'टीयूआय-21' वाघिण महिनाभरातच पुन्हा जेरबंद:पेंचमध्ये गुराढोरांच्या शिकारीमुळे त्याच अधिवासातून पकडले




पेंच व्याघ्र प्रकल्पातील ‘टीयूआय-21’ या वाघिणीला गुराढोरांची शिकार केल्यामुळे वन विभागाने पुन्हा एकदा जेरबंद केले आहे. मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी तिला अवघ्या महिनाभरापूर्वीच नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले होते, परंतु तिने पुन्हा शिकार सुरू केल्याने ही कारवाई करण्यात आली. तिला पूर्वी सोडले होते त्याच ठिकाणावरून पकडण्यात आले. यापूर्वी, 7 जुलै रोजी ‘टीयूआय-21’ वाघिणीला पवनार/पवनी युसी क्षेत्रातील उसरीपार बीटमधून पकडण्यात आले होते. मानवी वस्तीजवळ येऊन पाळीव जनावरांची शिकार करण्याची तिची सवय कायम असल्याने, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून वैद्यकीय तपासणीनंतर तिला सिल्लारी क्षेत्रातील मुख्य संरक्षित जंगलात सोडण्यात आले होते. ..पुन्हा यशस्वीरीत्या जेरबंद मात्र, जंगलात सोडल्यानंतरही वाघिणीच्या वर्तनात कोणताही बदल झाला नाही. तिने लगतच्या परिसरात पुन्हा गुराढोरांची शिकार करणे सुरू केले. यामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. संभाव्य धोका लक्षात घेता, वन विभागाने तातडीने मोहीम राबवून तिला सिल्लारी/पेंचच्या नैसर्गिक अधिवासातूनच पुन्हा यशस्वीरीत्या जेरबंद केले. ही कारवाई प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) आणि पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या उच्च अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वाघिणीची पुन्हा एकदा वैद्यकीय तपासणी केली जात आहे. तिला कायमस्वरूपी रेस्क्यू सेंटरमध्ये ठेवायचे की अन्यत्र हलवायचे, याबाबत राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार पुढील निर्णय घेतला जाईल. हेही वाचा.. महाराष्ट्रात गेल्या 5 वर्षांत 175 वाघांचा मृत्यू:11 वाघांची शिकार तर 18 विजेच्या धक्क्याने मृत, वनविभागाकडून तपासात हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप महाराष्ट्रामध्ये गेल्या पाच वर्षांत वाघांच्या मृत्यूचे प्रमाण चिंताजनक वाढले आहे. माहिती अधिकार कायद्यांतर्गत मिळालेल्या आकडेवारीनुसार, 2022 ते 2026 या कालावधीत राज्यात 24 वाघांच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकरणांमध्ये मृत्यूचे निश्चित कारण स्पष्ट झालेले नाही आणि कोणतीही जबाबदारीही निश्चित करण्यात आलेली नाही. वनविभागाच्या या कारभारावर वन्यजीवप्रेमींनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. सविस्तर वाचा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *