युद्धाच्या ६ दिवसांमध्ये ८५ लाख ते १३० लाख कोटींचा फटका आर्थिक जगाच्या अर्थकारणात बसला 


इराणने थेट युद्ध जिंकण्याचा मार्ग न निवडता अमेरिकेची आर्थिक कोंडी करण्याचा मार्ग स्वीकारला आहे. जगातील सर्वात महत्त्वाची समुद्रधुनी असलेली हॉर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) बंद करून इराणने जगासमोर एक प्रचंड संकट उभे केले आहे. या मार्गातून जगातील मोठ्या प्रमाणावर तेलाची वाहतूक होते. ती थांबवल्याने जागतिक अर्थव्यवस्थेवर प्रचंड परिणाम झाला आहे.

इराणचे सर्वोच्च नेता अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतरही त्यांची रणनीती बदललेली नाही. उलट त्यांच्या आखलेल्या योजनेची अंमलबजावणी आता अधिक आक्रमकपणे सुरू आहे. या संपूर्ण कारभारामागे प्रमुख सूत्रधार म्हणून अली लारी जानी यांचे नाव पुढे येत आहे. अमेरिका आणि इजरायल यांना वाटत होते की, नेतृत्व संपवले की व्यवस्था कोसळेल; परंतु इराणने अनेक वर्षांपासून तयार केलेली बहुस्तरीय रणनीती त्यांच्या लक्षातच आली नाही.

आज परिस्थिती अशी आहे की तेल, गॅस आणि शेअर बाजार या तिन्ही क्षेत्रांत मोठा धक्का बसला आहे. या तिन्ही कारणांमुळे अमेरिकेला दररोज प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. मागील सहा दिवसांत जागतिक स्तरावर अंदाजे ८५ लाख कोटी ते १३० लाख कोटी रुपयांपर्यंत आर्थिक फटका बसल्याचे तज्ञ सांगतात. अर्थात, हे नुकसान फक्त अमेरिकेपुरते मर्यादित नाही; पण जगाच्या आर्थिक व्यवस्थेत अमेरिकेची भूमिका मोठी असल्याने त्यांच्यावर परिणाम अधिक तीव्र दिसत आहे. हॉर्मुझ सामुद्रधुनीतून तेल वाहतूक रोखल्यानंतर रशियानेही युरोपला गॅस पुरवठा बंद करण्याची घोषणा केली. त्यामुळे ऊर्जा बाजारात अभूतपूर्व अस्थिरता निर्माण झाली आहे. जगातील बहुतांश व्यवहार डॉलरमध्ये होत असल्यामुळे ही परिस्थिती डॉलरच्या वर्चस्वालाही आव्हान देणारी ठरू शकते.

इराणने हा डाव अत्यंत नियोजनबद्ध रितीने खेळला आहे. एकीकडे सामुद्रधुनी बंद करून तेल पुरवठ्यावर नियंत्रण आणले, तर दुसरीकडे रशियाच्या गॅस पुरवठा बंदीमुळे युरोप आणि अमेरिकेवर दुहेरी दबाव निर्माण झाला आहे. अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील गट विजयाचे दावे करत असला, तरी प्रत्यक्षात परिस्थिती तितकी सोपी नाही. युद्धात इराणचेही नुकसान होत आहे; परंतु त्यांनी आधीच आर्थिक आणि रणनीतिक तयारी केलेली असल्यामुळे ते हा संघर्ष दीर्घकाळ चालवण्यास तयार दिसतात. इतकेच नव्हे, तर अमेरिका इटलीच्या माध्यमातून इराणकडे युद्ध थांबवण्याचे संदेश पाठवत असल्याच्या बातम्याही समोर येत आहेत. परंतु इराणचा दावा आहे की, त्यांच्या सर्वोच्च नेत्यांची हत्या झाल्यानंतर तडजोडीचा प्रश्नच उद्भवत नाही.

१ मार्च रोजी इराणच्या नौदलाने स्पष्ट घोषणा केली की हॉर्मुझ सामुद्रधुनीतून कोणतेही तेलवाहू जहाज जाऊ दिले जाणार नाही, फक्त चीन आणि रशिया यांना अपवाद देण्यात आला आहे. याचदरम्यान कतरमधील मोठ्या गॅस प्रकल्पांवर हल्ले झाले, तर सौदी अरेबियातील काही तेल प्रकल्पांवरही इराणी कारवाया झाल्याच्या बातम्या समोर आल्या. या सर्व घटनांमुळे ऊर्जा बाजार हादरला आहे. मागील सहा दिवसांत तेलाच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ झाली, गॅस दर वाढल्यामुळे जगाला लाखो कोटींचा फटका बसला, आणि शेअर बाजारात ४० ते ८० लाख कोटी रुपयांपर्यंतची घसरण झाली. एकत्रित परिणाम पाहिला तर जागतिक अर्थव्यवस्थेवर या संघर्षाचा जबरदस्त आघात झाला आहे.

युद्धसामग्रीचे नुकसान, इमारतींचे विध्वंस आणि मानवी जीवितहानी याचा हिशोब अद्याप पूर्णपणे झालेलाच नाही. जर तो जोडला गेला, तर या नुकसानाचा आकडा किती भयानक असेल याची कल्पनाही करणे कठीण आहे. या संपूर्ण रणनीतीची आखणी मरण पावलेले सर्वोच्च नेता अयातुल्ला अली खामेनी यांनीच केली होती, आणि आज त्याची अंमलबजावणी त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू ठेवली आहे. त्यामुळे अमेरिका आणि इजरायल यांना आता उमगू लागले आहे की त्यांनी इराणच्या संपूर्ण आराखड्याचा अंदाज न घेताच युद्ध छेडण्याची घाई केली. आज परिस्थिती अशी आहे की जगभरातील तज्ञ एक गंभीर प्रश्न विचारत आहेत, हा संघर्ष पुढे जाऊन तिसऱ्या महायुद्धाचे रूप धारण करणार का?

इराणने यापूर्वी इराण-इराक युद्धात आठ वर्षे लढाई केली आहे. त्यामुळे दीर्घकालीन युद्धाचा अनुभव त्यांना आहे. त्या अनुभवाच्या जोरावर ते आज अमेरिकेसमोर ठामपणे उभे आहेत. अनेक विश्लेषकांच्या मते, इराणचा संपूर्ण डाव समजून न घेता हल्ला करणे ही कदाचित अमेरिकेची सर्वात मोठी रणनीतिक चूक ठरू शकते.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *