मध्यरात्रीचा थरार! वीजेच्या खांबावर करंट लागून ३७ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू; खडकपुरा परिसरात शोककळा


वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर काही मिनिटांत घडली दुर्घटना; युवक खांबावर कशासाठी गेला, याचा शोध सुरू

नांदेड (प्रतिनिधी) –  नांदेड शहरातील खडकपुरा परिसरात मंगळवारी मध्यरात्री घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर हादरला. वीजेच्या खांबाला करंट लागल्याने ३७ वर्षीय शोएब अब्दुल गफार यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून, नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, युवक नेमका वीजेच्या खांबावर कोणत्या कारणासाठी गेला होता, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नसून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

वीज गेल्यानंतर घराबाहेर पडले… आणि काही मिनिटांत घडली दुर्घटना

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडेअकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास खडकपुरा परिसरातील वीजपुरवठा अचानक खंडित झाला. त्यावेळी शोएब अब्दुल गफार हे आपल्या कुटुंबीयांसोबत घरी होते. वीज गेल्यानंतर ते घराबाहेर पडले. त्यानंतर सुमारे दहा ते पंधरा मिनिटांनी वीजपुरवठा पुन्हा सुरू झाला.

वीज आल्यानंतर अचानक शोएब यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आल्याने कुटुंबीय आणि परिसरातील नागरिक घराबाहेर धावले. त्यावेळी घरासमोरील वीजेच्या खांबावर ते करंट लागलेल्या अवस्थेत अडकलेले असल्याचे पाहून सर्वांनाच धक्का बसला.

पोलिस, अग्निशमन दल आणि नागरिकांची धावपळ

घटनेची माहिती मिळताच वजीराबाद पोलीस ठाण्याचे पथक, नांदेड महानगरपालिकेचे अग्निशमन दल आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. स्थानिक नागरिकांच्या मदतीने शुऐब यांना खाली उतरविण्यात आले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.

दुर्घटनेमागील कारण अद्याप गूढ

शोएब अब्दुल गफार हे मध्यरात्री वीजेच्या खांबावर नेमके कोणत्या कारणासाठी गेले होते, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असून, पोलिसांकडून पंचनामा आणि अन्य आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहेत. तसेच वीज यंत्रणेशी संबंधित बाबींचीही चौकशी केली जात असल्याची माहिती मिळाली आहे.

परिसरात हळहळ, सुरक्षिततेबाबत प्रश्न

या दुर्दैवी घटनेमुळे खडकपुरा परिसरात शोककळा पसरली आहे. अचानक घडलेल्या या अपघातामुळे नागरिकांनी वीज यंत्रणेच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली असून, अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, वजीराबाद पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

 


Post Views: 7






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *