मध्यपूर्वेत युद्धाचा नवा अध्याय! पाणी-तेलावरचे हल्ले जगासाठी धोक्याची घंटा ; हॉर्मुझची कोंडी आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर संकटाची तलवार
इराणमध्ये समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून गोड पाणी तयार करणाऱ्या प्रकल्पावर हल्ला करून तो पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आला. या हल्ल्याचा परिणाम असा झाला की इस्रायलच्या सुमारे ३० ते ४० गावांमध्ये पाण्याचे तीव्र दुर्भिक्ष निर्माण झाले. याला प्रत्युत्तर देताना बहरीनमधील अशाच प्रकारच्या पाणी निर्मिती प्रकल्पावरही हल्ला करून तो नष्ट करण्यात आला. यावर IRGC ने स्पष्ट इशारा दिला आहे, आम्ही घाबरणार नाही. युद्ध असेल तर आम्ही लढणारच. पाणी बंद पडलं तरी आम्ही मागे हटणार नाही; युद्धासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत.
इराणमधील एका ऑइल डेपोवर झालेल्या हल्ल्यानंतर तर परिस्थिती अधिकच भयावह झाली. तेल हवेत उडून पेटल्यामुळे आकाश काळवंडले आणि काळा पाऊस पडल्यासारखी स्थिती निर्माण झाली. दरम्यान अमेरिकेनेही आपली भूमिका बदलत असल्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी जाहीर केले आहे की इराणमधील तेलसाठे आणि पाण्याचे स्रोत यांवर थेट हल्ला करण्याचा त्यांचा सध्या कोणताही इरादा नाही.
अरब देशांमध्ये इराणी हल्ल्यांचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. मात्र इस्रायलमध्ये परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. व्हिडिओ बनवणे, नुकसान दाखवणे, मृतदेह किंवा विध्वंसाचे दृश्य दाखवणे यावर कठोर बंदी घालण्यात आली आहे. पत्रकारांनाही युद्धाचे वास्तव चित्रण करण्यास मनाई करण्यात आली आहे. आदेश स्पष्ट आहे नुकसान किंवा मृत्यूचे दृश्य दाखवले तर कारवाई होईल. दरम्यान सौदी अरेबियामध्ये झालेल्या एका इराणी हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाल्याची बातमीही समोर आली आहे.
युद्धामुळे फक्त जीवितहानीच नाही, तर आर्थिक नाड्याही तुटत आहेत. कारण हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्यात आली आहे. या मार्गाने बाहेर जाणारी जहाजे थांबली तर तेलाची वाहतूक थांबते,आणि तेल थांबले म्हणजे पैसा थांबतो. ही वस्तुस्थिती आता सर्वांना जाणवू लागली आहे.
इराणला मात्र हे युद्ध लांब चालावे असे वाटत असल्याचे संकेत दिसत आहेत. कारण त्यांना वाटते की दीर्घकालीन युद्धामुळे अमेरिकेची आर्थिक शक्ती कमकुवत होईल आणि आजपर्यंत त्यांनी इराणवर घातलेल्या आर्थिक बंधनांची किंमत अमेरिकेलाच मोजावी लागेल.
अमेरिकेची योजना मात्र वेगळी होती. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांना लक्ष्य करणे, मोठमोठ्या नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना संपवणे,हा त्या योजनेचा भाग होता. या कारवायांमध्ये काही प्रमाणात यश मिळालेही. पुढचा डाव असा होता की इराणची जनता रस्त्यावर उतरेल, सरकारविरोधात आंदोलन करेल आणि अमेरिकेला मान्य असलेले नेतृत्व पुढे येईल. पण हा संपूर्ण डाव पूर्णपणे फसला. इराणची जनता उलट आपल्या सरकारच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली.
अमेरिकेने इराणमधील काही गटांना बंड करण्यास प्रवृत्त करण्याचाही प्रयत्न केला. पण त्यालाही इराणने कठोर प्रत्युत्तर दिले. काही ठिकाणी क्षेपणास्त्र हल्ले करून ते प्रयत्न अक्षरशः चिरडून टाकण्यात आले.
अमेरिकेची अपेक्षा होती की इराणचा पुढचा सर्वोच्च नेता त्यांच्या संमतीने निवडला जाईल. पण तेही घडले नाही. इराणने स्वतःच आपले नेतृत्व ठरवले. आणि अमेरिकेने लगेच धमकी दिली,तो जास्त दिवस जिवंत राहणार नाही.
सध्या इराणमधील युद्धनियोजन आणि नियंत्रण अली लारीजानी यांच्या हातात असल्याचे सांगितले जाते. त्यांनी बाहेरून येणाऱ्या कोणत्याही दबावाला किंवा वक्तव्यांना किंमत दिलेली नाही. त्यांच्या मते जे योग्य वाटते तेच ते करत आहेत. आता परिस्थिती अशी झाली आहे की इतर देशही अमेरिकेविरुद्ध उघड बोलू लागले आहेत. स्पेनने स्पष्ट सांगितलेआमचे सैन्य वापरायचे असेल तर ते संरक्षणासाठी; आक्रमणासाठी नाही. इराणवरील हल्ला बेकायदेशीर आहे.”

स्वित्झर्लंडनेही अमेरिकेच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ब्रिटनने सावध भूमिका घेत सांगितले की त्यांचे सैन्य आक्रमणासाठी नव्हे तर सुरक्षेसाठी वापरले जाईल. फ्रान्स कधी अमेरिकेसोबत उभा राहतो, तर कधी सांगतो आधी हल्ले थांबवा, मग चर्चा करू.”
दरम्यान IRGC ने आणखी एक स्पष्ट इशारा दिला आहे की
अमेरिका जर आमच्या जमिनीवर पाय ठेवेल, तर ते सैनिक परत चालत जाणार नाहीत; ते ताबूतात परततील.
पर्शियन आखातातील अनेक देश समुद्राच्या पाण्याचे गोड पाण्यात रूपांतर करणाऱ्या प्रकल्पांवर अवलंबून आहेत—
कुवेत सुमारे ९०%,
ओमान ८६%,
सौदी अरेबिया ७०%,
यूएइ ४२ %,
तर इतर अनेक देश मोठ्या प्रमाणावर या प्रणालीवर अवलंबून आहेत.
या प्रकल्पांवर हल्ले झाले तर संपूर्ण प्रदेशात पाण्याचे मोठे संकट निर्माण होऊ शकते. IRGC च्या प्रमुखांनी स्पष्ट सांगितले आहे की इराण पुढील सहा महिने युद्ध करण्यास पूर्णपणे सक्षम आहे. एवढेच नव्हे, तर त्यांच्याकडे असलेली नवीन क्षेपणास्त्रे आणि अत्याधुनिक ड्रोन अजून वापरलेच गेलेले नाहीत, असा दावा देखील करण्यात आला आहे.
आणि शेवटी एक टोला
भारतीय प्रसारमाध्यमे अनेकदा इराणपेक्षा इराणबद्दल जास्त माहिती असल्यासारखी वागतात. कधी ते म्हणतात नवीन सर्वोच्च नेता निवडला गेला, कधी शपथविधी झाल्याच्या बातम्या देतात. पण वास्तव काय आहे, हे मात्र अनेकदा त्या बातम्यांमध्ये दिसतच नाही.
