नाशिक NCP जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली:सोन्यासारखी माणसे सोडून जात आहेत, ही मोठी शोकांतिका – छगन भुजबळ




सोन्यासारखी माणसे अकाली निधनाने आपल्याला सोडून जात आहे. ही आपल्यासाठी अतिशय दु:खद घटना आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीशी कायम एकनिष्ठ राहिलेले ॲड. रवींद्रनाना पगार यांच्या निधनाने एक कुशल संघटक व अभ्यासू व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले असल्याच्या शोकभावना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नाशिक जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्रनाना पगार यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आज विशेष सर्वपक्षीय श्रद्धांजली सभा राष्ट्रवादी भवन, मुंबई नाका, नाशिक येथील कार्यालयात संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, स्व. अजितदादा पवार यांच्यासारख्या तरुण तडफदार नेत्याचे निधन झाले. त्यांच्या दोन चार दिवसांनी जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्रनाना पगार यांचे निधन झाले. या घटना अतिशय सुखदायी आहे. सोन्यासारखी माणसे अशी अकाली निघून गेली ही आपल्यासाठी अतिशय दुःखद घटना.पक्षाचे एक निष्ठावान व सक्रिय पदाधिकारी म्हणून ओळखले जाणारे व ‘नाना’ म्हणून प्रसिद्ध असलेले ॲड. रवींद्रनाना पगार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थापनेपासूनच पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी वेगवेगळ्या माध्यमातून झटत आले आहेत. नाशिक जिल्ह्याच्या राजकारणात, विविध निवडणुकांमध्ये त्यांनी नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली. आपल्या कायद्याच्या ज्ञानाचा उपयोग त्यांनी सदैव जनहितासाठी केला. जिल्ह्यातील शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी नेहमीच कटिबद्ध राहिले. ग्रामीण भागातील स्थानिक प्रश्नांवर त्यांनी नेहमीच ठोस भूमिका घेतली असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. १५ वर्षांहून अधिक काळ जिल्हाध्यक्ष पद ते पुढे म्हणाले की, ॲड. रवींद्रनाना पगार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीशी कायम एकनिष्ठ राहिले. त्यांचा बागलाण मतदारसंघ हा राखीव असल्याने प्रत्यक्ष निवडणुकीत त्यांना संधी मिळाली नाही. परंतु त्यांनी आपले सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील कामाला कधीही खंड पडू दिला नाही. १५ वर्षाहून अधिक काळ पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाची धुरा त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. पक्षाच्या वाढीसाठी संघटन मजबूत करण्यासाठी त्यांचे योगदान हे अतिशय महत्वाचे राहिले. त्यांच्या निधनाने एक कुशल संघटक व अभ्यासू व्यक्तिमत्व आपण गमावले असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मोठी हानी झाली असल्याचे प्रतिपादन मंत्री ना. भुजबळ यांनी यावेळी बोलतांना केले. पगार यांची एक्झीट धक्कादायक सुमारे ४० वर्षे पक्षीय संघटनेच्या कामकाजाचा अनुभव असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्रनाना पगार यांनी वयाच्या ६४ व्या वर्षी घेतलेली ‘अकाली एक्झीट’ धक्कादायक असल्याचे रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष भगीरथ शिंदे यांनी सांगितले. नानांच्या नेतृत्वात २०२४ मध्ये जिल्ह्यात ७ आमदार नानांच्या नेत्तृत्वात सन २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत जिल्ह्यातील आमदारांची संख्या २००९ च्या तुलनेत वाढून ४ झाली. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत आमदारांची संख्या ६ झाली. तर नुकत्याच पार पडलेल्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत नानांच्या नेतृत्वाने ७ आमदार जिल्ह्यात निवडून आल्याचे माजी खासदार देविदास पिंगळे यांनी सांगितले. येलो पॉलिटिक्सपासून दूर राहिलेली व्यक्ती केंद्रात व राज्यांत सत्तेत असणाऱ्या पक्षांचे प्रमुख पद भूषवित असतांना देखील ‘येलो पॉलिटिक्स’ पासून दूर राहिलेल्या रवी नानांचे निष्कलंक नेतृत्व, वागण्यातील साधेपणा, कार्यकर्त्यांना जीव लावण्याची हातोथी, थेट संपर्क व संघटन कौशल्यामुळे सर्वत्र हळहळ होत असल्याचे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांनी सांगितले. पक्षाच्या विद्यार्थी, युवक व जेष्ठ अशा तीनही संघटनांचे “जिल्हाध्यक्ष” पद भूषविणारे नाना हे सर्वपक्षांमध्ये एकमेव अध्यक्ष होते असे माजी आमदार जयंत जाधव यांनी यावेळी बोलतांना सांगितले. ‘सुविचार गौरव’ पुरस्काराची संकल्पना सुविचार मंच’ या नोंदणीकृत सामाजिक संस्थेचे ते संस्थापक होते. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सर्व सामान्यमधील असामान्य व्यक्तीचे काम समाजापुढे आणुन त्यांचा सन्मान करणारा ‘सुविचार गौरव’ पुरस्कार वितरण सोहळ्यांची संकल्पना रवींद्रनाना पगार यांनी पुढे आणली होती. आणि अल्पावधीतच नाशिकचा सर्वात मोठा पुरस्कार सोहळा म्हणून या कार्यक्रमास राज्यात ओळख मिळाली असल्याचे सार्वजनिक वाचनालयाचे सांस्कृतिक सचिव जयप्रकाश जातेगावकर यांनी यावेळी बोलतांना म्हटले. वकृत्व, कतृत्व व नेतृत्वाचा संगम छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांनी आयुष्यभर वाटचाल केलेल्या रविनानांच्या व्यक्तिमत्वात वकृत्व, कतृत्व व नेतृत्वाचा संगम होता असे व्ही.एन.नाईक शिक्षण संस्थेचे हेमंत धात्रक यांनी बोलतांना सांगितले. कार्यकर्त्याशी कौटुंबिक संबंध स्पष्टवक्ते असलेला रवींद्रनानांचा सर्व वयोगटातील नागरिकांशी थेट संपर्क असल्याने त्यांच्या सुख-दुखात सहभागी होऊन कार्यकर्त्याशी कौटुंबिक संबंध जोडले गेले होते. हेच त्यांच्या यशस्वी नेत्तृत्वाचे “सिक्रेट” होते, असे काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रमेश कहांडोळ यांनी म्हटले. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष भगीरथ शिंदे, माजी खासदार देविदास पिंगळे, व्हि.एन.नाईक शिक्षण संस्थेचे हेमंत धात्रक, माजी आमदार जयंत जाधव, जेष्ठ नेते दिलीप खैरे, लक्ष्मण सावजी, बाळासाहेब आहेर, नाना महाले, बाळासाहेब कर्डक आदींनी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी अॅड. रवींद्रनाना पगार यांचे चिरंजीव आकाश पगार व कुटुंबीय देखील उपस्थित होते. या विशेष श्रद्धांजली सभेचे सूत्रसंचालन डॉ.योगेश गोसावी यांनी केले तर आभार सागर बाविस्कर यांनी मानले. सामुहिक पसायदानाने शोकसभेची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *