जिल्हा परिषदेचा 1.33 लाख विद्यार्थ्यांसाठी 'स्पेल बी' प्रयोग:इंग्रजीची भीती घालवून शहरी विद्यार्थ्यांच्या बरोबरीने आणण्याचा उद्देश

0
8eac79d2-868c-42e5-9ff3-fa6be33cdc66_1772380711847.jpg




ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची इंग्रजी विषयाची भीती दूर करण्यासाठी अमरावती जिल्हा परिषदेने ‘स्पेल बी’ हा विशेष प्रयोग सुरू केला आहे. तिसरी ते आठवीच्या १.३३ लाख विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी करून घेण्यात आले आहे. या प्रयोगामुळे ग्रामीण विद्यार्थी इंग्रजीमध्ये शहरी विद्यार्थ्यांच्या बरोबरीने येतील, असा जिल्हा परिषद प्रशासनाचा विश्वास आहे. जिल्ह्यातील चौदा तालुक्यांमधील जिल्हा परिषदेच्या १ हजार ५४९ शाळांमधून दीड लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यापैकी तिसरी ते आठवीच्या १ लाख ३३ हजार ५०४ विद्यार्थ्यांची ‘स्पेल बी’ प्रयोगासाठी निवड करण्यात आली. या विद्यार्थ्यांचे तिसरी-चौथी, पाचवी-सहावी आणि सातवी-आठवी असे तीन गट तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक गटातील विद्यार्थ्यांना हसत-खेळत इंग्रजी शिकवण्यासाठी विशेष शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून इंग्रजी विषयाचा अभ्यासक्रम आणि काही प्रमाणात अवांतर अभ्यासही करून घेतला. इतर विषयांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होणार नाही याचीही काळजी घेण्यात आली आहे. हा प्रयोग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजीता महापात्र यांच्या संकल्पनेतून साकारला आहे. रुजू झाल्यानंतर त्यांनी ‘गप्पा विथ सीईओ’ हा उपक्रम सुरू केला. या अंतर्गत शाळांना भेटी देऊन त्यांनी विद्यार्थ्यांची शैक्षणिक स्थिती जवळून पाहिली. विशेषतः मेळघाटातील विद्यार्थ्यांना अशा प्रयोगाची नितांत गरज असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या प्रयोगाची प्रत्यक्ष सुरुवात चालू शैक्षणिक सत्रात ऑगस्ट २०२५ मध्ये झाली. सुरुवातीला त्यांनी शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत सर्व शाळांशी संपर्क साधला. प्रतिबद्ध शिक्षकांची निवड करून या प्रयोगाला अंतिम रूप देण्यात आले. सध्या शिक्षण विस्तार अधिकारी प्रवीण खांडेकर जिल्हास्तरावरुन या प्रयोगाचे नियोजन आणि नियंत्रण करत आहेत. या विशेष प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांचा इंग्रजी शब्दसंग्रह मोठ्या प्रमाणात वाढला असून, त्यांच्यात इंग्रजी विषयाची गोडी निर्माण झाली आहे. विद्यार्थी आता इंग्रजीच्या तासाला आवर्जून उपस्थित राहत असून, त्यांच्या शाळेतील उपस्थितीतही लक्षणीय सुधारणा झाली आहे, असे सीईओ संजीता महापात्र यांनी सांगितले. “येत्या काळात या प्रयोगाचे अधिक परिणामकारक निकाल मिळतील, असा मला विश्वास आहे,” असेही त्या म्हणाल्या.

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks