नांदेड: (प्रतिनिधी)- नांदेड शहराला स्मार्ट बनवण्याच्या नादात महानगरपालिकेने ठिकठिकाणी जे आधुनिक गतिरोधक बसवले होते, त्यांचे आता अधोगती-रोधक झाले आहेत. अवघ्या सहा महिन्यांतच या गतिरोधकांचे रबर हवेत विरून गेले असून, आता रस्त्यावर शिल्लक उरले आहेत ते फक्त आणि फक्त महानगरपालिकेच्या कर्तबगारीचे अणकुचीदार पुरावे म्हणजेच लोखंडी खिळे!
विकासाचे नखे टोचतायत कुणाला? शहरातील अनेक भागांत हे नवीन प्रकारचे गतिरोधक बसवताना प्रशासनाने मोठा गाजावाजा केला होता. काही ठिकाणी एक, तर काही ठिकाणी चक्क तीन-तीन गतिरोधकांचे थर लावून वाहनधारकांच्या कमरेचे हाडे खिळखिळी करण्याचे पुण्यकर्म पालिकेने केले होते. मात्र, निकृष्ट दर्जाच्या कामामुळे हे गतिरोधक सहा महिनेही टिकू शकले नाहीत. आज परिस्थिती अशी आहे की, गतिरोधकांचे वरचे आवरण गायब झाले आहे आणि ज्या खिळ्यांच्या आधारे ते ठोकले होते, ते खिळे आता यमदूतासारखे रस्त्यावर उभे राहून वाहनधारकांच्या टायरची आणि जीवांची वाट पाहत आहेत.
जीवघेणी कसरत आणि पालिकेची धृतराष्ट्र वृत्ती या उघड्या पडलेल्या खेळांमुळे अपघात होण्याची शक्यता प्रचंड वाढली आहे. दुचाकीस्वारांना या खेळांमधून गाडी वाचवताना अक्षरशः सर्कस करावी लागत आहे. जर चुकून एखाद्याचा तोल गेला आणि तो दुसऱ्या वाहनावर आदळला, तर होणाऱ्या मृत्यूला जबाबदार कोण? असा जळजळीत प्रश्न नागरिक विचारत आहेत. पण, खुर्चीला चिकटलेल्या प्रशासनाला बहुधा रक्त सांडल्याशिवाय जाग येणार नाही, अशीच चिन्हे दिसत आहेत.
गुणवत्ता म्हणजे काय रे भाऊ? नांदेडच्या नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा देताना त्यामध्ये गुणवत्ता नावाचाही काही प्रकार असतो, याचा विसर महानगरपालिकेला पडलेला दिसतोय. नवीन वस्तू लावायची, तिचे बिल काढायचे आणि सहा महिन्यांत ती खराब झाली की पुन्हा दुरुस्तीच्या नावाखाली खिसे भरायचे, असा हा खेळ तर नाही ना? अशी शंका आता उपस्थित होत आहे. आता पाहायचे हेच की, हे जीवघेणे खिळे उपसून रस्ते सुस्थितीत केले जातात की महापालिका प्रशासन एखाद्या मोठ्या अपघाताची रिबिन कापण्याची वाट पाहते!
Post Views: 113
