अकोल्यात ठाकरे गटाच्या शहरप्रमुखांच्या वाहनावर हल्ला:तलवारीने तोडफोड, आक्रमक भूमिका घेण्याचा इशारा

0
730-x-548-2026-03-02t100945143_1772426917.jpg




अकोला शहराच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. उद्धव ठाकरे गटाचे शहरप्रमुख राहुल कराळे यांच्या वाहनाची अज्ञात तिघांनी तोडफोड केली. मोठी उमरी परिसरात आपल्या घराजवळ आल्यानंतर कराळे हे त्यांच्या बुलोरो वाहनात बसले असताना हा प्रकार घडला. अचानक तीन जणांनी हातात तलवार आणि लोखंडी पाईप घेऊन वाहनावर हल्ला चढवला. त्यांनी वाहनाच्या काचा फोडून मोठे नुकसान केले. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाईन पोलिस तातडीने घटनास्थळी पोहोचले. संपूर्ण प्रकार परिसरातील चित्रफीत यंत्रात कैद झाला असून त्या आधारे हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, कराळे यांना कायमचे संपवण्याचा कट रचण्यात आला होता. मात्र ते वाहनाबाहेर न आल्याने हल्लेखोरांचा राग वाहनावर काढण्यात आल्याचे बोलले जात आहे. हल्लेखोरांचा गोळीबार करण्याचाही डाव होता, अशी माहिती पोलिसांना देण्यात आल्याचा दावा कराळे यांनी केला आहे. या प्रकरणावर ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. 12 तासांच्या आत आरोपींना अटक न केल्यास आक्रमक भूमिका घेतली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. कराळे यांनी पोलिसांवर उशिरा येण्याचा आरोप करत घटनेची माहिती देऊनही सुमारे एक तास विलंब झाल्याचे सांगितले. या हल्ल्यामागे सुपारी देऊन कट रचल्याची शक्यता वर्तवली जात असून पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास केला जात आहे. संतापाच्या भरात पतीचा पत्नीवर कुऱ्हाडीने वार दरम्यान, यवतमाळ जिल्ह्यातील वडकी परिसरातील बोरी इचोड येथे घडलेल्या घटनेनेही नागरिकांना हादरवून सोडले आहे. कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात मृत महिलेचे नाव वैजयंतीमाला श्रीनिवास येलके असून आरोपी पतीचे नाव श्रीनिवास येलके आहे. ही घटना वडकी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वैजयंतीमाला आणि श्रीनिवास यांच्यात घरगुती कारणांवरून नेहमी वाद होत होते. शनिवारी दुपारी दोघेही आपल्या शेतात तुरी काढण्यासाठी गेले होते. त्या वेळी वाद वाढल्याने संतापाच्या भरात पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने वार केला. या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर संशय टाळण्यासाठी मृतदेह शेतातील तुरीच्या गंजीत लपवून आरोपी तेथून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आणि काही वेळातच आरोपीला अटक करण्यात यश मिळवले. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास वडकी पोलिस ठाण्याकडून सुरू आहे.

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks