दादा जे. पी. वासवानी यांची 108 वी जयंती साजरी:'साधू वासवानी मिशन'तर्फे विशेष कीर्तन; निर्वाण बिर्ला यांच्या सादरीकरणाने श्रोते मंत्रमुग्ध




साधू वासवानी मिशनतर्फे दादा जे. पी. वासवानी यांच्या 108 व्या जयंतीचे औचित्य साधून विशेष ‘कीर्तन जॅमिंग’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात प्रसिद्ध उद्योगपती आणि गायक निर्वाण बिर्ला यांनी आपल्या भावपूर्ण कीर्तन आणि भक्तीसंगीताच्या सादरीकरणाने उपस्थितांना भक्तीरसात चिंब भिजवले. संगीतमय वातावरणात दादांच्या विचारांचा जागर पारंपरिक कीर्तनाने या कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात झाली. त्यानंतर विविध भक्तिगीते आणि नामस्मरणाच्या सुरांनी संपूर्ण सभागृह प्रसन्न आणि भक्तिमय झाले. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वच वयोगटांतील नागरिकांनी या संगीतमय सोहळ्यात उत्साहाने भाग घेतला. संगीताच्या सुरावटींतून दादा जे. पी. वासवानी यांनी दिलेला प्रेम, करुणा आणि क्षमाशीलतेचा संदेश उपस्थितांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यात आला. मनःशांती आणि अंतर्मनातील आनंद हेच यश : निर्वाण बिर्ला आपल्या भावना व्यक्त करताना निर्वाण बिर्ला म्हणाले, “साधू वासवानी मिशनसोबतचे हे माझे तिसरे कीर्तन आहे. यंदा दादा जे. पी. वासवानी यांच्या 108 व्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचा भाग होता आल्याचा आनंद अधिक आहे. दादा आणि दीदी कृष्णा यांनी उभी केलेली ही परंपरा प्रत्येकाला स्वतःशी आणि ईश्वराशी जोडण्याची संधी देते.”ते पुढे म्हणाले, “येथे येणाऱ्या प्रत्येकाने काही क्षण संगीतासोबत घालवावेत आणि त्या माध्यमातून मनःशांतीचा अनुभव घ्यावा, हीच माझी इच्छा आहे. त्या काही क्षणांत जरी कोणाला अंतर्मनातील आनंद मिळाला, तरी माझ्यासाठी तेच या कीर्तनाचे यश आहे.” लंगर प्रसादाने कार्यक्रमाची सांगता कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांसाठी पारंपरिक लंगर प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. भक्ती, संगीत आणि सामूहिक सहभागाचा एक सुंदर मिलाफ घडवून आणणाऱ्या या सोहळ्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *