डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 13 लाखांची फसवणूक:नागपूर सायबर पोलिसांनी परत मिळवली रक्कम, आरोपीला दिल्लीतून ताब्यात घेणार
![]()
नागपुरात डिजिटल अरेस्टच्या नावाखाली एका वयोवृद्ध दाम्पत्याची 13 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. सायबर पोलिसांनी तत्पर कारवाई करत अवघ्या एका महिन्यात फसवणुकीची संपूर्ण रक्कम तक्रारदारांना परत मिळवून दिली. अज्ञात आरोपींनी या दाम्पत्याला व्हिडिओ कॉल करून त्यांच्या नावावर बँक खाते उघडल्याचे खोटे सांगितले. या खात्याचा वापर दहशतवादी आणि इतर बेकायदेशीर कारवायांसाठी होत असल्याचे भासवून, त्यांच्यावर गंभीर गुन्हा दाखल झाल्याचे सांगण्यात आले. आरोपींनी “तुम्हाला डिजिटल पद्धतीने अटक करण्यात येणार आहे,” असा धाक दाखवत दाम्पत्याला मानसिकदृष्ट्या घाबरवले. त्यांना सतत व्हिडिओ कॉलवर ठेवून कोणाशीही संपर्क साधू न देण्यास सांगितले. तपासासाठी सर्व रक्कम शासकीय खात्यात जमा करण्याचे खोटे आश्वासन देत, ती परत मिळेल असे सांगितले. भीतीपोटी आणि गोंधळलेल्या अवस्थेत दाम्पत्याने आरोपींच्या सांगण्यावरून 13 लाख रुपये निर्दिष्ट बँक खात्यात वर्ग केले. काही वेळाने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, त्यांनी तात्काळ नागपूर सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. तक्रार मिळताच सायबर पोलिसांनी गुन्हा क्र. 38/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 च्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान, पोलिसांनी संबंधित बँक खात्यांची माहिती मिळवून त्यावर तातडीने ‘लियन’ (कायदेशीर रोख) लावला. या जलद कारवाईमुळे फसवणुकीची संपूर्ण रक्कम गोठवण्यात यश आले. पुढील न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, एका महिन्याच्या आतच तक्रारदारांना त्यांची 100 टक्के रक्कम परत मिळाली. सायबर गुन्ह्यांमध्ये संपूर्ण रक्कम परत मिळण्याचे प्रमाण कमी असताना, नागपूर सायबर पोलिसांची ही कामगिरी विशेष उल्लेखनीय ठरली. तपासात आरोपींची ओळख पटली असून, मुख्य आरोपी दिल्ली येथील कारागृहात असल्याची माहिती समोर आली आहे. त्याला ताब्यात घेण्यासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
