श्रीगोंदे तालुक्यामध्ये ज्वारी काढणीची लगबग:मजुरी वाढल्याने शेतकरी चिंतेत




श्रीगोंदे तालुक्यात सध्या ज्वारी काढणीची लगबग सुरू झाली असून अनेक शेतकऱ्यांनी काढणीला सुरुवात केली आहे. यंदा रब्बी हंगामात आवश्यक तेवढा आणि जोरदार पाऊस झाल्यामुळे ज्वारीसह गहू, हरभरा, तूर आणि कांदा या पिकांच्या विक्रमी पेरण्या झाल्या होत्या. कुकडीचे आवर्तन वेळेवर सुटले तसेच विहिरींमध्ये मुबलक पाणी उपलब्ध असल्याने पिकांना वेळेवर पाणी मिळाले. हवामान अनुकूल राहिल्याने पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. उत्पादन समाधानकारक होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी फळबागा, पालेभाज्या, फळभाज्या आणि ऊस याकडे वळण घेतल्याने ज्वारीखालील क्षेत्र काही प्रमाणात घटले आहे. त्यामुळे ज्वारीचे एकूण उत्पादन जेमतेम असल्याचे चित्र आहे. सध्या चांगल्या दर्जाच्या मालदंडी ज्वारीला ४५ ते ५० रुपये दर मिळत असला तरी नव्या ज्वारीच्या आगमनानंतर दर घसरतात. सर्वसामान्य शेतकऱ्यांना पैशांच्या गरजेपोटी ज्वारीची विक्री करावी लागते. ज्वारी आरोग्यास उपयुक्त धान्य असल्याने मागणी वाढत असली तरी उत्पादन खर्च आणि कमी दर यामुळे शेतकरी ज्वारी पेरणी कमी करण्याच्या विचारात आहेत. परिणामी भविष्यात ज्वारी उत्पादनात आणखी घट होऊन दरवाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मजुरांची टंचाई, मजुरीचा दर गेला ८०० रुपयांवर ज्वारी काढणीसाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे. तालुक्यात शेतीकामासाठी मजुरांची टंचाई जाणवत असून शेतकऱ्यांना जादा पैसे देऊन मजूर बोलवावे लागत आहेत. पुरुष मजूर दररोज ८०० रुपये तर महिला मजूर ५०० ते ६०० रुपये रोजंदारी मागत आहेत. वाढत्या खर्चामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडले आहेत.ज्वारीच्या मशागतीपासून ते मळणीपर्यंतचा खर्च मोठा आहे. बियाणे, पेरणी, खुरपणी, औषध फवारणी, वीजबिल आणि काढणी खर्च यांचा विचार करता मिळणारा बाजारभाव परवडणारा नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *