![]()
प्रतिनिधी|अहिल्यानगर विश्वभारती अकॅडमीचे अभियांत्रिकी महाविद्यालय येथे मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रंथालय विभाग व सांस्कृतिक विभाग यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रा. डॉ. भाऊसाहेब मुळे या प्रमुख पाहुण्यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. मराठी भाषेचा इतिहास, तिची समृद्ध परंपरा आणि आधुनिक काळातील महत्त्व यावर मार्गदर्शनपर व्याख्यान देत डॉ. मुळे यांनी मराठी भाषेचा इतिहास व मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कशा पद्धतीने मिळाला हे सांगितले. तसेच मराठी भाषा टिकवण्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाच्या पुस्तकांसोबत इतर अवांतर पुस्तकाचे वाचन केले पाहिजे असे सांगितले. तसेच मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना मातृभाषेचा अभिमान बाळगण्याचे आवाहन केले. यावेळी प्राचार्या वैशाली धोंगडे, कॅम्पस डीन आर. डी. साखरवाडे, अकॅडेमिक डीन व्ही. एस. चौधरी, प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे समन्वयक निर्मळे एस.एन. तसेच सर्व विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते.
भाषा टिकवून ठेवण्यासाठी अवांतर पुस्तके वाचन करा:प्रा. भाऊसाहेब मुळे यांचे विद्यार्थ्यांना आवाहन
