![]()
सेनगाव ते जिंतूर मार्गावर येलदरी धरणासमोरील पुलावरून पिकअप वाहन कोसळून झालेल्या अपघातात चालकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी ता. ४ उघडकीस आली आहे. अंकुश शिंदे (रा. शिंदेटाकळी, ता. सेनगाव) असे मयताचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिंदेटाकळी येथील अंकुश शिंदे पिकअप वाहन चालविण्याचा व्यवसाय करतात. मंगळवारी ता. ३ ते भाडे घेऊन जालना येथे गेले होते. त्यानंतर रात्रीच्या सुमारास ते परत गावाकडे निघाले होते. यावेळी जिंतूर ते सेनगाव मार्गावर येलदरी पुलावर चालक अंकुश यांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पिकअप वाहन थेट पाण्यात कोसळले. मात्र यामध्ये अंकुश यांना बाहेर निघताच आले नाही. दरम्यान, रात्री उशीरा पर्यंत ते घरी आले नसल्याने त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा शोध सुरु केला होता. मात्र त्यांचा शोध लागलाच नाही. त्यानंतर आज दुपारच्या सुमारास या मार्गावरून येणाऱ्या वाहन चालकांना एक पिकअप वाहन पाण्यात पडलेले दिसून आले. त्यांनी तातडीने सेनगाव व जिंतूर पोलिसांना माहिती दिली. जिंतूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र सरोदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक पुंड, जमादार राठोड यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या मदतीने पिकअप बाहेर काढण्यात आले. यावेळी त्यात अंकुश यांचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी गावकऱ्यांची मोठी गर्दी झाली होती. मयत अंकुश यांच्या पश्चात आई, वडिल, पत्नी, एक मुलगी असा परिवार असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. या प्रकरणी जिंतूर पोलिस ठाण्यात रात्री उशीरा पर्यंत नोंद झाली नाही.
जिंतूर-सेनगाव मार्गावर भीषण अपघात:येलदरी पुलावरून पिकअप पाण्यात कोसळली, चालकाचा करुण अंत
