त अधिकार सर्वोच्च नेत्याकडे असतात. त्यामुळे या पदावर कोण बसतो यावर देशाची दिशा ठरते. अमेरिकेने २०१९ मध्ये मोज्तबा खामेनेई यांच्यावर निर्बंध लावले होते, कारण अमेरिकेचा आरोप होता की ते कोणतेही निवडलेले पद नसतानाही सत्तेच्या निर्णयांवर प्रभाव टाकतात.

मध्यपूर्वेतील अनेक तज्ज्ञांचे मत आहे की मोज्तबा खामेनेई हे तडजोडीचे राजकारण करणारे व्यक्तिमत्व नाही. ते कठोर भूमिकेसाठी ओळखले जातात. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली इराणचा दृष्टिकोन अधिक आक्रमक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या निर्णयातून इराणने जगाला एकच संदेश दिला आहे.इराण आपले नेतृत्व स्वतः ठरवतो. अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाच्या दबावाने इराणचा मार्ग बदलणार नाही. मोज्तबा खामेनेई यांची सर्वोच्च नेतेपदी निवड होताच क्षेपणास्त्र हल्ल्यांची मालिका सुरू झाल्याचे वृत्त आहे. बहरीन,तेल अवीव,हायफा मधील तेल रिफायनऱ्या आणि सैनिकी तळांवर जोरदार क्षेपणास्त्र मारा करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यावरून स्पष्ट होते की पदाचा कार्यभार हातात घेताच मोज्तबा खामेनेई यांनी आपली आक्रमक भूमिका जगासमोर दाखवून दिली आहे.

मध्यपूर्वेत आधीच तणावपूर्ण परिस्थिती असताना हे युद्ध आता कोणत्या स्तरापर्यंत जाईल, हे सांगणे कठीण झाले आहे. परिस्थिती इतकी धोकादायक बनली आहे की पुढे काय होईल हे जणू फक्त देवच जाणतो. मात्र एक गोष्ट निश्चित मानली जात आहे इराण माघार घेणारा देश नाही. कारण सध्याचे सर्वोच्च नेता मोज्तबा खामेनेई यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य संघर्षात मारले गेल्याचे सांगितले जाते. त्यामुळे सूड आणि प्रतिकाराची भावना अधिक तीव्र झाली आहे. राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की मोज्तबा खामेनेई यांची प्रतिमा त्यांच्या वडिलांपेक्षाही अधिक कठोर आणि आक्रमक नेत्याची आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली इराण अधिक कठोर आणि आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


