काँग्रेसचा 72 तासांचा विरोध दीड तासातच पाठिंब्यामध्ये बदलला:अंबादास दानवेंविरुद्ध उमेदवार देण्यावरून काँग्रेसची माघार
![]()
मविआतर्फे उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंनी लढण्यास विरोध करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ७२ तासांपूर्वी बंडाचे संकेत दिले होते. मात्र, उद्धवसेनेच्या नेत्यांचे शिष्टमंडळ गुरुवारी सपकाळ, विजय वडेट्टीवारांना भेटले. त्यांच्यात दीड तास चर्चा झाली आणि ७२ तासांचा विरोध पाठिंब्यात बदलला. दोन वर्षांनंतर राज्यसभेची एक जागा मविआतर्फे काँग्रेसला मिळेल, अशी तडजोड काँग्रेसने स्वीकारली. यामुळे विधान परिषदेतील सर्व दहा जण बिनविरोध विजयी झाले. बच्चू कडू शिंदेसेनेत प्रवेश करताच आमदार झाले. आता सर्वांना विकासकामांवर लक्ष केंद्रित करता येईल -देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात निवडणूक बिनविरोध होण्याची एक चांगली संस्कृती आहे. विधान परिषद बिनविरोध होत असल्याने विनाकारण होणारा घोडेबाजार टळेल आणि आता आपणा सर्वांना मिळून राज्याच्या विकासकामांवर अधिक लक्ष केंद्रित करता येईल. काही लोकांचं ‘तुम लडो, हम कपडा संभालते’ असं कायम असतं – एकनाथ शिंदे काही लोक लढायची वेळ येते तेव्हा कुणाला तरी पुढे करतात. तुम लडो, हम कपडा संभालते असं काही लोकांचं कायम असतं. पण हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे. काँग्रेससह सगळ्यांनी समंजस भूमिका घेतली, म्हणून ही निवडणूक बिनविरोध झाली. विधान परिषदेचे दहाही उमेदवार बिनविरोध
भाजप : सुनील कर्जतकर माधवी नाईक संजय भेंडे विवेक कोल्हे प्रमोद जठार
शिवसेना (शिंदे गट): बच्चू कडू नीलम गोऱ्हे
राष्ट्रवादी (अजित पवार गट): झिशान सिद्दिकी
उद्धवसेना : अंबादास दानवे
पोटनिवडणूक : प्रज्ञा सातव (भाजप) दोन वर्षांनंतर राज्यसभेत एका जागेच्या मोबदल्यात काँग्रेसने पाऊल घेतले मागे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, २०२८, २०२९ च्या विधान परिषद, राज्यसभेत काँग्रेसला प्राधान्य मिळेल, अशी चर्चा मित्रपक्षांशी झाली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी दानवेंच्या भेटीनंतर “विधान परिषद तुमची आणि राज्यसभा आमची! या सूत्रानुसार आम्ही पुढे जात आहोत.’ असे सूचक वक्तव्य केले. तर दोन्ही निवडणुकांना बराच काळ आहे. मध्यंतरी काहीही घडू शकते, असा सूर संजय राऊत यांनी लावला. त्यामुळे मविआत सध्या तरी उद्धवसेनेची सरशी, काँग्रेसची कोंडी झाल्याचे दिसते.
