मुंबई पळवण्याचा डाव कसा फसला?:'महाराष्ट्र' नावालाही विरोध का झाला; संयुक्त महाराष्ट्र कसा मिळाला, वाचा 108 हुतात्म्यांचा अभूतपूर्व लढा!
![]()
आज 1 मे. महाराष्ट्र दिन. याच दिवशी 1960 मध्ये मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला. मात्र, त्यासाठी 108 हुतात्म्यांचे बलिदान गेले. तेव्हाच्या सरकारने साम, दाम, दंड, भेद या साऱ्याचा वापर करून संयुक्त महाराष्ट्राला विरोध केला. महाराष्ट्रापासून मुंबईचा लचका तोडण्याचा प्रयत्न झाला. या विरोधात लढा उभारला. तेव्हा आपल्याच सरकारने आपल्याच माणसांवर अक्षरशः गोळ्या झाडल्या. विशेष म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे सगळे घडले. प्रचंड वाईट गोष्ट म्हणजे आपल्या राज्याला ‘महाराष्ट्र’ हे नाव द्यायलाही सरकारने विरोध केला. महाराष्ट्राने आपली भूमी तर गमावलीच, पण नाव मिळवण्यासाठीही झगडावे लागले. एस. एम. जोशी, श्रीपाद डांगे, आचार्य अत्रे, चिंतामणराव देशमुख, सेनापती बापट, क्रांतिसिंह नाना पाटील, लोकशाही अण्णाभाऊ साठे, बॅ. नाथ पै यांनी दिल्लीच्या तख्ताला हादरे दिले. जाणून घ्या, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची चित्तथरारक गोष्ट. काँग्रेस नेत्यांचे दिल्लीसमोर लोटांगण भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर भाषा आधारित प्रांत रचना करण्यासाठी राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना झाली. या तीन सदस्यीय आयोगात न्यायमूर्ती फाजल अली, हृदयनाथ कुंजरू आणि के. एम. पणीकर होते. या आयोगाला फाजल अली समितीही म्हणतात. या समितीची 1953 मध्ये स्थापना झाली. या समितीचा अहवाल 1955 च्या ऑक्टोबरमध्ये आला. त्यात मुंबई व महाराष्ट्राची फारकत करणारी त्रिराज्य योजना मराठी माणसांच्या बोकांडी लादली गेली. या योजनेला प्रचंड विरोध सुरू झाला. मात्र, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात काँग्रेसच्या नेत्यांनी दिल्लीसमोर लोटांगण घातले. डाव्या पक्षांनी लढा हातात घेतला यशवंतराव चव्हाण यांनी तर हद्दच केली. नेहरू व संयुक्त महाराष्ट्रात, मला नेहरू महत्त्वाचे वाटतात, असे ते म्हणाले. त्यामुळे हा लढा डाव्या पक्षांनी हातात घेतला. एस.एम. जोशी, श्रीपाद डांगे यांनी लढ्याचे नेतृत्व केले. कम्युनिस्ट, सोशालिस्ट, प्रजासमाजवादी नेतृत्व पुढे आले. सेनापती बापट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, एस. एम. जोशी, प्रल्हाद केशव अत्रे, श्रीपाद डांगे, शाहीर अमर शेख, भाई उद्धवराव पाटील, प्रबोधनकार ठाकरे, शाहीर अमर शेख, शाहीर अण्णाभाऊ साठे,शाहीर गव्हाणकर ह्यांनी मराठी लोकांमध्ये स्फुल्लिंग चेतवले. आचार्य अत्रे यांनी आपल्या ‘मराठा’ दैनिकातून संयुक्त महाराष्ट्राचा पुरस्कार केला. सरकारवर टीकेची झोड उडवली. एस. एम. जोशींचा पुढाकार मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा यासाठी पहिल्यांदा महाराष्ट्र परिषदेची स्थापना झाली. या परिषदेमध्ये बडे काँग्रेस नेते सहभागी होते. शंकरराव देव हे परिषदेचे अध्यक्ष होते. मात्र, त्यांनी अचानक ही परिषद बरखास्त केली आणि संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनापासून दूर गेले. त्यानंतर प्रजासमाजवादी पक्षाने बिगर काँग्रेस पक्षांची संयुक्त महाराष्ट्र कृती समिती स्थापन केली. मात्र, ही समिती सुद्धा प्रजासमाजवादी पक्षाने बरखास्त केली. अखेर 6 फेब्रुवारी 1956 रोजी एस. एम. जोशी यांच्या पुढाकाराने पुण्यात संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली. अन् पुढचा सारा संघर्ष, संयुक्त महाराष्ट्राचा लढा या समितीने लढला. मोरारजी सरकारचा निष्ठूर गोळीबार मोरारजी देसाई व स. का.पाटील या काँग्रेस नेत्यांनी 20 नोव्हेंबर 1955 रोजी मुंबईतल्या चौपाटीवर एक सभा घेतली. या ठिकाणी नाही ती मुक्ताफळे उधाळली. स. का. पाटील म्हणाले, ‘पाच हजार वर्षांनी सुद्धा मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही. मोरारजी देसाई म्हणाले, ‘काँग्रेस जिवंत असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही, गुंडगिरीला योग्य जबाब मिळेल.’ त्यामुळं संताप उसळला. लोकांनी सभा उधळली. दुसऱ्या दिवशी मोठे आंदोलन झाले. यावर पोलिसांनी गोळीबार केला. त्यात 15 जण शहीद झाले. सरकारने 1956 मध्ये केंद्रशासित मुंबईची घोषणा केली. त्याविरोधातही मराठी जनता रस्त्यावर उतरली. महाप्रचंड लढा उभारला. मात्र, मोरारजी सरकारने केलेल्या निष्ठूर गोळीबारात 80 जण शहीद झाले. संयुक्त महाराष्ट्रातील आंदोलनात जवळपास 108 जणांना हौतात्म्य आले. त्यांचे स्मारक मुंबईच्या फ्लोरा फाउंटनमध्ये उभारले गेले. गोळी डोक्यामागून लागून तोंडातून बाहेर संयुक्त महाराष्ट्रासाठी बेळगावच्या संभाजी चौकात आंदोलन झाले. या आंदोलनातील नागप्पा होसूरकर या तरुणाला पोलिसांनी पकडले. त्याला साडेतीन महिन्यांची सक्तमजुरी झाली. ही शिक्षा भोगताना हिंडलगे तुरुंगात नागप्पाला भीषण मारहाण झाली. त्याचे डोळे सुजलेले. ओठात दात रुतलेले. कानशीले सुजली. पोलिसी अत्याच्यामुळे त्याने प्राण सोडला. 21 नोव्हेंबर 1955 रोजी तत्कालीन फ्लोरा फाउंटनजवळ पोलिसांनी गोळबार केला. त्यात एका तरुण आंदोलकाचा मृत्यू झाला. शरद वाणी त्याचे नाव. त्याचे वडील पोलिस होते. आपली नोकरी जाईल या भीतीने त्यांनी आपल्या मुलाचे नाव कुठल्याही बातमीत येऊ दिले नाही. पेपरात प्रसिद्ध झालेल्या हुतात्म्यांच्या यादीतही त्याचे नाव नव्हते. या घटनेच्या सहा महिन्यांनी शरदच्या आईने आचार्य अत्रे यांना पत्र पाठवले. त्यात म्हटले होते, शरदच्या वडिलांनी त्याचा मृतदेह रुग्णालयात पाहिला. गोळी डोक्याच्या मागून लागलेली. ती तोंडातून बाहेर पडलेली. छातीतही गोळ्या घुसलेल्या. चेहराही ओळखणे दुरापास्त झाले होते. मोरारजी देसाईंचे पोलिस साडेपाच इंचाचे बंदुकीचे काडतूस वापरायचे. त्यामुळे ही गोळी डोक्यातून बाहेर आलेली. अत्रे यांना हे समजले तेव्हा ते ओक्साबोक्शी रडले. थेट संसदेवर काढला मोर्चा महाराष्ट्रात झालेला गोळीबार, सरकारी अत्याचाराचा फिरणारा वरवंटा या विरोधात हजारो कार्यकर्त्यांनी दिल्लीला धडक दिली. 27 जुलै 1956 रोजी दुपारी 3 वाजता कॅनॉट सर्कल येथून संसदेवर मोर्चा निघाला. अठरा वर्षांचे तरणेबांड कार्यकर्ते ते 80 वर्षांचे वृद्ध, दोन-तीन वर्षांची मुले कडेवर घेऊन सहभागी झालेल्या महिला. सारे चित्रच अभूतपू्र्व होते. ‘गोलाबारी की जाँच करो, नहीं तो कुर्सी छोड दो,’ ‘दिल्लीवालों साथ दो, बंबई को न्याय दो,’ ‘डंडे-गोली खाएंगे, बंबई को मिलाएंगे,’ ‘जब तक बंबई गुलाम है, तब तक आराम हराम है,’ ‘हम क्या चाहते है? बंबई! और क्या चाहते हैं? बेलगाँव! और क्या चाहतें है? कारवार!’ अशा घोषणांनी दिल्लीच्या तख्ताला घाम फोडला. शाहीर अमर शेखांनी आपल्या पहाडी आवाजात गीतकार शैलेंद्रांचे गीत सुरू केले… आयेगी मुश्किलें हजार, पर हम भी लाचार नहीं। दो कौडी के मोल, मराठी बिकने को तैयार नहीं। भारत का इतिहास आज से इक नई करवट लेगा। जागा मराठा आम जमाना बदलेगा । काँग्रेस खासदारांनी फिरवली पाठ संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा मोर्चा संसदेसमोर पोहचला. कोल्हापूर, बेळगाव, कारवार, निपाणीहून आलेली तुकडी उठून दिसत होती. सगळ्यांनी भगवे फेटे बांधलेले. संसदभवनाच्या प्रवेशद्वाराजवळ अनेक खासदारांनी येऊन आंदोलकांची विचारपूस केली. दिलासा दिला. मात्र, महाराष्ट्राचा एकही काँग्रेस खासदार इकडे फिरकला नाही. त्यांनी आपल्या भूमिपुत्रांची साधी विचारपूसही केली नाही. जगभरात या मोर्चाचे पडसाद उमटले. देशोदेशीच्या वर्तमानपत्रात बातम्या झळकल्या. भारताच्या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचे जनक आणि केंद्रीय अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख यांनी लोकसभेत पंतप्रधान पंडित नेहरूंना धारेवर धरले. ते म्हणाले, मंत्रिमंडळाची सर्व सत्ता बळकावणारे आणि नागरिकस्वातंत्र्याची गळचेपी करणारे तुम्ही एक हुकूमशहा आहात. राज्यकर्त्या पक्षाच्या अंतःकरणात महाराष्ट्राविषयी वैरभावाची तीव्र भावना आहे. मुंबई महाराष्ट्रपासून वेगळी का करावी, याचे एकही संयुक्तिक कारण तुमच्याकडे नाही. त्याचबरोबर असे करण्यात भारताचे व महाराष्ट्राचे काय हित साधले जाणार आहे याचे कुठलेही स्पष्टीकरण तुमच्याकडे नाही, पण तरीही तसा निर्णय तुम्ही घेतलात.’ जनरल डायरला लाजवणारा अत्याचार महाराष्ट्रात झालेल्या पाशवी गोळीबाराचा चिंतामणराव देशमुख घोर निषेध केला. यावर लोकसभेत बोलताना त्यांचे शब्द ठिगण्यासारखे बाहेर पडत होते. ते म्हणाले, ‘मुंबईसारखे हत्याकांड इतर कुठल्याही देशात झाले असते, तर त्याची न्यायालयीन चौकशी कायद्यानेच करणे भाग पडले असते, पण मुंबईच्या मुख्यमंत्र्याने आणि गृहमंत्र्यांनी मुंबईमधल्या अत्याचारांची चौकशी करण्याची विनंती तडकाफडकी आणि असभ्यपणे नाकारली. यावरून राज्यकर्त्याच्या पक्षाच्या मनात महाराष्ट्राविरुद्ध तीव्र वैरभाव आहे, असे आपल्याला वाटते. म्हणून त्या पक्षाच्या संगतीत राहावयास आपण यापुढे मुळीच तयार नाही. हिंसेचे नियंत्रण न्यायाने व समजूतदार वागणुकीने होते. मुंबईबाबत ज्यांनी निर्णय घेतला, त्यांच्या आक्रमक अहिंसेने भारताच्या ऐक्याला जेवढा धोका पोहचेल तेवढा प्रत्यक्ष हिंसेच्या उद्रेकानेही पोहचणार नाही. हिंसेची गय करावी असे कोणीही शहाणा माणूस म्हणणार नाही. पण जेथे शेकडो नागरिकांचा प्रश्न येतो, तेथे हिंसेचा प्रतिकार खंबीरपणे करण्यात यावा. पाशवी रीतीने करण्यात येऊ नये. मुंबईत काही चाळींमध्ये अश्रुधूर सोडून बायका-मुले बाहेर रस्त्यावर काढण्यात आली. मग त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.’ जनरल डायरच्या कृत्यालाही लाजवणारा हा भारत सरकारचा अत्याचाराचा गौप्यस्फोट चिंतामणराव देशमुखांनी केला. तेव्हा लोकसभेत अक्षरशः स्मशानशांतता पसरली. याचवेळी चिंतामणराव देशमुखांनी सभागृहात राजीनामा दिला. नेहरू तो स्वीकारणार नाहीत. देशमुखांसारखा बुद्धिमान, निरलस, निःस्पृह व्यक्तीची बोलतील अशी शक्यता वाटत होती. पण त्यांनी घोर निराशा केली. पंडित नेहरूंनी तो राजीनामा स्वीकारून तातडीने राष्ट्रपतींकडे पाठवला. गुजरातला 208 गावांची खैरात चिंतामणराव देशमुखांनी काँग्रेस, नेहरू, गोविंद वल्लभपंत यांची कोडी केली. त्यांना प्रत्युत्तर देणे कोणालाही जमले नाही. त्यामुळे सरकारला नमते घ्यावे लागले. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला यश आले. 8 मार्च 1960 रोजी 1 मे पासून द्विभाषिक राज्य संपुष्टात आणणार असल्याचे जाहीर केले. विशेष म्हणजे 23 एप्रिल 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीला संसदेने मान्यता दिली. मुंबई सरकारने विधानसभेत एक विधेयक सादर केले. मुंबई पुनर्रचना विधेयक 1960 या नावाने ते ओळखले जाते. या विधेयकातून महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या निर्मितीचा आराखडा मांडला. मात्र, येथेही महाराष्ट्रावर अन्याय केला. डांग हा 95 टक्के मराठी भाषक असलेला भाग गुजरातला आंदण दिला. सोबतच महाराष्ट्राची 208 गावे गुजरातला दिली. त्यात ठाणे जिल्ह्यातल्या उंबरगाव तालुक्यातली 51 गावे, पश्चिम खान्देशमधल्या नवापूर तालुक्यातली 38 गावे, नंदुरबार तालुक्यातील 38 गावे, अक्कलकुवा तालुक्यातील 37 गावे आणि तळोदा तालुक्यातील 44 गावांचा समावेश आहे. विशेष म्हणजे मुंबई पुनर्रचना विधेयकात याचा कुठेही उल्लेख नाही. ‘महाराष्ट्र’ नाव द्यायलाही विरोध आपल्या राज्याला महाराष्ट्र हे नाव द्यायलाही अनेकांनी विरोध केला. सरकारने जे मुंबई राज्य पुनर्रचनेचे विधेयक विधानसभेत मांडले होते, त्यात ‘महाराष्ट्र’ या नावाचा कुठेही उल्लेख नव्हता. आपल्या मराठी राज्याला महाराष्ट्र ऐवजी मुंबई राज्य असे नाव देण्याचा काँग्रेससह यशवंतराव चव्हाण यांचा आग्रह होता. मुंबई या नावाला आंतरराष्ट्रीय वजन आहे. त्यामुळे हेच नाव द्यावे, अशी मखलाशी केली होती. लढा संयुक्त महाराष्ट्राचा या महेश मांगले यांच्या पुस्तकात यावर सविस्तर विवेचन केले आहे. मांगले म्हणतात, मुंबई नावाच्या आग्रहामुळे महाराष्ट्र हे नावच इतिहास जमा होण्याची शक्यता निर्माण झाली होती. हा धोका आचार्य अत्र्यांनी ओळखला. त्यांनी या प्रश्नावर नाव उठवायला सुरुवात केली. प्राचीन इतिहास, वाड्मय याचे अनेक पुरावे देत त्यांनी वृत्तपत्रातून सरकारचा समाचार घ्यायला सुरुवात केली. महाराष्ट्रद्वेषाचे शेपूट अजून वळवळते महेश मांगले आपल्या लढा संयुक्त महाराष्ट्राचा या पुस्तकात पुढे म्हणतात, आचार्य अत्रे यांनी महाराष्ट्र या नावाचा हट्ट सोडावा, यासाठी यशवंतराव चव्हाणांनी प्रयत्न सुरू केले. त्यांनी संयुक्त महाराष्ट्र समितीचे पुढारी असणाऱ्या एस. एम. जोशी यांनाच अत्र्यांचे मन वळवण्यासाठी पाठवले. एस. एम. अत्र्यांना म्हणाले, ‘मराठी भाषक राज्य तर आता आपल्याला मिळाले. आपले स्वप्न तर साकार झाले. मग आता नावासाठी निष्कारण खळखळ कशाला?’ यावर अत्रे भावनावेगाने म्हणाले, ‘नाही एसेम, महाराष्ट्र हे सुंदर नाव इतिहासाने आपल्या प्रदेशाला दिलेले असताना त्याला मुंबईच्या पोटात घालणे हा विश्वासघात आहे. हे राष्ट्रीय पातक आहे. त्याला इतिहास कधीच क्षमा करणार नाही. ‘महाराष्ट्र’ या नावाबद्दल काँग्रेसला तरी एवढा दुस्वास का वाटावा? त्याचा अर्थ महाराष्ट्रद्वेषाचे त्यांचे शेपूट अजून वळवळते आहे. म्हणून एसेम ‘महाराष्ट्र’ या नावासाठी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याएवढा प्रखर लढा आपल्याला पुन्हा द्यावा लागेल असे तुम्ही त्यांना निक्षून सांगा.’ अत्र्यांनी ‘महाराष्ट्र’ या नावासाठी कणखर भूमिका घेतली. त्यामुळे यशवंतराव चव्हाण आणि काँग्रेसच्या पुढाऱ्यांचा निरुपाय झाला. शेवटी यशवंतराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई विधानसभेतील काँग्रेस पक्षाची बैठक भरली. त्यांनी मराठी राज्याचे नाव ‘महाराष्ट्र’ असावे असा एकमताने निर्णय घेतला व तशा तऱ्हेची दुरुस्ती विधेयकात करायचे ठरवले. आचार्य अत्रे म्हणतात… आचार्य अत्रे आपल्या आत्मचरित्रात म्हणतात, ‘कोणत्याही तऱ्हेचा वृथा अभिमान न बाळगता, मी अगदी विनम्र आणि प्रांजळ भावनेने सांगतो की, नवीन मराठी भाषक राज्याला ‘महाराष्ट्र’ हे जे नाव मिळाले, ते मिळवून देण्यात इतरांपेक्षा माझा वाटा अधिक आहे. ह्या विषयावर त्या काळात दुसऱ्या कोणत्याही पत्रकाराने वा राजकीय कार्यकर्त्याने आपली लेखणी झिजवलेली नाही. मीच एकट्याने ‘महाराष्ट्र’ या नावाची बाजू कडाडून मांडली आणि त्याबाबत कसलीही तडजोड होऊ दिली नाही. आज ही गोष्ट इतिहासजमा झाली आहे. पण ‘महाराष्ट्र सरकार’ हे शब्द आज मला कोठेही सरकारी मोटारीच्या अग्रभागी वा कोणत्याही ऑफिसावर वाचावयाला मिळाले, म्हणजे माझे मन आतल्या आत किती हर्षोत्फुल्ल होते आणि माझ्या सर्वांगावर आनंदाचे चोरटे रोमांच कसे उठतात, त्याची कल्पना मी इतरांना कशी देऊ?’ एसेम जोशी म्हणतात… एसेम जोशी आपल्या आत्मचरित्रात म्हणतात, दि. 1 मे 1960 मध्ये मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला, या घटनेने मला समाधान झाले नाही असे मी कसे म्हणेन? समाधान झालेच, पण ते अधुरे होते. दि. 6 फेब्रुवारी 1956 रोजी समितीच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी पत्करून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र नकाशावर झळकविला एवढ्यापुरतेच ते होते. सीमाप्रश्न अनिर्णीत राहिला याची आतून बोच होती. आज 1984 सालातही ती आहे. मुंबईचा प्रश्न अवघड होताच. आम्ही अधिक बुद्धिवान म्हणून मुंबईच्या प्रश्नाची उकल करू शकलो असे मी मानीत नाही. सत्याचा अपलाप करावयास आम्ही तयार नव्हतो आणि ही माणसे वाईट करणार नाहीत असा जनतेला विश्वास होता म्हणूनच हे अधुरे यश तरी पदरात पडले असे मला वाटते.’ 108 हुतात्म्यांची नावे 1] सीताराम बनाजी पवार 2] जोसेफ डेव्हिड पेजारकर 3] चिमणलाल डी. शेठ 4] भास्कर नारायण कामतेकर 5] रामचंद्र सेवाराम 6] शंकर खोटे 7] धर्माजी गंगाराम नागवेकर 8] रामचंद्र लक्ष्मण जाधव 9] के. जे. झेवियर 10] पी. एस. जॉन 11] शरद जी. वाणी 12] वेदीसिंग 13] रामचंद्र भाटीया 14] गंगाराम गुणाजी 15] गजानन ऊर्फ बंडू गोखले 16] निवृत्ती विठोबा मोरे 17] आत्माराम पुरुषोत्तम पानवलकर 18] बालप्पा मुतण्णा कामाठी 19] धोंडू लक्ष्मण पारडुले 20] भाऊ सखाराम कदम 21] यशवंत बाबाजी भगत 22] गोविंद बाबूराव जोगल 23] पांडूरंग धोंडू धाडवे 24] गोपाळ चिमाजी कोरडे 25] पांडूरंग बाबाजी जाधव 26] बाबू हरी दाते 27] अनुप महावीर 28] विनायक पांचाळ 29] सीताराम गणपत म्हादे 30] सुभाष भिवा बोरकर 31] गणपत रामा तानकर 32] सीताराम गयादीन 33] गोरखनाथ रावजी जगताप 34] महमद अली 35] तुळशीराम पुंजाजी बेलसरे 36] देवाजी सखाराम पाटील 37] श्यामलाल जेठानंद 38] सदाशिव महादेव भोसले 39] भिकाजी पांडुरंग रंगाटे 40] वासुदेव सूर्याजी मांजरेकर 41] भिकाजी बाबू बांबरकर 42] सखाराम श्रीपत ढमाले 43] नरेंद्र नारायण प्रधान 44] शंकर गोपाल कुष्टे 45] दत्ताराम कृष्णा सावंत 46] बबन बापू भरगुडे 47] विष्णू सखाराम बने 48] सीताराम धोंडू राडये 49] तुकाराम धोंडू शिंदे 50] विठ्ठल गंगाराम मोरे 51] रामा लखन विंदा 52] एडविन आमब्रोझ साळवी 53] बाबा महादू सावंत 54] वसंत द्वारकानाथ कन्याळकर 55] विठ्ठल दौलत साळुंखे 56] रामनाथ पांडूरंग अमृते 57] परशुराम अंबाजी देसाई 58] घनश्याम बाबू कोलार 59] धोंडू रामकृष्ण सुतार 60] मुनीमजी बलदेव पांडे 61] मारुती विठोबा म्हस्के 62] भाऊ कोंडीबा भास्कर 63] धोंडो राघो पुजारी 64] हृदयसिंग दारजेसिंग 65] पांडू महादू अवरीरकर 66] शंकर विठोबा राणे 67] विजयकुमार सदाशिव भडेकर 68] कृष्णाजी गणू शिंदे 69] रामचंद्र विठ्ठल चौगुले 70] धोंडू भागू जाधव 71] रघुनाथ सखाराम बीनगुडे 72] काशीनाथ गोविंद चिंदरकर 73] करपैया किरमल देवेंद्र 74] चुलाराम मुंबराज 75] बालमोहन 76] अनंता 77] गंगाराम विष्णू गुरव 78] रत्नू गोंदिवरे 79] सय्यद कासम 80] भिकाजी दाजी 81] अनंत गोलतकर 82] किसन वीरकर 83] सुखलाल रामलाल बंसकर 84] पांडुरंग विष्णू वाळके 85] फुलवरी मगरू 86] गुलाब कृष्णा खवळे 87] बाबूराव देवदास पाटील 88] लक्ष्मण नरहरी थोरात 89] ठमाबाई विठ्ठल सूर्यभान 90] गणपत रामा भुते 91] मुनशी वझीऱअली 92] दौलतराम मथुरादास 93] विठ्ठल नारायण चव्हाण 94] देवजी शिवन राठोड 95] रावजीभाई डोसाभाई पटेल 96] होरमसजी करसेटजी 97] गिरधर हेमचंद लोहार 98] सत्तू खंडू वाईकर 99] गणपत श्रीधर जोशी 100] माधव राजाराम तुरे(बेलदार) 101] मारुती बेन्नाळकर 102] मधूकर बापू बांदेकर 103] लक्ष्मण गोविंद गावडे 104] महादेव बारीगडी 105] कमलाबाई मोहिते 106] सीताराम दुलाजी घाडीगावकर 107] शंकरराव तोरस्कर 108] बंडू गोखले
