नांदेडचा सुपुत्र भारतीय सैन्यात लेफ्टनंट – सरदार रमणज्योतसिंघ  यांची प्रेरणादायी कामगिरी


नांदेड –  शहरातील नंदीग्राम सोसायटीचे रहिवासी सरदार रमणज्योत सिंघ  यांनी अथक परिश्रम, शिस्त आणि जिद्दीच्या बळावर भारतीय सैन्यात लेफ्टनंट पद मिळवत कुटुंबासह संपूर्ण समाजाचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

रमणज्योत  सिंघ  यांचे वडील सरदार गुरजीत  सिंघ  हे एसटी महामंडळात बस चालक म्हणून कार्यरत आहेत, तर आई गृहिणी आहेत. साध्या कुटुंबातून आलेल्या रमणज्योत यांनी लहानपणापासूनच देशसेवेचे स्वप्न मनात बाळगले होते.

त्यांनी २०१५ मध्ये नांदेड येथील आंध्र समिती हायस्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर सायन्स कॉलेज, नांदेड येथून बारावी विज्ञान शाखा पूर्ण केली. पुढे २०२१ मध्ये एमजीएम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकीमध्ये पदवी संपादन केली.

शाळा व महाविद्यालयीन काळात एनसीसीमध्ये सहभाग घेतल्यामुळे त्यांच्या सैन्यात जाण्याच्या स्वप्नाला योग्य दिशा मिळाली. २०१७ पासून त्यांनी सैन्यात अधिकारी होण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अनेक चढ-उतार, कठोर परिश्रम आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर अखेर एप्रिल २०२५ मध्ये त्यांना गया येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी (OTA) मध्ये प्रवेश मिळाला.

तेथे ११ महिन्यांचे कठोर व शिस्तबद्ध प्रशिक्षण पूर्ण करून ते भारतीय सैन्यात लेफ्टनंट या क्लास-१ राजपत्रित अधिकारी पदावर पासआउट झाले. ओटीए गया येथील प्रशिक्षण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक असले तरी ते जीवन समृद्ध करणारे आणि प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्यास तयार करणारे ठरले, असे रमणज्योत यांनी सांगितले.

स्वप्न पाहणे आणि ते प्रत्यक्षात जगणे यात मोठा फरक असतो. अनेक अडचणींवर मात करत आज मी माझे स्वप्न पूर्ण केले. माझ्या या यशामुळे माझ्या पालकांचा आणि समाजाचा अभिमान वाढला आहे, याचा मला अत्यंत आनंद आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.या संपूर्ण प्रवासात त्यांच्या पालकांनी सतत प्रेरणा दिली आणि प्रत्येक कठीण प्रसंगी ठामपणे साथ दिली. आज त्यांच्या यशामुळे कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

युवकांना संदेश देताना रमणज्योत म्हणाले, जर तुमच्यात शिस्त, समर्पण आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी असेल तर कोणतेही स्वप्न सत्यात उतरू शकते. आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवा, पालक व शिक्षकांचा आदर करा, शरीर आणि मन मजबूत ठेवा आणि राष्ट्रसेवेसाठी सदैव तयार रहा. स्वतःवर विश्वास आणि सातत्य असेल तर काहीही अशक्य नाही. सरदार रमणज्योत सिंघ  यांच्या या प्रेरणादायी यशामुळे नांदेड जिल्ह्याचा गौरव वाढला असून अनेक तरुणांसाठी ते प्रेरणास्थान ठरत आहेत.वास्तव न्यूज लाईव्ह परिवार सुद्धा सरदार रमणज्योत सिंघ यांना शुभकामना देत आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *